▼

Monday, 14 August 2017

AIR News Bulletin, Aurangabad 14.08.2017 06.50


र्१Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 AUG. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

                                                  Language Marathi           

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० मि.

****

**  फोडा आणि राज्य करा ही इंग्रज निती वापरून भारतीय जनता पक्ष राज्य करत असल्याची राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांची टीका

** देशातल्या पहिल्या मेडिसिटीच्या कोनशिलेचं  नागपूर इथं अनावरण

** पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती, राज्यात टंचाईसदृष्य परिस्थिती जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी

आणि

** क्रिकेटमध्ये श्रीलंका संघाला फॉलो ऑन, भारताला तिसऱ्या कसोटी सामन्यातही विजयाची संधी

****

फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची निती वापरून भारतीय जनता पक्ष राज्य करत असल्याची टीका राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष शुभारंभ सोहळ्याच्या उद्घाटनासाठी ते काल औरंगाबादमध्ये आले होते. त्यावेळी वार्ताहरांशी बोलतांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने विसरले असून केवळ स्वत:चा कार्यक्रम राबवण्यात मश्गुल असल्याचं ते म्हणाले.   निवडणुकीत दहा कोटी युवकांना नोकऱ्या देण्याचं, शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्च आणि ५० टक्के नफा देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं, हे आश्वासन ते आता विसरले आहेत. आज शेतकरी रोज आत्महत्त्या करत आहेत. त्याकडे त्यांचं लक्ष नाही. पण पाच वेळा अमेरिकेला भेट देण्याचं आणि एकूण ६५ देशांना भेटी देण्याचं ते विसरले नसल्याची उपहासात्मक टीका आझाद यांनी यावेळी केली. देशात प्रसार माध्यमं, महिला, अल्पसंख्याक, दलित, युवक, शेतकरी कुणीही सुरक्षित नसल्याचं सांगत केवळ संघ परिवार तेवढा सुरक्षित दिसतो, असं ते म्हणाले.

****

नागपूर इथं उभारण्यात येणाऱ्या देशातल्या पहिल्या मेडिसिटीच्या कोनशिलेचं अनावरण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झालं. भारत - ब्रिटनचा हा संयुक्त प्रकल्प आहे. देशात अशा प्रकारच्या ११ मेडिसीटी उभारण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोव्हेंबर २०१५ मधल्या ब्रिटन दौऱ्यात अशा प्रकारच्या मेडिसीटी उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. या मेडीसिटीमध्ये हजार खाटांचे रुग्णालय बांधण्यात येणार असून वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज तसंच विविध क्रीडा प्रकार, प्राणायम, योगा यांच्या माध्यमातून सुविधा पुरविण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलतांना सांगितलं. येत्या तीन वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती पाहता सरकारने राज्यात टंचाईसदृष्य परिस्थिती जाहीर करावी आणि त्वरित उपाययोजना सुरु कराव्यात अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष शुभारंभ सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी ते काल औरंगाबादला आले होते, त्यावेळी ते वार्ताहरांशी बोलत होते. तीन महिन्यांपासून पावसाने ओढच दिली असून यामुळे पिकं उद्ध्वस्त होत आहेत. सरकारने वेळीच उपाययोजना सुरु करण्याची गरज असल्याचं ते यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी बोलतांना केला.

****

स्वातंत्र्यदिनी गावांमध्ये होणाऱ्या ग्रामसभांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-मनरेगा अंतर्गत आपल्या गावात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासह लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी जास्तीत जास्त कामं मंजूर करुन घ्यावीत असं आवाहन रोजगार हमी योजना  मंत्री जयकुमार रावल यांनी केलं आहे. या योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून चालू वर्षासाठी तीन हजार कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होत असल्याचं  ते म्हणाले.

****

जम्मू काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत चार जवानांना वीरमरण आलं. शोपिया जिल्ह्यात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळताच जवानांनी शोधमोहीम सुरु केली होती. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तीन जवान हुतात्मा झाले. हुतात्मा जवानांमध्ये महाराष्ट्राच्या सुमेध गवई यांचा समावेश आहे. जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले.

****

स्वातंत्र्या दिनाच्या पूर्व संध्येला सायंकाळी ७ वाजता आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद देशवासियांना संबोधित करणार आहेत. राष्ट्रपती झाल्यानंतर कोविंद प्रथमच राष्ट्राला संबोधित करत असून आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून त्यांचं हे भाषण प्रसारित केलं जाणार आहे

****

इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला कालपासून औरंगाबादमधून प्रारंभ झाला. काँग्रेसचे नेते राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन काल झालं. या कार्यक्रमात इंदिरा गांधी यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्यासाठी तयार करण्यात चित्रफीत दाखवण्यात आली. यावेळी बोलतांना आझाद यांनी इंदिरा गांधी यांचं जीवन संघर्षपूर्ण होतं, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या या संघर्षातून प्रेरणा घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

अंबाजोगाई इथं येत्या २३ आणि २४ डिसेंबरला होणाऱ्या ३९व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार रंगनाथ तिवारी यांची निवड करण्यात आली आहे. परिषदेच्या कार्यकारिणीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, मराठवाडा साहित्य परिषदेचा जीनवगौरव पुरस्कार यंदा, परिषदेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष मधुकर अण्णा मुळे यांना जाहीर झाला आहे. २९ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद इथं, परिषदेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात मुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.   

