Friday, 4 August 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 04.08.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 AUG. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

                                       Language Marathi      

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० मि.

****

** राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार यांना पदावरुन हटवण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा; गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची चौकशी करण्याचं आश्वासन

** राज्यभरातल्या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त

** औरंगाबाद शहरातली अनधिकृत धार्मिक स्थळांची आणखीन १० अतिक्रमणं काढली

आणि

** श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या ३ बाद ३४४ धावा

****

राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार यांना वादग्रस्त ध्वनिफितीची चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावरुन हटवल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. हिंदू या वृत्तपत्रात, पंतप्रधान कार्यालयानं मोपलवार यांच्यावर आक्षेप घेतल्याचं वृत्त आलं होतं, त्यावर शासनानं काय कारवाई केली, असा सवाल कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहाबाहेर वार्ताहरांशी बोलताना उपस्थित केला. मोपलवारांना फक्त पदावरुन हटवल्यानं विरोधकांचं समाधान झालं नाही.

गृहनिर्माण राज्यमंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी लावून धरलेली मागणी आणि लातूरमधल्या महिला तस्करीचा सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलेला मुद्दा यांचे तीव्र पडसाद विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल उमटले. यामुळे दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारीच दिवसभरासाठी तहकूब झालं.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी काल दुपारी सर्व पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावून सत्ताधाऱ्यांच्या बहिष्कार मुद्यावर तोडगा काढला, त्यानंतर कामकाज सुरु झालं. सर्व सदस्यांनी सहकार्य करुन विधान परिषदेची परंपरा कायम राखावी असं आवाहन सभापतींनी केलं. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरल्यानं सभागृहाचं कामकाज वारंवार तहकूब झालं होतं. मेहता यांची चौकशी करणार असं जाहीर करुनही विरोधक राजीनाम्याची मागणी करत आहेत, ही मागणी राजकीय हेतुनं प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.

राज्यातल्या लातूरसह १४ जिल्ह्यात लहान मुलींची तस्करी सुरू असून, सरकारचं लक्ष कुठे आहे, असा सवाल लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

लातूरमधल्या महिला तस्करी प्रकरणी काँग्रेसच्या पदाधिकारी अडकल्याचा मुद्दा सत्ताधारी पक्षांनी उपस्थित केला. यावर याप्रकरणी चौकशी सुरु असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलं.

      कर्जमुक्ती आंदोलनात शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे सरकारनं तात्काळ रद्द करावे, अशी मागणी शिवसेनेचे आमदार सुनिल प्रभू यांनी केली. शिवसेनेचे सर्व आमदार यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

मुंबईसह राज्यभरातल्या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातल्या जनतेला चांगले रस्ते देणं हे तुमचं कर्तव्य असूनही तुम्ही ते पार पाडत नाहीत ही लाजीरवाणी बाब आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव गमवावा लागतोय आणखी किती बळी हवेत, असा संतप्त सवाल करत मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लुर यांनी काल राज्य सरकार आणि महा नगरपालिकांना धारेवर धरलं. स्थानिक प्रशासन खड्ड्यांची दखल घेत नसेल तर नागरिकांनी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवांकडे आपल्या तक्रारी पोहोचवाव्यात अशी सूचनाही न्यायालयानं केली.

****

पॅरालिम्पिक खेळांमधे सुवर्ण पदक पटकावलेला देवेंद्र झांझरीया आणि भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंग यांची क्रिडा क्षेत्रातल्या सर्वोच्च राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी निवड समितीनं शिफारस केली आहे. तर अर्जुन पुरस्कारासाठी १७ खेळाडूंची शिफारस केली आहे. यात क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा आणि हरमनप्रित कौर, पॅरालिम्पिक पदक विजेता मरीयप्पन थंगवेलू आणि वरुण भाटी, गोल्फपटू एसएसपी चौरसिया आणि हॉकीपटू एस व्ही सुनिल यांच्या नावाचा समावेश आहे. यावर अंतिम निर्णय क्रिडा मंत्रालय घेणार आहे.

