Tuesday, 8 August 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 08.08.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 08 AUG. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

                                       Language Marathi      

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० मि.

****

**  दही हंडी उत्सवावरचे सर्व निर्बंध मागे; १४ वर्षापेक्षा कमी वयाच्या गोविंदाचा सहभाग नाही

** कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बडतर्फ

** सर्व शेतकऱ्यांचे अर्ज भरून होईपर्यंत कर्जमाफीसाठीचे अर्ज भरण्याचे केंद्र सुरुच राहणार- सहकार मंत्री सुभाष देशमुख

आणि

** देशाची राज्य घटना वाचवण्याची जबाबदारी युवकांची - युवा नेता कन्हैय्याकुमार यांचं मत

****

राज्य सरकारनं १४ वर्षापेक्षा कमी वयाच्या गोविंदाला दही हंडी उत्सवाच्या खेळात सहभागी केले जाणार नाही अशी हमी दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं दही हंडी उत्सवावरचे सर्व निर्बंध मागे घेतले. या संदर्भात उच्च न्यायालयात दाखल दोन याचिकांवर सुनावणी करतांना न्यायालयानं उत्सवात सहभागी होणाऱ्यांचं वय ठरवण्याचा तसंच मानवी मनोऱ्याच्या उंचीवर प्रतिबंध घालण्याचा अधिकार न्यायालयाला नसून, हे काम राज्य विधीमंडळाचं असल्याचं स्पष्ट केलं. गोविंदांसाठी सुरक्षा साधनं पुरवण्याची जबाबदारी दही हंडी आयोजकांवर सोपवली असल्याचं, सरकारच्यावतीनं सांगण्या आलं.

रम्यान, येत्या १५ ऑगस्टपूर्वी सरकारनं मानवी मनोऱ्याच्या थरांच्या उंचीबाबत निर्णय न घेतल्यास, सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.

****

हातमाग आणि हस्तकलेसाठी भौगोलिक संकेतांक - जीआय प्राप्त करण्यामध्ये भारत आघाडीवर असल्याचं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त काल गुजरामध्ये अहमदाबाद इथं आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जीआयमुळे विणकरांना त्यांच्या वस्तूंसाठी चांगली किंमत मिळेल, त्यामुळे या उपक्रमाचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. आपल्या दैनंदिन जीवनात हस्तोद्योगाचा विणकरांना प्रोत्साहन द्यावं असंही त्या म्हणाल्या. बुनकर मित्र या मोबाईल ॲपचं लोकार्पण यावेळी करण्यात आलं.

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं आयोजित कार्यक्रमात बोलतांना वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी पैठणी या महावस्त्राच्या निर्मितीसाठी १ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधीचं पैठणी क्लस्टर मंजूर करण्यात आलं असल्याचं सांगितलं. यासाठी  या वर्षी २९ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याचं ते म्हणाले. पैठणी साडी पारंपारिक पद्धतीनं विणणाऱ्या कामगारांसाठी हक्काची घरं देण्यासाठी जागेचा प्रस्ताव तातडीनं सादर करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

****

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. संघटनेचे नेते दशरथ सावंत यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली. शेतकरी संपात खोत यांनी सरकारला अनुकूल भूमिका बजावली असा आरोप करत, संघटनेनं त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. खोत यांनी चौकशी समितीपुढे हजर राहून आपलं म्हणणं लेखी स्वरूपात मांडलं होतं. खोत यांच्या बडतर्फीनंतर आता भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत राहायचं की नाही याचा निर्णय संघटना लवकरच घेईल, असंही सावंत यांनी सांगितलं.

****

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत कर्जमाफीसाठी राज्यांमध्ये २६ हजार केंद्रांवर अर्ज भरण्यात येत असून, सर्व शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईन भरुन होईपर्यंत ही केंद्र सुरु राहतील, असं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीनं भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी सुविधा केंद्रांवर शेतकऱ्यांनी कोणालाही पैसे देऊ नये, असं आवाहन सहकार मंत्र्यांनी केलं आहे.

****

गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलीस विभागानं सुरक्षेचे आवश्यक उपाय योजावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते काल मुंबई इथं गणेशोत्सव आढावा बैठकीत बोलत होते. गणेशोत्सव मंडळांना सर्व परवाने ऑनलाईन देण्यासंदर्भात राज्यातल्या सर्व आयुक्तालयांनी कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

दरम्यान, रक्षाबंधनानिमित्त राज्यातल्या विविध भागातून आलेल्या शेतकरी तसंच अल्पसंख्याक महिलांनी काल मुंबई मुख्यमंत्र्यांना राखी बांधून शुभेच्छा दिल्या.

****

पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची हमी सरकारनं द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीनं केली आहे. सरकारनं हमी न दिल्यास, येत्या १४ ऑगस्टच्या नियोजित चक्का जाम आंदोलनामध्ये कर्जमुक्तीच्या मागणी बरोबरच पीक विम्याचा मुद्दा घेऊ, असंही समितीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे. पीक विमा नोंदणीसाठी ऑन लाईन पद्धतीचा अनावश्यक आग्रह धरल्यानं, राज्यातले ४० टक्के शेतकरी पीक विमा संरक्षणांपासून वंचित राहिले असल्याचा आरोपही समितीनं केला आहे.

