Saturday, 5 August 2017

Text - AIR NEWS AURANGABAD 05.08.2017 5.25

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 5 August 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ५ ऑगस्ट २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
लोकसेवकांनी राजकीय व्यक्ती आणि राजकीय हितसंबंध निर्माण होण्यापासून स्वत:ला वाचवलं पाहिजे, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ते आज राष्ट्रपती भवनात मसूरी इथल्या लाल बहाद्दूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी अधिकाऱ्यांना संबोधित करत होते. लोकप्रतिनिधींना स्पष्ट, स्वतंत्र आणि नि:पक्ष सल्ला देण्याचं साहस लोकसेवकांमध्ये असलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला.
****
जगभरातल्या समुदायांमध्ये धार्मिक वादाची बीजं पेरुन समाज आणि राष्ट्रांमध्ये फूट पाडणाऱ्या धार्मिक पूर्वग्रहाचं निर्मूलन करण्यासाठी संवाद हाच एकमेव मार्ग असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संवाद ग्लोबल उपक्रमाच्या दुसऱ्या पर्वात त्यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून हा संदेश दिला. म्यानमार इधल्या यांगून इथं ही दोन दिवसीय बैठक सुरु आहे. संघर्ष कसा टाळायचा, हवामान बदलाच्या समस्येला सामोरं कसं जायचं, शांती आणि सलोखा राखत कसं जगायचं असे प्रश्न जागतिक समुदायासमोर असल्याचं ते म्हणाले. एकविसाव्या शतकात राष्ट्र एकमेकांवर अवलंबून असून, जगासमोर अनेक आव्हानं आहेत. या समस्यांवर आशियातल्या संवाद आणि परिसंवादाच्या प्राचीन परंपरांमधून उत्तर मिळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी या संदेशात व्यक्त केला. 
****
भारताच्या १३व्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडीसाठी आज मतदान पार पडलं. दिवसभरात पूर्णां दोन टक्के मतदान झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार असून, संध्याकाळी सात वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार एम वेंकय्या नायडू आणि विरोधी पक्षांचे उमेदवार गोपालकृष्ण गांधी यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे.
****
कौशल्य विकास कार्यक्रमासाठी ठाणे इथं उभारण्यात आलेल्या सिटी बँक सेंटरचं उद्घाटन आज कौशल्य विकास आणि उद्योजकता विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून प्रथमच बँकिंग आणि वित्त क्षेत्रात दोन हजार प्रशिक्षणार्थींना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून साधारणपणे दोन कोटी रुपये सिटी बँक प्रशिक्षण आणि रोजगारासाठी खर्च करणार आहे.  या प्रशिक्षणासाठी उभारण्यात आलेल्या ठाणे केंद्रात तेराशे आणि पुणे केंद्रामध्ये ७०० प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित केलं जाणार आहे.
****
सन २०१४-१५ मधल्या पीक नुकसान भरपाई निधी वाटपात दोन कोटी ९३ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी सातारा जिल्ह्यातल्या खटावचे तत्कालीन तहसीलदार आणि नंदुरबारचे सध्याचे उपजिल्हाधिकारी अमोल कांबळे यांच्यासह दोघांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कांबळे यांनी शेतकऱ्यांना निधी वाटप न करता तो विविध बँका आणि पतसंस्थामधल्या नातेवाईकांच्या खात्यावर वर्ग करत ती रक्कम काढून घेतली होती.
****
लातूर इथल्या केंद्रीय पोलीस राखीव दलाच्या प्रशिक्षण केंद्रातल्या तेराव्या तुकडीचा दीक्षांत समारंभ प्राचार्य तथा पोलिस उपमहानिरीक्षक डी जे सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी १७० जवानांना सेवा आणि समर्पणाची शपथ देण्यात आली. जवानांनी पथसंचलन करुन अधिकाऱ्यांना मानवंदना दिली. 
****
शारिरीक शिक्षणशास्त्र आणि शिक्षणशास्त्र या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी महाविद्यालयांना नावनोंदणीसाठी शासनाकडून काही निकष ठरवून देण्यात आले आहेत. या निकषांची पूर्तता न करणाऱ्या महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमाची मान्यता रद्द होणार आहे. उच्च शिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालक विजय नारखेडे यांनी याबाबतचं परिपत्रक आज जारी केलं. या निकषांची पूर्तता करण्यासाठी महाविद्यालयांना तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
****
अकोला - हैद्राबाद या १६१ क्रमाकांच्या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला असून, या महामार्गाच्या चौपदरीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. हा महामार्ग वाशिम जिल्ह्यातून जात असल्यानं त्यासाठी वाशिम जिल्ह्यातल्या ६२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या चौपदरी रुंदीकरणासाठी मेडशी ते राजगाव दरम्यान दोन्ही बाजूच्या २१ गावातल्या जमिनींचं संपादन करण्यात येणार आहे. अशा आशयाचं राजपत्र प्रकाशित करण्यात आलं आहे.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून, दिवस अखेर श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात दोन बाद १०९ धावा झाल्या. उमेश यादव आणि हार्दिक पंड्यानं प्रत्येकी एक बळी घेतला. तत्पूर्वी श्रीलंकेचा पहिला डाव १८३ धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारतानं श्रीलंकेला फॉलोऑन दिला. भारत २३० धावांनी आघाडीवर आहे.
****

No comments:

Post a Comment