****

भारत - श्रीलंका कसोटी क्रिकेट मालिकेत कॅन्डी इथं सुरू असलेल्या तिसऱ्या सामन्यात  श्रीलंका संघाला फॉलो ऑन देत, भारतानं सामन्यावर पकड मजबुत केली आहे. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात अवघ्या १३५ धावांवर सर्वबाद झाला. त्यापूर्वी काल सकाळी भारताचा पहिला डाव संपुष्टात आला. हार्दिक पंड्याचं ९६ चेंडूत सात षटकार आणि आठ चौकारांनी साकारलेल्या एकशे आठ धावा तसंच शिखर धवनच्या ११९ धावांच्या बळावर भारतानं पहिल्या डावात ४८७ धावा केल्या. कालचा खेळ थांबला तेव्हा श्रीलंका संघाच्या दुसऱ्या डावात, एक बाद १९ धावा झाल्या होत्या.

****

औरंगाबाद - पुणे मार्गावर गंगापूर फाट्याजवळ खासगी बस आणि जीप यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात जीपमधील काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय चौपाने यांचा मृत्यू झाला तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले. काल संध्याकाळी सहा वाजता ही घटना घडली. चालकाचं जीपवरील नियंत्रण सुटून ती प्रथम दुभाजकाला धडकून बाजूच्या रस्त्यावरुन औरंगबादकडे येणाऱ्या बसला धडकली. जीपमधील सर्वजण औरंगाबाद इथं आयोजित दिवंगत इंदिरा गांधी जन्मशताब्दी  सोहळ्यात सहभागी होऊन मुंबईला परत जात होते. जखमींवर औरंगाबाद इथं उपचार सुरु आहेत.

****

शेतकरी कर्जमाफी तसंच हमीभाव यावरून शेतकरी संघटंनाना दिलेली आश्वासन पूर्ण न केल्याच्या पार्श्वभूमीवर सुकाणू समिती आज राज्यभर चक्काजाम आंदोलनं करणार आहे. या आंदोलनाची संपूर्ण तयारी झाली असल्याचं आयोजकांच्या वतीन सांगण्यात आलं आहे.

****

जमिएत ए उल्मा  हिंदच्या वतीनं काल जालना इथं शांती मार्च काढण्यात आला. शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू झालेल्या या शांतता फेरीची सांगता सरस्वती भुवन शाळेजवळ झाली. परभणी जिल्ह्यात सोनपेठ, आणि औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड इथंही अशाच प्रकारची शांतता फेरी काढण्यात आली.

****

महिला लोकप्रतिनिधींनी मौनी न राहता त्यांच्या कामाच्या वेळेचं योग्य नियोजन करुन, जनतेचे प्रश्न मांडून विकास प्रक्रियेत सहभागी व्हावं असं आवाहन, भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या राष्ट्रीय सचिव कुमुदिनी भार्गव यांनी केलं. महिला लोकप्रतिनिधींसाठी ‘चला संधीचं सोनं करु या’ या कार्यशाळेचं आयोजन भारतीय स्त्री संघटनेच्या लातूर शाखेनं केलं होतं, त्यात त्या बोलत होत्या. लातूरचे महापौर सुरेश पवार यांनी या कार्यशाळेचं उद्घाटन केलं. त्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक शाखेच्या अध्यक्ष लीला कारवा या होत्या.

****

औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातल्या ठाकरवाडी इथं काल आदिवासी ठाकर आणि भिल्ल समाज जनजागृती मेळावा घेण्यात आला. दारिद्र्य असलेला, डोंगर वस्तीवर राहणारा आणि शिक्षणापासून वंचित असलेल्या या समाजाच्या प्रलंबित मागण्या शासन दरबारी पूर्ण करण्याचा विचार या मेळाव्याच्या निमित्तानं मांडण्यात आला. संशोधक डॉक्टर रमेश सुर्यवंशी यांनी सह्याद्रीचे खोरे, नाशिक, इगतपुरी, पुणे, खान्देश, कन्नड आदी ठिकाणी जाऊन आदिवासी समाजाची माहिती संकलित करण्यात आल्याची माहिती दिली.

****

ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक पंडीत नाथराव नेरळकर यांना लोकनेते विलासराव देशमुख स्मृती संगीत कलारत्न पुरस्कार जाहिर झाला आहे. मराठवाडा संगीत कला अकादमीतर्फे हा पुरस्कार दिला जातो. विशेष कार्यक्रमाचं आयोजन करुन नेरळकरांना पुरस्कार प्रदान होईल अशी माहिती अकादमीचे अध्यक्ष तालमणी डॉक्टर राम बोरगावकर यांनी काल दिली.

****

हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. बहुतांश भागात रिमझीम पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

****

No comments:

Post a Comment