****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

देशभक्ती आणि देशप्रेम या दोन्ही शब्दात फरक असून, आपण देशभक्त नव्हे तर देशप्रेमी असल्याचं दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू  विद्यापीठातले विद्यार्थी नेते कन्हैय्या कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. बिहार ते तिहार या कन्हैय्या कुमार लिखित आत्मकथनाच्या मराठी अनुवादाचं प्रकाशन काल औरंगाबाद इथं झालं, त्यावेळी ते बोलत होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ. भालचंद्र कांगो, पुस्तकाचे अनुवादक डॉ. सुधाकर शेंडगे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. कन्हैय्या यांनी दुपारी संत तुकाराम नाट्यगृहात आयोजित संविधान बचाव परीषदेलाही काल मार्गदर्शन केलं. यावेळी बोलतांना त्यांनी देशाची राज्य घटना धोक्यात असून ती वाचवण्याची जबाबदारी युवकांची असल्याचं सांगितलं. राज्यघटना वाचवणं हेच देशप्रेम असल्याचं सांगून अहिंसा, शांती आणि बंधुभाव या घोषणा नसून  देशाची गरज असल्याचं ते म्हणाले. यावेळी कन्हैय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध धोरणावर जोरदार टीका केली.

****

औरंगाबाद जिल्ह्यातील घृष्णेश्वर, बीड जिल्ह्यातल्या परळी इथल्या वैद्यनाथ आणि हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथल्या ज्योर्तिलिंगाच्या दर्शनासाठी काल तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटेपासूनच भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतलं. यावेळी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता. परळीत काशी पिठाचे जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनीही काल शेरे वैद्यनाथ प्रभूंचं दर्शन घेतलं. यावेळी महास्वामींनी पुण्य पर्व काळाची माहिती भाविकांना दिली.

****

औरंगाबाद शहरातल्या संत एकनाथ रंग मंदिराच्या दुरावस्थेसंदर्भात आमदार सतीश चव्हाण यांनी महापौर भगवान घडामोडे यांना निवेदन देऊन दुरूस्तीची मागणी केली आहे. रौप्य महोत्सवी वर्षात पर्दापण करणाऱ्या, संत एकनाथ रंगमंदिराची  सध्या प्रचंड दुरावस्था झाली असल्याचं त्यांनी निवेदनात म्हटलं आहे. नाटकाच्या प्रयोगानिमित्त शहरात आलेल्या एका अभिनेत्यानं रंगमंदिरातल्या दूरावस्थेचं चित्रण सामाजिक प्रसार माध्यमांवर टाकल्यानं खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी हे निवेदन महापौरांना दिलं आहे.

दरम्यान,  सामाजिक प्रसार माध्यमावर झालेल्या टीके नंतर शिवसेनेचे आमदार, संजय शिरसाट यांनी या नाट्यगृहाची पाहणी केली. त्यानंतर दुरूस्तीसाठी आमदार निधीतून २० लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली. महानगर पालिकेचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनादेखील नाट्यगृहाच्या दुरूस्तीचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना प्रशासनाला दिली. १५ ऑगस्ट पासून नाट्यगृह बंद ठेवून, दुरूस्तीचे काम सुरू करण्याचं आश्वासन मुगळीकर यांनी दिलं आहे.

****

औरंगाबाद महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत काल शहरातल्या तीन अनधिकृत धार्मिक जागांवर कारवाई करण्यात आली. महानगरपालिकेनं आतापर्यंत शहरातली अनधिकृत ५० धार्मिक स्थळं या मोहिमेअंतर्गत हटवली आहेत.

दरम्यान, या मोहिमेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झालेल्या विविध याचिकांवर आज एकत्रित सुनावणी होणार आहे.

****

बीज भांडवल योजनेचा प्रस्ताव दाखल करण्यासाठी जालना इथला महाराष्ट्र् उद्योजकता विकास केंद्राचा मानद व्याख्याता अशोक अण्णाजी सोनावणे याला तक्रारदाराकडून २ हजार रुपयांची लाच घेताना काल रंगेहाथ अटक करण्यात आली. जालना उद्योजकता विकास केंद्रातून शेळी-मेंढी पालनाचं प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तीकडून कर्जाचा प्रस्ताव सादर करण्यासाठी सोनावणे यानं ही लाच मागितली होती.

****

औरंगाबाद इथल्या भारतीय क्रीडा प्राधिकरण -साई केंद्राला विभागीय केंद्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी, तसंच, विविध आंतरराष्ट्रीय ऑलिंपिकस्तरीय मैदान बनवण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचं,  खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं. या  केंद्राला भेट दिल्यानंतर ते बोलत होते

****


No comments:

Post a Comment