Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 AUG. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** देशाचा एकाहत्तरावा स्वातंत्र्यदिन काल सर्वत्र उत्साहात साजरा
** नागरिकांनी सप्तमुक्तीचा संकल्प करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन
** दहीहंडी उत्सवादरम्यान
राज्यात दोन गोविंदांचा मृत्यू
आणि
** शेतकरी संघटनांच्या सुकाणू
समितीचं स्वातंत्र्यदिनी मराठवाड्यात आंदोलन
****
देशाचा एकाहत्तरावा स्वातंत्र्यदिन काल सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला.
राजधानी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण
करण्यात आलं. यानंतर देशाला संबोधित करताना, पंतप्रधानांनी देशाचा विकास, काळा पैसा,
विमुद्रीकरण, काश्मीर प्रश्न, गोरखपूर इथले बालमृत्यू
यासह नवभारत संकल्पनेवर भाष्य केलं. देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल, असा
विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. वस्तू आणि
सेवा करामुळे विकासाचा वेग वाढणार असल्याचं सांगत पंतप्रधानांनी आयकर
दात्यांची संख्या वाढल्याचं नमूद केलं.
****
मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी
सप्तमुक्तीचा संकल्प करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले…
सप्तमुक्तीच्या संकल्पातून
दुष्काळापासून मुक्ती , शेतकऱ्यांना कर्जापासून मुक्ती, समाजाला प्रदुषणापासून मुक्ती,
देशाला भ्रष्टाचारापासून मुक्ती, करजंजाळापासून मुक्ती आणि अस्वछतेपासून मुक्ती अशा
प्रकारच्या सात मुक्तींचा संकल्प करुन आपण आपला स्वातंत्र्यदिन याठिकाणी साजरा करुया.
येत्या ५ वर्षात प्रत्येक
नागरिकानं नवभारताच्या निर्मितीत योगदान देण्याचं आवाहन करत, मुख्यमंत्र्यांनी शेतीच्या
क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करुन शेती क्षेत्राचा शाश्वत विकास करण्याचा प्रयत्न
असल्याचं नमूद केलं. महिला सुरक्षा, वंचित घटकांचा विकास, या मुद्यांवरही मुख्यमंत्र्यांनी
भर दिला.
****
विधानभवनात विधान परिषदेचे
सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. विधानसभा अध्यक्ष
हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी
उपस्थित होते.
****
औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त
कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात कदम यांनी मराठवाड्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या
पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळवून देणार असल्याचं
सांगितलं. ते म्हणाले…..
पुन्हा एकदा मागच्या तीन
वर्षापासून मराठवाड्यात कर्जमुक्ती पाहायला मिळते. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना उद्या
सकाळी बोलणार आहे की, ताबडतोब मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना जे नुकसान होत आहे त्याचे
पंचनामे झालेच पाहिजेत. कर्जमुक्ती तर झालीच पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच
पाहिजे. पण तातडीनं शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे हे तुमचं सगळ्यांचं निवेदन, तुमचा
सगळ्यांचा या जिल्ह्याचा पालकमंत्री प्रतिनिधी म्हणून मी तातडीनं मुख्यमंत्र्यांसमोर
मांडेल आणि नुसतं मांडणार नाही तर निश्चितपणे न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न
करणं एवढंच मी या ठिकाणी आश्वासन देतो आहे बांधवांनो.
पोलीस दलात उल्लेखनीय कार्य
करणारे अधिकारी कर्मचारी, तसंच गुणवंत विद्यार्थांचा पालकमंञी कदम यांच्या हस्ते सत्कार
करण्यात आला.
****
मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती आर एम बोर्डे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर बी.ए.चोपडे यांच्या हस्ते तर
नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर
यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
****
जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
प्रांगणात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात
आलं. परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या
हस्ते, हिंगोली इथं पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते, तर बीड इथं अतिरिक्त जिल्हाधिकारी
अनिल पवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं.
****
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
प्रांगणात पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या
भाषणात खोतकर यांनी राज्यशासनाच्या वतीनं राबवल्या जात असलेल्या योजनांची माहिती दिली.
****
लातूर इथं जिल्हा क्रीडा
संकुलाच्या मैदानावर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण
करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात निलंगेकर यांनी ‘स्वदेश’ या उपक्रमातून जिल्ह्यातील
शाळांच्या विकासासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख केला.
