▼

Monday, 14 August 2017

AIR News Bulletin, Aurangabad 14.08.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 AUG. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ ऑगस्ट २०१७ दुपारी १.००वा.

****

उत्तराखंड मधल्या पिथोरागढ जिल्ह्यात आज ढगफुटी झाली असून, त्यात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, बचाव कार्य सुरु आहे. मृत लोकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतांमध्ये भारत - तिबेट सीमा पोलिस आणि सशस्त्र सेना बलाच्या जवानांचा समावेश आहे.

****

हिमाचल प्रदेशातल्या मंडी इथं झालेल्या भुस्खलनात आतापर्यंत ४६ मृतदेह बाहेर काढण्यात आलं .गेल्या शनिवारी मंडी जिल्ह्यात मनाली पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावर भुस्खलन झालं होतं. अजुनही बचाव कार्य सुरु असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे.

****

नेपाळमध्ये सतत सुरु असलेला पाऊस आणि पुरामुळे भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. यात ६६ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. २८ जण जखमी असून, ५३ नागरिक बेपत्ता आहेत. मुसळधार पावसानं २२ जिल्ह्यांचं जनजीवन विस्कळीत झालं असून, अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

दरम्यान, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी, नेपाळचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री कृष्ण बहादूर महारा यांच्याशी संपर्क करुन भारत नेपाळ सीमेवरच्या पूर परिस्थितीवर चर्चा केली.

****

देशातही काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु असून, पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. बिहारमध्ये पुराशी संबंधित घटनांमध्ये १६ जणांचा मृत्यू झाला. किशनजंग, पूर्णिया, अररिया आणि कटिहार जिल्ह्यांना पुराचा फटका बसला असून, बचाव कार्य सुरु आहे.

आसाम मध्येही दोन हजार सातशे गावांना पुराचा फटका बसला आहे. लष्कर, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलानं सुरु केलेल्या बचाव कार्यात आतापर्यंत चार हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

मेघालय मध्येही मुसळधार पाऊस सुरु असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे.

****

निर्मित उत्पादनांची निर्यात वाढवण्याची गरज असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री निर्मला सितारामन यांनी म्हणलं आहे. चेन्नई इथं एका कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. उत्पादन उद्योग वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या पाहिजे, असं त्या म्हणाल्या.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर रस्त्यावर भोंडला फाटा इथं आज बस आणि चारचाकी गाडीच्या अपघातात काँग्रेसचे राज्याचे सचिव संजय चापाणे यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात नवी मुंबईचे उपमहापौर रमाकांत म्हात्रे गंभीर जखमी झाले असून, त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. औरंगाबाद इथला कार्यक्रम आटोपून हे दोघं पुण्याकडे जात होते.     

****

लातुरच्या बाजार समितीत आता ई - लिलाव सुरु करण्यात आले असून, सुरुवातीला करडी, सूर्यफूल आणि भुईमूग या तीन शेती उत्पादनांची ई - लिलावासाठी निवड करण्यात आली आहे. ई - लिलावासाठी १६ हजार शेतकरी, १२०० आडते आणि ४५० व्यापाऱ्यांची नोंद करुन घेतली आहे. हळूहळू सगळ्याच शेतीमालाचे ई - लिलाव केले जातील, असं बाजार समितीचे सभापती ललीतभाई शहा यांनी सांगितलं.

****

अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीनं येत्या तीन सप्टेंबर रोजी लातुर इथं लिंगायत धर्म महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. लिंगायत धर्माच्या संवैधानिक मान्यतेसाठी आणि लिंगायतांना राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

****

पुण्यात पार पडलेल्या राष्ट्रीय पेंटॅथलॉन अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघानं ६५ पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. राजस्थाननं दुसरा, तर उत्तर प्रदेशनं तिसरा क्रमांक पटकावला. स्पेनमध्ये होणाऱ्या जागतिक बायथले आणि ट्रायथले स्पर्धेसाठी भारताचा संघ या स्पर्धेतून निवडला जाणार आहे. 

****

श्रीलंकेसोबत होणाऱ्या एकदिवसीय अणि ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. निवड समितीनं महेंद्र सिंग धोनीचा संघात समावेश केला असून, युवराज सिंगचा संघात समावेश केला नाही. कर्नाटकचा फलंदाज मनिष पांडे आणि गोलंदाज शार्दूल ठाकुर यांचं संघात पुनरागमन झालं आहे. अक्षर पटेल, रोहीत शर्मा, यजुवेंद्र चहल आणि जसप्रित बुमराहला संघात घेतलं असून, मोहम्मद शमी, उमेश यादव, रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजासह वरीष्ठ गोलंदाजांना आराम देण्याचा निर्णय निवड समितीनं घेतला आहे. पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका येत्या २० ऑगस्टपासून सुरु होणार असून, एकमेव ट्वेंटी ट्वेंटी सामना सहा सप्टेंबरला होणार आहे.

****

दरम्यान, भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याचा आजचा तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला असून, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात चार बाद ९५ धावा झाल्या. मोहम्मद शमीनं दोन, तर रविचंद्रन अश्विन आणि उमेश यादवनं प्रत्येकी एक बळी घेतला. भारत २५७ धावांनी आघाडीवर आहे.  

****


No comments:

Post a Comment