Saturday, 5 August 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 05.08.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 AUG. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

                                       Language Marathi      

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० मि.

****

** उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान

** सरकारी नोकरीत बढतीसाठी असलेलं ३३ टक्क्के आरक्षण रद्द

** गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक; विधान परिषदेचं कामकाज नऊ वेळा तहकूब

** मृत्यूची नोंदणी करतानाही आता आधार कार्ड अनिवार्य

आणि

** औरंगाबाद जिल्ह्यात गवळी शिवरा इथं आयोजित १७० व्या हरिनाम सप्ताहाची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सांगता; भक्तांचा सहभाग तसंच प्रसाद वाटपाचे जागतिक विक्रम

****

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत संसदेत मतदान होणार असून, त्यानंतर लगेच मतमोजणी होणार आहे. संध्याकाळी सात वाजेपर्यंत निकाल हाती येणं अपेक्षित आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार एम व्यंकय्या नायडू आणि विरोधी पक्ष आघाडीचे उमेदवार गोपालकृष्ण गांधी यांच्यात ही निवडणूक होणार आहे. विद्यमान उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ येत्या १० ऑगस्टला पूर्ण होत आहे.

****

सरकारी नोकरीत बढतीसाठी असलेलं ३३ टक्क्के आरक्षण मुंबई उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवलं आहे. काल यासंदर्भात झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायालयानं, आरक्षणाचा हा निर्णय रद्द ठरवत, पदोन्नतीविषयी आवश्यक फेरबदल करण्याची प्रक्रिया येत्या १२ आठवड्यात पूर्ण करण्याचे आदेशही दिले. दरम्यान,या निकालामुळे सरकारी सेवांमध्ये गेल्या १३ वर्षांपासून अनुसूचित जाती जमाती, विशेष मागासवर्गीय जाती, भटके विमुक्त आणि इतर मागासवर्गीयांना देण्यात आलेल्या बढत्या रद्द होणार आहेत. सन २००१ मध्ये तत्कालीन सरकारनं या आरक्षणासंबधीचा कायदा करून, २००४ मध्ये या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली होती.

****

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरल्यानं विधीमंडळाच्या कामकाजात काल अनेकवेळा व्यत्यय आला. विधानसभेत झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज सुरवातीला १५ मिनिटांसाठी तहकूब झालं. मेहता यांच्याबाबत अनेक गंभीर प्रकरणं पुढे येत असून, खडसे आणि मोपलवारांप्रमाणेच मेहता यांनाही पदावरुन हटवून चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी केली. विरोधी पक्षांची चर्चेची मागणी अमान्य करत अध्यक्षांनी प्रश्नोत्तरांचा तास पुकारल्यानं विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला.



विधान परिषदेत या मुद्यावरून नऊ वेळा कामकाज तहकूब झालं. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी, मेहता यांच्या राजीनाम्याशिवाय कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका घेतली. सभागृह नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, यासंदर्भात मुख्यमंत्री मंगळवारपर्यंत उत्तर देतील, असं सांगत विरोधकांकडून सदनाची आचारसंहिता पाळली जात नसल्याचा आरोप केला.



दरम्यान, आपल्याबद्दल मुख्यमंत्री घेतील तो निर्णय मान्य असेल, असं गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी म्हटलं आहे. ते काल विधानभवनाबाहेर पत्रकारांशी बोलत होते. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण मागितलेलं नाही, विचारणा झाल्यास, खुलासा करू, असं मेहता म्हणाले.

****

आधुनिक महाराष्ट्राचा राजकारण आणि समाजकारण शरद पवार यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. शरद पवार आणि गणपतराव देशमुख यांच्या संसदीय कारकिर्दीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काल विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात गौरव प्रस्ताव मांडताना, ते बोलत होते. शेती, सामाजिक न्याय, ग्रामीण विकास, क्रीडा आदी क्षेत्रात पवार यांनी मोठं योगदान दिलं, तर देशमुख म्हणजे महाराष्ट्राचा अभ्यास असलेलं चालतं बोलतं विद्यापीठ आहे, या शब्दात फडणवीस यांनी त्यांचा गौरव केला.

****

प्राथमिक शिक्षकांकरता किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून शिक्षक पात्रता परीक्षा - टी. ई. टी अनिवार्य केली असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल विधानसभेत दिली. डी. एड. आणि बी. एड. ही शैक्षणिक योग्यता असून, टी. ई. टी. ही पात्रता परीक्षा आहे, शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे ही परीक्षा लागू केली असल्याचं ते म्हणाले.

****

काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या वाहनावरचा भ्याड हल्ला ही लोकशाहीला काळीमा फासणारी घटना असून, सरकारनं हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. गुजरातमध्ये बनासकाठा इथं पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी गेलेले राहुल गांधी यांच्या वाहनावर काल दगडफेक झाली. त्यापार्श्वभूमीवर चव्हाण बोलत होते. राजकीय व्यवस्थेत अनैतिकता प्रबळ होत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

****

विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. २०१६ साली मॅग्नेटिक महाराष्ट्र करार झाले, उद्योगधंद्यांना हवी असलेली जमीन मिळत नव्हती, औद्योगिक विकास महामंडळांची अधिसूचित जमिनीपैकी ६० टक्के जमीन वगळण्याचा निर्णय देसाई यांनी घेतला असा आरोप करत मुंडे यांनी देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली. देसाई यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.

