Wednesday, 2 August 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 02.08.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 AUG. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ ऑगस्ट २०१ दुपारी १.००वा.

****

कर्नाटकचे ऊर्जा मंत्री डी के शिवकुमार यांच्या दिल्ली तसंच कर्नाटकातल्या घरांवर आयकर विभागानं आज छापा घालून आतापर्यंत सुमारे अकरा कोटी रुपये रोकड जप्त केली. शिवकुमार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दिल्ली तसंच कर्नाटकातल्या सुमारे ३९ मालमत्तांवर छापे घालून तपासकार्य सुरू असल्याचं, विभागाकडून सांगण्यात आलं. शिवकुमार यांच्या बंगळुरू इथल्या बंगल्यात गुजरातच्या ४४ आमदारांना कथितरित्या ठेवण्यात आलं असल्याचं वृत्त आहे.

शिवकुमार यांच्यावर आयकर विभागानं घातलेल्या या छाप्याचे आज राज्यसभेत पडसाद उमटले. काँग्रेसच्या सदस्यांनी या निषेधार्थ केलेल्या घोषणाबाजीमुळे सदनाचं कामकाज सुरू होताच, दहा मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं.

कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर शून्यकाळात काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी प्रसारमाध्यमांमध्ये काही व्यक्तींवर होत असलेल्या कारवाईकडे तर काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांनी महिला अत्याचाराच्या घटनांकडे सदनाचं लक्ष वेधलं. सभापती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी प्रश्नकाळ पुकारताच, सदस्यांनी पुन्हा गदारोळ सुरू केल्यानं, सभापतींनी कामकाज पुन्हा दहा मिनिटांसाठी तहकूब केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोर हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरूच ठेवल्यानं, सभापतींनी कामकाज दुपारी दोनवाजेपर्यंत स्थगित केलं.

शिवकुमार यांच्यावरील कारवाईचे लोकसभेतही पडसाद उमटले. काँग्रेस नेता मल्लिकार्जुन खरगे यांनी शून्यकाळापूर्वी हा मुद्दा उपस्थित करत, आयकर विभागाचे अधिकारी शिवकुमार यांच्या घरात राहत असलेल्या गुजरातच्या आमदारांना धमकावत असल्याचा आरोप केला.

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावत कर्नाटकच्या आमदारावर कारवाई सुरू आहे, संबंधित घरातून आयकर विभागानं फक्त शिवकुमार यांनाच ताब्यात घेतल्याचं सांगितलं. या कारवाईचा गुजरात निवडणुकीशी संबंध जोडू नये, असा खुलासाही जेटली यांनी केला.

मात्र त्यानंतरही सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोरच्या हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली. अध्यक्षांनी या गदारोळातच शून्यकाळाचं कामकाज सुरू ठेवलं.

देशभरातल्या तरुणांच्या विविध प्रश्नावर काम करण्यासाठी राष्ट्रीय युवा आयोग स्थापन करावा, अशी मागणी लोकजनशक्ती पक्षाचे खासदार चिराग पासवान यांनी केली आहे. ते आज लोकसभेत शून्यकाळात बोलत होते.

****

दरम्यान, राज्यसभेच्या गुजरातमधल्या रिक्त जागांच्या निवडणुकीत, मतपत्रिकेवर वरीलपैकी कोणी नाही, 'नोटा'- हा पर्याय देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला काँग्रेस पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. पक्षाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर उद्या गुरुवारी सुनावणी होणार आहे.

****

चालू आर्थिक वर्षाचा तिसरा द्वैमासिक पतधोरणा आढावा रिजर्व्ह बँक आज जाहीर करणार आहे. यासाठी रिजर्व्ह बँकेच्या सहा सदस्यीय मुद्रा धोरण समितीची दोन दिवसीय बैठक गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत सुरू झाली. या बैठकीतून निष्पन्न होणाऱ्या पतधोरण आढाव्याकडे उद्योगजगतासह शेअर बाजारांचंही लक्ष लागलं आहे. याआधी जूनमध्ये झालेल्या द्वैमासिक आढाव्यात समितीनं, रेपो दर, सलग चौथ्यांदा सव्वासहा टक्क्यावर कायम ठेवला होता.

****

आधार पत्र तयार करताना आधारधारकाची खाजगी माहिती गोपनीय राहण्यासाठी त्यात तशाप्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, त्यामुळे आधार क्रमांकावरून संबंधितांची खाजगी माहिती गोळा करणे अशक्य आहे, अशी माहिती आधार प्राधिकरणाचे प्रतिनिधी तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली. इंटरनेटच्या वापरानं हल्ली इतर काहीही गोपनीय राहत नसले, तरीही आधार संलग्न केल्यानं आधारधारकाच्या गोपनीयतेला धोका नाही, असं मेहता यांनी सांगितलं.

****

कृषी उत्पादनांची खरेदी विकृी सोपी व्हावी यासाठी केंद्र सरकारनं ई-रकम हे वेब पोर्टल सुरू केलं आहे. ई-रकम अर्थात ई-राष्ट्रीय किसान ॲग्री मंडी या पोर्टलच उद्घाटन अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान आणि पोलाद मंत्री चौधारी विरेंद्र सिंग यांच्या हस्ते काल झालं. गावगावातील शेतकऱ्यांना जगातील मोठ्या बाजारपेठांशी जोडणारे हे या प्रकारचं पहिलंच वेब पोर्टल आहे.

****

ोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पणजी विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या जागेसाठी येत्या २५ ऑगस्टला मतदान होणार आहे.

****

लातूर मुबंई एक्सप्रेस पूर्वीप्रमाणेच सुरु ठेवावी, त्या रेल्वेच बीदरपर्यंतचे विस्तारीकरण रद्द करावं, या मागणीसाठी रेल्वे बचाव कृती समितीने पुकारलेल्या शैक्षणिक बंदला आज अंशतः प्रतिसाद मिळाला. महाविद्यालय बंद पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शहरातली इतर शाळा महाविद्यालय सुरळीत सुरू असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments:

Post a Comment