Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 AUG. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ ऑगस्ट २०१७ दुपारी १.००वा.
****
जम्मू काश्मीरमधल्या शोपिया भागात सुरक्षा
दल आणि सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले. शोपिया इथल्या एका गावात
दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर आज पहाटे लष्करानं शोधमोहीम सुरु केली. यावेळी
झालेल्या गोळीबारात मेजर आणि एक जवान शहीद झाले.
तर दुसरीकडे कुलगाम भागातल्या गोपालपोरा
परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. ठार
झालेल्या दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी, जिल्ह्यात एक मे रोजी बॅंकेच्या व्हॅन लुटल्याच्या
घटनेत सहभागी होता. हे दोघेही स्थानिक दहशतवादी असून ते हिजबुल मुजाहिदीनशी संबंधित
असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विटरवरून दिली आहे.
****
वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशात इतर मागासप्रवर्गातल्या
विद्यार्थ्यांना २७ टक्के आरक्षणानुसार प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी भंडारा - गोंदियाचे
खासदार नाना पटोले यांनी आज लोकसभेत केली. सर्वोच्च न्यायालयानं चार जुलै २००७ रोजी
दिलेल्या निर्णयाप्रमाणे शिक्षण प्रवेशात ओबीसी प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना २७ टक्के
आरक्षणाचा नियम लागु आहे. वैद्यकीय प्रवेशातही हेच निकष लावण्यात आले पाहीजे, असं ते
म्हणाले.
****
नदीजोड प्रकल्पाचं काम देशभर सुरु असल्याचं
केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी आज लोकसभेत सांगितलं. शिवसेना खासदार आनंद
आडसुळ यांनी विचारलेल्या प्रश्नाला त्या उत्तर देत होत्या. नदीजोड प्रकल्पामुळे ३३
हजार मेगा वॅट ऊर्जा निर्मिती होणार असल्याचं त्या म्हणाल्या. या प्रकल्पामुळे बाधित
होणाऱ्या नागरिकांचं संरक्षण केलं जाईल, त्यामुळे नागरिकांबरोबर राज्यांनीही नदीजोड
प्रकल्पाला प्रोत्साहन द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
राज्यसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात
देशातल्या विधी महाविद्यालयांना राष्ट्रीय महत्व असलेल्या संस्थांच्या यादीत समाविष्ट
करण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या प्रस्तावावर विचार करणार असल्याचं केंद्रीय
मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं.
****
केंद्रीय मंत्रिमंडळानं मतदान विषयक नियमांमध्ये
सुधारणा करत परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी अप्रत्यक्ष मतदान अर्थात ई मत पत्राच्या
प्रस्तावाला मान्यता दिली आहे. नव्या प्रस्तावानुसार परदेशात राहणाऱ्या भारतीयांना
आपल्या संबंधित मतदारसंघात प्रत्यक्ष उपस्थित न राहता ई मत पत्राच्या आधारे मतदान करता
येईल.
इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना
शाळेत नापास न करण्याचं धोरण रद्द करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे. यादंर्भातलं
विधेयक मंजुरीसाठी संसदेत मांडलं जाणार आहे.
****
रेल्वेचं तात्काळ तिकीट आरक्षित करणाऱ्या
प्रवाशांसाठी आय आर सी टी सीनं ‘पे ऑन डिलीव्हरी’ ही नवीन सेवा सुरु केली आहे. तात्काळ
तिकीट आरक्षित करणारे प्रवासी बुक नाऊ पे लेटर या पर्यायाचा वापर करु शकतात, अशी घोषणा
ॲड्युरिल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडनं केली आहे. पे ऑन डिलीव्हरीची सेवा आतापर्यंत
सर्वसाधारण आरक्षणासाठी पुरवण्यात येत होती. मात्र आता ही सेवा तात्काळ तिकीट आरक्षित
करणाऱ्यांनाही पुरवण्यात येणार आहे.
****
राज्यातल्या आर्थिक अडचणीत सापडलेल्या
सहा जिल्हा सहकारी बँकांमध्ये अडकून पडलेले ५२० कोटी रुपये बाहेर पाठवायला परवानगी
न दिल्याबद्दल लोकलेखा समितीनं राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. समितीनं काल विधानसभेत
याबाबतचा अहवाल सादर केला. या बँकांमध्ये अडकलेला पैसा सार्वजनिक कामात वापरता येत
नसल्याचं या अहवालात म्हटलं आहे. राज्यातल्या चार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आर्थिक
अडचणीत असल्याचं २०१२ साली लक्षात आणून दिलं होतं, तसंच नाबार्डनंदेखील त्यांच्या अहवालात
याची नोंद घेतली होती, मात्र सरकारनं याची दखल घेतली नाही, असं लोकलेखा समितीनं म्हटलं
आहे.
****
राज्यात यावर्षी आतापर्यंत १३ वाघ मृत्यूमुखी
पडले असल्याची माहिती वन विभागानं दिली आहे. त्यापैकी नऊ वाघांचा मृत्यू नैसर्गिकरित्या
झाला असून, त्यामध्ये तीन बछड्यांचा समावेश आहे. उर्वरित चार वाघांपैकी दोन वाघांचा
मृत्यू विद्युत प्रवाहाचा धक्का बसून, तर दोन वाघांचा मृत्यू हा शिकारीमुळे झाला असल्याचं
प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याचं वन विभागानं स्पष्ट केलं आहे.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान दुसरा कसोटी
क्रिकेट सामना कोलंबो इथं सुरु झाला असून, भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा
निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दोन बाद ११८ धावा झाल्या होत्या.
तीन सामन्यांच्या मालिकेत भारत एक शून्यनं आघाडीवर आहे.
****
No comments:
Post a Comment