Friday, 4 August 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 04.08.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 AUG. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ ऑगस्ट २०१ दुपारी १.००वा.

****

जपानमधल्या हिरोशिमा नागासाकी या दोन शहरांवर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्याला या आठवड्यात ७२ वर्ष पूर्ण होत आहेत. यापार्श्वभूमीवर, लोकसभेत आज या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यासारखे हल्ले समाजासाठी घातक असून, यावर बारकाईनं लक्ष देण्याची गरज असल्याचं मत अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केलं.

त्तर प्रदेशातल्या मुगलसराय या रेल्वेस्थानकाचं नाव बदलण्याच्या मुद्यावरून राज्यसभेत कामकाज सुरू होताच गदारोळ झाला. उत्तर प्रदेशातल्या अनेक खासदारांनी यासंदर्भात सभापतींच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी सुरू केल्यानं, सभापतींना कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं.

****

कौटुंबिक मूल्य, विविधतेचा स्वीकार आणि पर्यावरणविषयक जागरुकता ही भारताच्या उच्चतम परंपरेचा भाग असून, ती अधिक वृद्धींगत होण्यासाठी उत्तेजन द्यायला हवं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. फिक्की या व्यवसायिकांच्या संघटनेच्या २५ महिला प्रतिनिधींनी नवी दिल्ली इथं पंतप्रधानांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. महिला उद्योजकता आणि महिला सक्षमीकरण यासारख्या विषयावर प्रतिनिधी महिलांनी पंतप्रधानांचे विचार जाणून घेतले.

****

जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले, यापैकी एक जण हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित असून, दुसऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही. खंजरभाल, ब्रिजभेरा आणि अनंतनाग या भागात केंद्रीय राखीव पोलिस दल आणि विशेष कारवाई गटानं केलेल्या शोधमोहीमेदरम्यान काल रात्रीच्या सुमारास ही चकमक झाली. याठिकाणाहून एक एसएलआर रायफल जप्त करण्यात आली.

****

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत लवकर सुधार होईल, अशी आशा, त्यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी वर्तवली आहे. त्या आज सकाळी मुंबईत पत्रकारांशी बोलत होत्या. ९४ वर्षीय दिलीपकुमार यांना मूत्रपिंडाच्या त्रासावर उपचारासाठी परवा मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यांच्यावर सध्या अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत.

****

स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी या आणि इतर मागण्यांसाठी येत्या १४ ऑगस्टला राज्यभरात रस्ता रोको आंदोलन आणि शैक्षणिक बंद पाळला जाणार असल्याचा इशारा शेतकरी आंदोलनाच्या सुकाणू समितीचे डॉक्टर अजित नवले यांनी दिला आहे, अहमदनगर इथं सुकाणू समितीच्या बैठकीनंतर त्यांनी काल ही माहिती दिली. येत्या १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमाला पालकमंत्र्यांना विरोध केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

जायकवाडी धरणातला पाणीसाठा ५२ टक्क्यांवर पोहोचला आहे. आज सकाळी आठ वाजता धरणातला जिवंत पाणी साठा एक हजार १३३ दशलक्ष घनमीटर वर पोहोचला, धरणातली आवक मात्र गेल्या काही तासांपासून मंदावली असून, सध्या सात हजार सहाशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे.

****

लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातल्या २६२ बोगस तुकड्या वाटप प्रकरणाच्या चौकशीत दोषी आढळलेल्या संबंधित अधिकारी, संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं काल दिले. या प्रकरणी गेल्या १३ डिसेंबर रोजी जनहित याचिका दाखल करण्यात झाली आहे.

****

अवैध वाळू तस्करी विरुद्ध औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं पैठण तालुक्यातल्या आपेगाव शिवारात कारवाई करत वाळूनं भरलेले पाच ट्रॅक्टर, दोन हायवा ट्रक असा ५१ लाख १५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. वाहन चालक आणि मालकांविरुद्ध गौण खनिज कायदा आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

औरंगाबादच्या राज्य वक्फ न्यायाधिकरणामार्फत त्रिसदस्यीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अब्दुल सलीम अहमद हुसैन शहापुरे यांची अध्यक्ष म्हणून तर खालिद बी. अरब आणि विधीज्ञ मोहम्म्द इक्बाल हुसैन यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वक्फ अधिनियमात वक्फ न्यायाधिकरणाची स्थापना करणं अनिवार्य करण्यात आली आहे.  त्यानुसार शासन अल्पसंख्याक विकास विभागामार्फत त्रि-सदस्यीय राज्य वक्फ अधिनियम औरंगाबादची स्थापना करण्यात आली आहे.

****

भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याचा आजच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला असून, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या सहा बाद ४५९ धावा झाल्या होत्या. चेतेश्वर पुजारानं १३३, अजिंक्य रहाणेनं १३२ धावा तर आर अश्विणने ५४ धावा केल्या.

****

लंडनमध्ये आजपासून जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा सुरु होत आहे. दहा दिवस चालणार्या या स्पर्धेत २५ भारतीय खेळाडू सहभागी होत आहेत. २००३ सालानंतर या स्पर्धेत भारताला एकही पदक मिळालं नाही.

****

No comments:

Post a Comment