Friday, 18 August 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 18.08.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 AUG. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ ऑगस्ट २०१ दुपारी १.००वा.

****

राज्यातल्या खरीप पिकाखालील एकंदर ८५ टक्के क्षेत्रावर, म्हणजे अंदाजे चार लाख दोन हजार हेक्टर जमिनीवर आतापर्यंत पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, कोकण वगळता उर्वरित सर्व विभागात पुरेशा पावसाअभावी ही पेरणी धोक्यात आली आहे. यापैकी औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर विभागात पिकं करपून जाण्याचं संकट उभं राहिलं आहे. त्याचबरोबर पाण्याच्या साठ्याची परिस्थितीही चिंताजनक बनली आहे. येत्या दोन दिवसात राज्यात सर्वदूर मोसमी पाऊस पुन्हा सक्रीय होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

****

राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य विभागातली सात हजार रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया पूर्ण होत असून, २२ ऑगस्टनंतर या शंभर टक्के नियुक्त्यांमुळे आरोग्य विभागाला नवसंजीवनी मिळेल, असं मत सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त केलं. नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा इथल्या ग्रामीण रुग्णालयात आधुनिक ट्रॉमा केअर सेंटरचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

****

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळूनही तो निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी मिळणार आहे. आजपासून २२ ऑगस्टपर्यंत मिळालेल्या संस्थेत प्रवेश निश्चित करता येणार आहे. अद्याप प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षातली ही शेवटची संधी असून, यानंतर प्रवेशाची कोणतीही फेरी राबवणार नसल्याचं तंत्रशिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

****

सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला येत्या रविवारी २० तारखेला चार वर्ष पूर्ण होत आहेत. या चार वर्षात त्यांच्या मारेकऱ्यांचा तपास न लागल्याच्या निषेधार्थ २० ऑगस्टला निषेध जागर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख आणि सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी पुणे इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.

****

बिहारमध्ये पूर परिस्थिती अद्यापही गंभीर आहे. १८ जिल्ह्यातल्या एक कोटी पेक्षाही जास्त नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. पुराशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलाच्या ४३ तुकड्या बचावकार्य करत आहेत.

उत्तर प्रदेशातल्या चारसादी धरणाचा काही भाग खराब झाल्यानं गोंडा जिल्ह्यातल्या ५० गावांत पुराचं पाणी शिरलं आहे. मुसळधार पावसानं २२ जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

दरम्यान, आसाममध्ये पावसानं थोडी विश्रांती घेतल्यानं पूर परिस्थिती नियंत्रणात येत आहे.

****

बाहेरच्या किंवा अंतर्गत कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी आपला देश सक्षम असल्याचं केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. हैदराबाद इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते. भारताला विकसित आणि महान देश बनवण्यासाठी नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणं महत्वाचं असल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारला एक कठोर देखरेख आणि सुरक्षा प्रणाली विकसित करायची असल्याचं रिजिजू यांनी यावेळी सांगितलं.

****



तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश या समितीचे अध्यक्ष असतील, असं मुख्यमंत्री ई पलानिसामी यांनी सांगितलं होतं. जयललिता यांच्या चेन्नई इथल्या पोईस गार्डन निवासाला स्मारक बनवणार असल्याचंही ते म्हणाले.

****



औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूरच्या नगराध्यक्षपदावरुन सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवरची सुनावणी येत्या ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे. हे पद सर्वसाधारण महिलेसाठी ठेवण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिल्यानंतर त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. ऑक्टोबरमध्ये मुंबई इथं झालेल्या राज्यातल्या नगराध्यपदाच्या सोडतीत वैजापूरचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी असल्याचं जाहीर झालं होतं. त्यानंतर राज्याच्या नगरविकास विभागाने यात बदल करून नगराध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी करण्याचा निर्णय घेतला आणि तशी नोंद निवडणूक विभागाच्या राजपत्रात करण्यात आली. त्याविरुद्ध न्यायालयात हे आव्हान देण्यात आलं आहे.

****



फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन आणि चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर - सी एम आय ए यांच्या वतीनं औरंगाबाद इथं निर्यातीवरील वस्तू आणि सेवा कर या विषयावरच्या कार्यशाळेला आज सकाळी सुरुवात झाली. रेल्वे स्थानक औद्योगिक क्षेत्रातल्या सीएमआयए बजाज भवन इथं होत असलेल्या या एकदिवसीय कार्यशाळेत निर्यात व्यवहाराशी संबंधित अनेक पैलूंवर व्याख्यानं आणि चर्चासत्र होणार आहेत.

****

मराठी पत्रकार परिषदेची ४१ वी राष्ट्रीय परिषद उद्यापासून बुलडाणा जिल्ह्यात शेगाव इथं आयोजित करण्यात आली आहे. या दोन दिवसीय परिषदेत ग्रामीण, तसंच नागरी पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे.

****

No comments:

Post a Comment