****
उस्मानाबाद
इथं पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी
केलेल्या भाषणात रावते यांनी, जिल्ह्यातल्या ७४ हजार ४२० शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी
महाराज कर्जमाफी योजनेचा तर, प्रोत्साहनपर योजनेअंतर्गत ८६ हजार ४३३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा
लाभ मिळणार असल्याचं सांगितलं. जिल्ह्यातल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या
हस्ते यावेळी सन्मानित करण्यात आलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून
प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही
उपलब्ध आहे.
****
गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडीचा
उत्सव काल सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. उत्सवादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी
राज्यभरात पोलिस यंत्रणा सतर्क होती. औरंगाबादसह मराठवाड्यातही ठिकठिकाणी दहीहंडीचा
उत्सव साजरा झाला. अनेक ठिकाणी गोविंदा पथकांनी मानवी मनोऱ्याचे नऊ थर लावत दहीहंडी
फोडल्याचं वृत्त आहे.
दरम्यान, राज्यात दोन गोविंदांचा
काल मृत्यू झाल्याचं, आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. नवी मुंबईत ऐरोली इथं एका ३०
वर्षीय गोविंदाला वीजेचा धक्का लागून तो जखमी झाला, त्याला मुलुंड इथं रुग्णालयात उपचारासाठी
दाखल करण्यात आलं, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दुसरी घटना पालघर जिल्ह्यात
घडली. पालघर तालुक्यात काशीपाडा इथं २१ वर्षीय गोविंदा दहीहंडी फोडताना, वरच्या थरावरून
पडून जखमी झाला, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केलं.
****
रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग इथं दोन तरुण काल समुद्रात बुडून
मरण पावले. काल दुपारी ही घटना घडली. त्यांच्यासोबत असलेल्या अन्य एका तरुणाला स्थानिकांनी
वाचवलं मात्र, हे दोघे भरतीचा अंदाज न आल्यानं समुद्रात बुडाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव बाळासाहेब पूर्णेकर यांच्या
पार्थिव देहावर काल रात्री ठाणे इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या रविवारी औरंगाबादनजीक
गंगापूर फाट्याजवळ झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. सोमवारी मध्यरात्रीनंतर
त्यांचं औरंगाबाद इथं उपचारादरम्यान निधन झालं. त्यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्वच
स्तरातून शोक व्यक्त होत आहे.
****
स्वातंत्र्यदिनाचं
ध्वजारोहण पालकमंत्र्यांच्याऐवजी शेतकरी किंवा स्वातंत्र्यसैनिकांच्या हस्ते करावं
या मागणीसाठी सुकाणू समितीच्या सदस्यांनी काल मराठवाड्यात आंदोलन केलं. औरंगाबाद आणि
परभणी इथं आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.
औरंगाबाद इथं सुमारे पन्नास तर परभणी इथं २७ आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
होतं, सायंकाळी त्यांना सोडून देण्यात आलं.
दरम्यान, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी सुकाणू समितीच्या आंदोलनावर
टीका करत, कोणतंही आंदोलन हे विचारपूर्वक केलं जावं असं मत व्यक्त केलं आहे. ते काल
नंदुरबार इथं बोलत होते. अशा प्रकारच्या आंदोलनांमुळे चुकीचा संदेश दिला जात असल्याचं
ते म्हणाले.
****
राज्यातल्या वास्तूशास्त्राच्या विद्यार्थ्यांना शासन सर्वोतोपरी मदत
करेल असं आश्वासन औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांनी दिलं आहे. औरंगाबाद इथल्या
वास्तुशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी शहरातल्या सलीम अली सरोवरासह तीन ठिकाणी स्वकल्पनेतून
सुशोभीकरण केलं, काल त्याची पाहणी केल्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना पालकमंत्री
कदम बोलत होते. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करुन हे सुशोभीकरण केल्याबद्द्ल
कदम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं. हा प्रकल्प सर्वांसाठीच आदर्श असल्याचं ते
पुढं म्हणाले.
****
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासन सर्वोतोपरी
मदत करेल, त्यासोबतच समाजानंही त्यांना आधार
द्यावा, असं आवाहन नांदेड जिल्ह्याचे
पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी केलं आहे. नांदेड जिल्ह्याच्या बामनी गावातल्या व्यंकटी हाळे या आत्महत्या
केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासनातर्फे मदतीचा एक लाख रुपयांचा धनादेश खोतकर
यांच्याहस्ते देण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी संगणकीकृत सातबारा देण्याच्या सुविधेचं पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेण्याचं आवाहन खोतकर यांनी केलं. मराठवाड्यात इतरही अनेक ठिकाणी संगणकीकृत सातबारा
देण्याच्या सुविधेला कालपासून प्रारंभ झाला.
****
No comments:
Post a Comment