▼

Sunday, 13 August 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 13.08.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 AUG. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ ऑगस्ट २०१७ दुपारी १.००वा.

****

मुस्लिम धार्मातल्या तिहेरी तलाक, निकाल हलाला आणि बहुपत्नीत्व या प्रथांच्या संवैधानिक वैधतेला आाव्हान देणाऱ्या आणखी एका याचिकेवर सुनावणीला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. हे प्रकरण पहिल्यापासूनच न्यायप्रविष्ट असून, त्या प्रलंबित याचिकांवरचा निर्णय या नव्या याचिकेलाही लागू होईल, असं न्यायालयानं सांगितलं आहे. पाच न्यायाधिशांच्या संविधान पीठानं संवैधानिक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरचा निर्णय १८ मे रोजी राखून ठेवला होता.

****

रेल्वे मंडळाच्या वतीनं आज वेगवेगळ्या रेल्वे मार्गांवर नवीन रेल्वेसेवा सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, ओडिशा, बिहार, पंजाब, दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात आणि जम्मू काश्मीर राज्यातल्या मार्गांचा समावेश आहे. तर काही गाड्यांच्या फेऱ्याही वाढवण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आज मुंबईहून काही गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

****

आसाम मध्ये मुसळधार पाऊस सुरु असून, एक हजार ७००हून अधिक गावांना पूराचा फटका बसला आहे. राज्यात पूराशी संबंधित घटनांमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रम्हपुत्रासह अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पश्चिम बंगालमध्येही मुसळधार पाऊस सुरु असून, राज्याच्या उत्तरेकडच्या भागातल्या पाच जिल्हयांना पुराचा फटका बसला आहे. या भागातले शंभरहून अधिक चहाचे मळे पाण्याखाली गेले आहेत.

****

जम्मू काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत चार जवानांना वीरमरण आलं. शोपिया जिल्ह्यात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळताच जवानांनी शोधमोहीम सुरु केली होती. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तीन जवान हुतात्मा झाले. काल रात्रभर ही चकमक सुरु होती. शहीद जवानांमध्ये महाराष्ट्राच्या सुमेध गवई यांचा समावेश आहे.

तर दुसरीकडे पुंछ जिल्ह्यात पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत सीमेपलिकडून गोळीबार केला. यावेळी एक जवान शहीद झाला. भारतीय जवानांनीही या हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर दिलं.

****





छत्तीसगड मध्ये सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. जिल्हा राखीव दल आणि विशेष पथकाच्या संयुक्त कारवाईत हे नक्षलवादी ठार झाले. त्यांच्याजवळून दोन बंदूक आणि अन्य सामग्री जप्त करण्यात आली आहे.

****

झारखंड विधानसभेत धार्मिक स्वतंत्रता विधेयक २०१७ पारित करण्यात आलं. राज्यात बळजबरीनं होणारं धर्मांतर थांबवणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. राज्यपालांच्या मंजुरीनंतर हे विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येईल. या विधेयकात अल्पवयीन, महिला, किंवा अनुसूचित जाती आणि जमातीच्या व्यक्तीला धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्यास तीन वर्षांची शिक्षा किंवा ५० हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे.

****

येत्या मंगळवारी साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज संहितेचं काटेकोर पालन करावं, असं शासनाकडून सांगण्यात आलं आहे. प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरु नये, तसंच कार्यक्रम झाल्यानंतर मैदानात पडलेले, खराब झालेले राष्ट्रध्वज गोळा करुन जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयात जमा करण्याचं आवाहनही गृह विभागानं केलं आहे.

****

अधिभार मुक्त आणखी साखर आयात करण्याची कोणतीही योजना नसल्याचं अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी स्पष्ट केलं आहे. साखरेची सध्याची मागणी पूर्ण करण्यासाठी देशात पुरेसा साठा असल्याचं त्यांनी सांगितलं. साखरेचा पुरवठा सुरळीत व्हावा आणि स्थिर किंमतींची खात्री करण्यासाठी कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम लवकर सुरु करावा अशी सूचना पासवान यांनी केली.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सार्वजनिक गणेश मंडळांना गणेशोत्सवाची वर्गणी जमा करण्यासाठी औरंगाबादच्या सहायक धर्मादाय आयुक्त आणि धर्मादाय उपआयुक्तांची परवानगी घेणं आवश्यक करण्यात आलं आहे. त्यासाठी संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीनं अर्ज सादर करावे, असं आवाहन धर्मादाय सहआयुक्त एस. वाय. भोसले यांनी केलं आहे. ही परवानगी नि:शुल्क असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

पुण्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय पँटॅथलॉन स्पर्धेत यजमान महाराष्ट्र संघाचं वर्चस्व आहे. काल वरिष्ठ गटात पुरुषांमध्ये महाराष्ट्राच्या ओंकार कुचिकनं २०० मीटर जलतरण आणि १६०० मीटर धावणे प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. कनिष्ठ गटात महाराष्ट्राच्या अजिंक्य बालवडकरनं अव्वल स्थान पटकावलं. युवा अ गटातल्या मुलांच्या शर्यतीतही महाराष्ट्राचा यश जाधव प्रथम आला.

****

भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या हार्दिक पंड्यानं शतक झळकावलं. कसोटी क्रिकेटमध्ये पंड्याचं हे पहिलंच शतक आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या नऊ बाद ४८७ धावा झाल्या होत्या. हार्दिक पंड्या १०७, तर उमेश यादव तीन धावांवर खेळत आहे.

****


No comments:

Post a Comment