Sunday, 6 August 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 06.08.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 6 August 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ६ ऑगस्ट २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

भारतानं कोलंबो कसोटीत डावानं विजय मिळवत, तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे. रविंद्र जडेजानं दुसऱ्या डावात केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेवर एक डाव आणि ५३ धावांनी विजय मिळवला. भारतानं पहिला डाव ६२२ धावांवर घोषित केल्यानंतर श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात १८३ धावाच करु शकला. त्यानंतर फॉलोऑन मिळालेला श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावात ३८६ धावांवर सर्वबाद झाला. दुसऱ्या डावात जडेजानं पाच, रविचंद्रन अश्विन आणि हार्दिक पंड्यानं प्रत्येकी दोन, तर उमेश यादवनं एक बळी घेतला. पहिल्या डावात ७० धावा आणि सामन्यात सात बळी घेणारा रविंद्र जडेजा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना येत्या १२ तारखेपासून पल्लेकेले इथं सुरु होणार आहे.

****

नवनिर्वाचित उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आज बंगळुरु इथं एका अभिनंदन कार्यक्रमात सहभागी होत आहेत. नायडू आज तिरुपती इथं बालाजी मंदिराला भेट देतील. ते उद्या आंध्र प्रदेशातल्या नेल्लोर जिल्ह्यातल्या चवटपलेन या त्यांच्या मूळ गावी भेट देणार आहेत. उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ येत्या गुरुवारी संपत असून, नायडू येत्या शुक्रवारी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत.

****

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना यापुढे निवृत्तीवेतनाचा पहिला हप्ता सुरु करण्यासाठी बँकांना भेट देण्याची गरज नाही. कार्मिक मंत्रालयानं केंद्र सरकारच्या सर्व विभागांना याबाबतचे आदेश दिले आहेत. कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी निवृत्ती वेतन आदेश म्हणजेच पीपीओची प्रत दिली जाईल. निवृत्तीवेतन धारकांनी यासंबंधीचं विनंतीपत्र बँकांना द्यायचं असून, केंद्रीय निवृत्तीवेतन लेखाकार्यालयातर्फे बँकांनाही पीपीओची प्रत पाठवली जाणार आहे.

****

सक्तवसुली संचालनालयानं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी फुटीरतावादी नेता शब्बीर शहाचा निकटवर्ती असलम वानीला अटक केली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांच्या मदतीनं त्याला आज श्रीनगर इथून अटक करण्यात आली असून, पुढील चौकशीसाठी त्याला दिल्लीला नेण्यात येणार आहे. पाकिस्तान सारख्या देशातून हवालाच्या माध्यमातून भारतात दहशतवाद्यांना पैसा पुरवणं आणि राष्ट्रविरोधी कारवाया केल्यामुळे सुरक्षा यंत्रणेनं नुकतंच शब्बीर शहाला अटक केली होती.

****

उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकानं आज अंसारउल्लाह बंगला टीम - एबीटी या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्याला मुजफ्फरनगर इथून अटक केली. एबीटी ही बांग्लादेशातली अल कायदाशी संबंधित दहशतवादी संघटना आहे. पकडलेला दहशतवादी एका महिन्यापासून भारतात होता आणि बांग्लादेशच्या दहशतवाद्यांना बनावट ओळखपत्र बनवून देणं आणि त्यांना भारतात सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचं काम तो करत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

अमरनाथ यात्रेकरुंवर गेल्या महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी जम्मू काश्मीरच्या विशेष तपास दलानं तीन जणांना अटक केली आहे. या तिघांनी लष्कर-ए-तय्यबाच्या चार दहशतवाद्यांना मदत केली असल्याचं तपासात उघड झाल्याचं पोलिस महासंचालक मुनीर खान यांनी सांगितलं. १० जुलैला झालेल्या या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान पवित्र छडी मुबारक आज अमरनाथ गुहेकडे रवाना झाली. उद्या श्रावण पौर्णिमेला विधीवत पुजेनंतर या यात्रेची सांगता होत आहे.

****

रक्षाबंधनाचा सण उद्या साजरा होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेम, विश्वास, आनंद आणि समृद्धीचं प्रतिक असलेला हा सण असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. देशातल्या नागरिकांमध्ये बंधुत्वाची भावना वाढवण्यासाठी हा दिवस महत्वाचा असल्याचं ते म्हणाले.

****

सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृतरित्या तात्पुरती वीज जोडणी घ्यावी, असं आवाहन महावितरण कंपनीनं केलं आहे. चार रुपये ३१ पैसे प्रतियुनीट या सवलतीच्या दरात मंडळांना वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जाणार आहे. धार्मिक उत्सवांसाठी अधिकृतच वीजपुरवठा घ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य द्यावं, यासाठी तात्पुरत्या वीजजोडणीचा दर वाणिज्यिक दरापेक्षा कमी ठेवण्यात आला असल्याचं महावितरणकडून सांगण्यात आलं आहे. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक १९१२, किंवा १८०० २०० ३४३५ किंवा १८०० २३३ ३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

****

मावळ गोळीबार प्रकरणात शेतकऱ्यांवर दाखल गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे. मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी ही माहिती दिली. पवना धरणातून भूमिगत जलवाहिनीच्या विरोधात नऊ ऑगस्ट २०११ रोजी पुणे-मुंबई महामार्गावर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात तीन शेतकरी ठार झाले होते. तत्कालीन सरकारनं त्यानंतर मावळ मधल्या सुमारे १९० शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते.

****

No comments:

Post a Comment