Tuesday, 1 August 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 01.08.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 1 August 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ ऑगस्ट २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

दहीहंडीची उंची वाढवण्याबद्दलची याचिका सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयात वर्ग केली आहे. त्यामुळे या याचिके संदर्भात यापुढची सुनावणी येत्या सात ऑगस्टला मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. उच्च न्यायालयानं २०१४ साली दहीहंडीची उंची २० फुटांहून कमी आणि गोविंदांचं वय १८ वर्षांहून जास्त ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र दहीहंडी आयोजकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत, सुरक्षेची हमी घेत असल्याचं सांगत, दहीहंडीची उंची वाढवण्याची परवानगी मागितली होती. यंदा येत्या १५ ऑगस्टला दहीहंडी उत्सव साजरा होत आहे.

****

ईशान्येकडच्या राज्यांमध्ये आलेल्या पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्यांसाठी दोन हजार ३५० कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. पंतप्रधानांनी आज गुवाहाटी इथं घेतलेल्या आढावा बैठकीत ही घोषणा केली. दरम्यान, आसामसह राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगालमध्ये पूर परिस्थिती कायम असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे.

****

पीक विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्याची मागणी हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी केली आहे. ते आज लोकसभेत बोलत होते. शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी, तसंच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, असंही सातव यांनी नमूद केलं.

****

पीक विमा योजनेसाठी येत्या पाच ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. मात्र यानंतर मुदतवाढ देता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज कामकाज सुरु होताच पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या असून, त्यामुळे या योजनेला मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली. या योजनेसाठी पैसे भरण्याची पूर्वीची ऑनलाईन पद्धत वाढत्या गर्दीमुळे ऑफलाईन केल्याची माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.

****

राज्यात थॅलेसेमिया आजाराचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि दोन सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांची देखरेख समिती स्थापन करण्यात येईल, असं आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. याविषयावरच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. थॅलेसेमिया रुग्णांसाठी राज्यातल्या काही जिल्ह्यात केंद्र सरकारचा प्रकल्प पाच वर्षांसाठी प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येत असून, त्यानंतर हा प्रकल्प संपूर्ण राज्यभरात राबवणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली.

पैठणी साडीला वस्तू आणि सेवा करातून सवलत देण्याची शिफारस वस्तू आणि सेवा कर - जीएसटी परिषदेकडे करणार असल्याचं अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं.

****

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज विधानभवनात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिळक आणि साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी अनेक मंत्री आणि आमदार उपस्थित होते.

औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातही विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं

****

येत्या नऊ ऑगस्टला मुंबई इथं होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज औरंगाबाद शहरातून वाहन फेरी काढण्यात आली. कोपर्डी प्रकरणातल्या आरोपींना फाशी, मराठा आरक्षण आदी प्रमुख मागण्यांसाठी मुंबई इथं भव्य मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांच्या ८२४ व्या जयंतीनिमित्त आज औरंगाबाद शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. पैठण दरवाजा ते संस्थान गणपती मंदीर या मार्गावर निघालेल्या या शोभायात्रेत नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

****

नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ३१ ऑगस्टनंतर ते अमेरिकेत शैक्षणिक कार्यात सहभागी होणार आहेत. देशाच्या विकास प्रक्रियेची दिशा ठरवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी नीती आयोगाची स्थापना केली होती. पानगढिया नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते.

****

मराठवाडा विकास आंदोलनातले मार्गदर्शक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार हेमराज जैन यांचं आज परभणी इथं वृद्धापकाळानं निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. मराठवाडा कृषी विद्यापीठ निर्मिती आंदोलनातलं त्यांचं मोलाचं योगदान होतं. ते मॉडेल एज्यूकेशन सोसायटीचे सचिवही होते.

****

जायकवाडी धरणातला पाणीसाठा ५० टक्क्यांवर पोहोचला आहे. आज दुपारी चार वाजता धरणातला जिवंत पाणी साठा एक हजार ८५ दशलक्ष घनमीटर वर पोहोचला असून, धरणात सध्या तेरा हजार तीनशे तेहतीस घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे.

****

No comments:

Post a Comment