****

नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव सातत्यानं वाढत असून, आज दोन हजार ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. येवला इथल्या बाजार समितीत कांद्याला एक हजार ९०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला, तर लासलगाव इथं एक हजार ८७५ रुपये भाव मिळाला. राज्यात हा सर्वाधिक भाव असल्याचा दावा बाजार समितीचे सभापती अरुण वाघ यांनी केला आहे. बुधवारी बाजारात सुमारे सात हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.

****

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या घोटाळा प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करावी आणि दोषींवर कारवाई करून त्यांच्या मालमत्तांवर बोजा टाकून वसुली करावी असे निर्देश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं काल दिले. १४५ कोटींच्या या अपहार प्रकरणात बँकेचे तत्कालीन संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि काही शेतकरी असे तब्बल ५४५ लोक अडकलेले असून १३१ गुन्हे दाखल झाले आहेत.

****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

औरंगाबाद शहरातल्या अनधिकृत धार्मिक स्थळांच्या अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईत काल महानरपालिकेनं आणखीन १० अतिक्रमणं काढली. दरम्यान या कारवाईला आक्षेप घेत वक्फ मंडळानं दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी काल उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात झाली. अतिक्रमण हटवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं २००८ मध्ये दिला असतांना आतापर्यंत दाद का मागण्यात आली नाही, असा सवाल न्यायालयानं सुनावणी दरम्यान विचारला. शिवाय वक्फ मंडळाचे अधिकारी शासकीय कर्मचारी असताना खाजगी मालकीच्या धार्मिक स्थळांविषयी वक्फ मंडळ कशी काय दाद मागू शकते असा सवालही न्यायालयानं केला. याचिका मागे घेण्याबाबत विचारले असता वक्फ मंडळानं न्यायालयाकडे एक दिवसाचा कालावधी मागून घेतला आहे.

दरम्यान, बेकायदेशिर धार्मिक स्थळं काढून टाकण्याच्या महानगरपालिकेच्या मोहिमेची गंभीर दखल घेण्याची मागणी औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन केली. यामुळे औरंगाबाद शहरात कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. यावर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत महाधिवक्ता यांना या न्यायालयीन प्रकरणात लक्ष घालण्याची सूचना केली.

****

लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातल्या २६२ बोगस तुकड्या वाटप प्रकरणाच्या चौकशीत दोषी आढळलेल्या संबंधित अधिकारी, संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं काल दिले. या प्रकरणी गेल्या १३ डिसेंबर रोजी जनहित याचिका दाखल करण्यात झाली आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या कुंभारी इथं राजकीय वैमनस्यातून एक जणाच्या झालेल्या हत्या प्रकरणी ९ जणांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं काल जन्मठेपेची शिक्षा सुनावली.  गावातल्या १४ जणांनी विरोधी गटातल्या तिघा जणांना केलेल्या मारहाणीत एकाचा जागीच मृत्यू झाला होता.

****

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या नाबाद शतकांच्या जोरावर भारतानं श्रीलंकेविरुध्द दुसऱ्या कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवसअखेर तीन बाद ३४४ अशी भक्कम धावसंख्या उभारली. पुजारा १२८ धावांवर तर अजिंक्य रहाणे १०३ धावांवर खेळत असून, दोघांनी चौथ्या गड्यासाठी नाबाद २११ धावांची भागीदारी केली आहे. लोकेश राहुलनं ५७ धावा केल्या.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नळदुर्ग नजीक चारचाकी वाहन अडवून लुटणारा पोलीस उपनिरीक्षक अनिल किरवाडे आणि त्याचे साथीदार पोलीस हवालदार मनोज भिसे, शिपाई नरसिंग दिघोळे आणि राजू चव्हाण यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं असल्याचं पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी सांगितलं.

****


No comments:

Post a Comment