****

मृत्यूची नोंदणी करतानाही आता आधार कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. गृह मंत्रालयानं ही माहिती दिली. एक ऑक्टोबर २०१७ पासून हा नियम लागू होणार असल्याचंही मंत्रालयानं सांगितलं आहे. मृत व्यक्तीबाबतच्या माहितीची अचुकता पडताळण्यासाठी तसंच यासंदर्भातल्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सरकारनं म्हटलं आहे.

****

आयकर विवरणपत्र भरण्याचा आज अखेरचा दिवस आहे, विवरणपत्र भरण्याची ही मुदत या आधी ३१ जुलै रोजी संपणार होती. मात्र करदात्यांच्या सुविधेसाठी पाच दिवस मुदतवाढ देण्यात आली होती

****

हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याचा दुसऱ्या दिवस अखेर श्रीलंकेच्या दोन बाद ५० धावा झाल्या. रविचंद्रन अश्विननं दोन बळी घेतले. तत्पूर्वी भारतानं आपला डाव ६२२ धावांवर घोषित केला.

****

जागतिक फुटबॉल महासंघाची १७ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात भारता होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या शाळांमध्ये येत्या आठ सप्टेंबर रोजी दहा लाख मुले मुली फुटबॉल खेळणार असल्याचं क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्र मिशन वन मिलियन - फुटबॉल क्रांती नावाच्या या अभियानासाठी तीस हजारावर शाळांमध्ये एक लाख फुटबॉलचं वाटप करण्यात आल्याचं, तावडे यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यात श्री क्षेत्र गवळी शिवरा इथं आयोजित योगीराज गंगागिरी महाराज यांच्या १७० व्या अखंड हरिनाम सप्ताहाची काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सांगता झाली. या सप्ताहामध्ये एकाच वेळी दहा लाख भक्तांनी सत्संगात सहभागी होण्याचा तसंच एकाच वेळी दहा लाख भक्तांना प्रसादाच्या स्वरुपात आठ मिनिटां बुंदीचे लाडू वाट, असे दोन जागतिक विक्रम घडले. या विक्रमाचं प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं.

या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा आढावा घेतल्याचं वृत्त आहे. दरम्यान काल दिवसभरात या कारवाईत एक धार्मिक स्थळ हटवण्यात आलं.

****

पीकविमा भरण्याची मुदत काल रात्री बारा वाजता संपली. बीड इथं काल सायंकाळपर्यंत पाच लाख सत्तावन्न हजारावर शेतकऱ्यांनी ७१२ केंद्रांवर पीकविम्याचा हप्ता जमा केला. जिल्हा अग्रणी बँकेकडून ही माहिती देण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

लातूर महानगर पालिकेनं मुख्यमंत्र्यांकडे खास बाब म्हणून ९९ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी केली आहे. विशेष रस्ता अनुदान, पायाभूत सुविधा योजना तसंच विशेष अनुदान या माध्यमातून हा निधी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनामार्फत करण्यात आली. या मागणीचं निवेदन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे देण्यात आलं. अंतर्गत रस्ते दुरुस्ती, तसंच व्यापारी संकुल उभारण्याकरता या निधीची आवश्यकता असल्याचं, या पत्रात म्हटलं आहे.

*****

केंद्र शासनाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या ‘खुले में शौच से आजादी’, तसंच राज्य शासनाच्या ‘संकल्प स्वच्छतेचा स्वच्छ महाराष्ट्राचा’ या अभियानासंदर्भात काल नांदेड इथं जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केलं. शौचालयं बांधून गाव स्वच्छ ठेवणं ही सरपंच आणि ग्रामसेवकांसह ग्राम पंचायत सदस्य आणि गावस्तरावरच्या विविध समित्यांची जबाबदारी असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले.

****

येत्या नऊ ऑगस्टला मुंबई इथं आयोजित केलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर काल परभणी शहरात दुचाकी फेरी काढण्यात आली. नागरिक मोठ्या संख्येनं या दुचाकी फेरीत सहभागी झाले. जालना शहरातूनही या निमित्तानं दुचाकी फेरी काढण्यात आली.

****

दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यानं औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना शासनानं बडतर्फे केलं आहे. कडूस यांना तीन अपत्ये असून त्यापैकी एक अपत्य दत्तक दिलं असल्याचं प्रतिज्ञापत्र कडुस यांनी सादर केलं होतं. या संदर्भात शासन स्तरावर चौकशी सुरू होती, त्या दरम्यान, काल त्यांना बडतर्फ करण्यात आलं.

****

बेटी बचाओ बेटी पढाओ हा कार्यक्रम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचं, बीड इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायाधीश प्राची कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. बीड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानं कपिलधार इथं आयोजित कायदेविषयक जनजागरण शिबीरात त्या बोलत होत्या.

****

जायकवाडी धरणातला पाणीसाठा साडे ५२ टक्क्यांवर पोहोचला आहे. काल सायंकाळी धरणातला जिवंत पाणी साठा एक हजार १३६ दशलक्ष घनमीटर वर पोहोचला.

****

No comments:

Post a Comment