▼

Monday, 14 August 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 14.08.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 14 August 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ ऑगस्ट २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

देशाचा ७१वा स्वातंत्र्यदिन उद्या साजरा होत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज सायंकाळी सात वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद देशवासियांना संबोधित करणार आहेत. राष्ट्रपती झाल्यानंतर कोविंद प्रथमच राष्ट्राला संबोधित करत असून, आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून त्यांचं हे भाषण प्रसारित केलं जाणार आहे.
दरम्यान, दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असून, दिल्लीत चोख सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

****

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पदभार स्विकारल्यानंतर सहा महत्त्वपूर्ण विधेयकांना मंजूरी दिली आहे. यात नौवहन (सागरी कार्यकक्षा आणि तडजोड दावे) विधेयक, मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण हक्क दुरुस्ती विधेयक, सांख्यिकी संग्रह दुरुस्ती विधेयक आदी विधेयकांचा समावेश आहे.

****

घटनेच्या ३५ अ या कलमाला आव्हान देणारी प्रलंबित याचिका तीन न्यायमूर्तींच्या पीठासमोर सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयानं सुचीबद्ध केली आहे. जम्मू काश्मीरच्या नागरिकांबाबत हा अनुच्छेद प्रासंगिक असेल, तर संविधान पीठासमोर त्याबाबत विचार होऊ शकतो, असं मत पीठानं व्यक्त केलं.

****

दुष्काळ मदतीचं वाटप व्यवस्थित होण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक त्यांच्या सातबाराला जोडावा, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबई इथं दुष्काळ व्यवस्थापन संहितेच्या बैठकीत बोलत होते. शेतकरी कर्जमाफीसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांच्या माहितीची आधार क्रमांकाशी जोडणी होणार असून, यामुळे शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण अंतर्गत दुष्काळ मदतीचं वितरण करता येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. दुष्काळ जाहीर करण्याबाबतच्या निकषांमध्ये लवचिकता असावी, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.

****

दरम्यान, बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या नमो युवा रोजगार केंद्राचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यावेळी उपस्थित होते. या युवा रोजगार केंद्राअंतर्गत शेतकऱ्यांसाठी साप्ताहिक बाजार, फिरता बाजार आणि मदर्स टिफीन योजना यासारखे रोजगारपुरक उपक्रमही राबवले जाणार आहेत.

****

शेतकरी कर्जमाफी तसंच हमीभाव यावरून शेतकरी संघटंनाना दिलेली आश्वासन पूर्ण न केल्याच्या पार्श्वभूमीवर सुकाणू समितीनं आज राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं. या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करून महामार्ग अडवण्यात आले. येवला, निफाड, इगतपुरीसह नाशिक शहारानजीक महिरावनी, पळसे याठिकाणी रास्ता रोको करण्यात आला, तर काही ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
नांदेड, सोलापूर, नंदुरबार इथंही चक्काजाम आंदोलन करण्यात आलं.

****

गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे मराठवाड्यात टंचाईसदृश परिस्थिती असल्यानं सर्व शासकीय यंत्रणांनी संवेदनशीलपणे काम करावं, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी दिला आहे. औरंगाबाद इथं लोकशाही दिन आणि टंचाई आढावा बैठकीत ते आज बोलत होते.
उद्या साजरा होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं प्रत्येक गावात ग्रामसभेचं आयोजन करुन सरकारच्या विविध योजनांची माहिती द्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकार्यांना दिले.

****

भारत आणि श्रीलंका यांच्यात कँडी इथं झालेला तिसरा आणि शेवटचा सामना भारतानं एक डाव आणि १७१ धावांनी जिंकला असून, तीन सामन्यांची मालिकाही तीन - शून्यनं जिंकली आहे. भारतानं शिखर धवन आणि हार्दिक पंड्याच्या शतकी खेळीच्या बळावर पहिल्या डावात ४८७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करत असताना श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात अवघ्या १३५ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर भारतानं श्रीलंकेला फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमीच्या भेदक गोलंदाजीमुळे श्रीलंकचा संघ १८१ धावांत सर्वबाद झाला. पहिल्या डावात कसोटी सामन्यातलं पहिलं शतक झळकावणारा हार्दिक पंड्या सामनावीर पुरस्काराचा, तर मालिकेत दोन शतकं झळकावणारा शिखर धवन मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
यानंतर पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार असून, पहिला सामना येत्या २० ऑगस्टला होणार आहे.

****

No comments:

Post a Comment