Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 AUG. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ ऑगस्ट २०१७ दुपारी १.००वा.
****
रक्षाबंधनाचा सण आज देशभरात उत्साहात
साजरा होत आहे. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना महिला, शाळकरी मुली
तसंच दिव्यांग मुलींनी राखी बांधून शुभेच्छा दिल्या.
वाघा सीमेवर तैनात जवानांनाही त्या भागातल्या महिलांनी राखी बांधून सण साजरा केला.
****
अमरनाथ यात्रेची आज विविध धार्मिक कार्यक्रमांनंतर
सांगता झाली. २९ जूनपासून सुरु झालेल्या
या यात्रेत दोन लाख ५९ हजारांहून अधिक भाविकांनी पवित्र शिवलिंगाचं दर्शन घेतलं. आज पवित्र छडी मुबारक अमरनाथ
गुहेत पोहोचल्यानंतर पारंपरिक पूजाविधीनंतर या यात्रेचा समारोप झाल्याचं जाहीर करण्यात
आलं.
****
बारा ज्योतिर्लिंगापैकी
एक असलेल्या नाशिक
जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त
आज दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. भाविकांची
सुरक्षा तसंच सुविधांसाठी शासकीय
यंत्रणांनी व्यवस्था केली असून, एस टी महामंडळानंही
नाशिक इथून ३०० ज्यादा बसगाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे.
औरंगाबाद
जिल्ह्यातलं वेरुळ इथलं घृष्णेश्वर, बीड जिल्ह्यातलं परळी वैजनाथ, तसंच हिंगोली जिल्ह्यात
औंढा नागनाथ या ठिकाणीही भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लावल्या आहेत.
****
आज खंडग्रास चंद्रग्रहण
होणार असून, ते संपूर्ण देशात दिसण्याची शक्यता आहे. भारतीय वेळेनुसार रात्री दहा वाजून ५२ मिनिटांनी ग्रहण सुरु होईल, आणि १२ वाजून ४८ मिनिटाला संपणार
आहे. आशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या सर्व भागात आणि युरोप आणि आफ्रिकेंच्या काही भागात
हे ग्रहण दिसणार आहे.
****
जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात
काल रात्री उशीरा लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर ए तय्यबाचा एक
दहशतवादी ठार झाला. उमर असं या दहशतवाद्याचं नाव असून,
अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याच्या सहभागाबद्दल तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
गुजरातमधले काँग्रेसचे ४४ आमदार आज बंगळुरूहून अहमदाबादमध्ये परतले. गुजरातमधल्या काँग्रेसच्या ५७ पैकी सहा आमदारांनी पक्षाला
सोडचिठ्ठी दिल्यानंतर काँग्रेसनं राज्यसभेच्या तीन जागांसाठी
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ५१
पैकी ४४ आमदारांना काँग्रेसशासित कर्नाटकमध्ये हलवलं होतं. राज्यसभेच्या गुजरातमधल्या तीन
जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. या तीन जागांसाठी काँग्रेसचे अहमद पटेल यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष
अमित शहा आणि केंद्रीय मंत्री स्मृती
इराणी हे
देखील रिंगणात आहेत.
****
जलसाक्षरता
केंद्राच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त आणि जलयुक्त होण्यास मदत होणार
असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्याचा जलसंपदा विभाग पुण्याची यशदा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं पुणे इथं
उभारण्यात आलेल्या जलसाक्षरता केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं,
त्यावेळी ते बोलत होते. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, जलसंधारण
मंत्री राम शिंदे, जलबिरादरी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र
सिंह यावेळी उपस्थित होते. या केंद्राच्या माध्यमातून जलविषयक कामाला आपल्या
जीवनशैलीत आणणारी नवी फळी तयार करण्याचे काम सुरु असून, या माध्यमातून पीक पद्धती, पाण्याचा
वापर, काटकसर, उत्पादकता याची काळजी घेतली जाईल, असं मुख्यमंत्री
यावेळी म्हणाले.
****
गोदावरी नदी प्रदुषण प्रकरणी प्रशासनानं नांदेडच्या
महापौर आणि आयुक्तांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी गोदावरी
नदीची पाहणी केली होती, त्यावेळी शहरातल्या नाल्यांचं सांडपाणी नदीत सोडल्याचं आढळलं, त्यानंतरही केलेल्या
तपासणीत पाणी दुषीत आढळलं होतं. त्यामुळे
पर्यावरण अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून
प्रदूषण कायद्यान्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़, मात्र नदी शुध्दीकरणाचं प्रतिज्ञापत्र सादर
केल्यानं त्यांना अटक झाली नाही.
****
छत्रपती शिवाजी
महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत कर्जमाफीसाठी राज्यांमध्ये २६ हजार केंद्रांवर
अर्ज भरण्यात येत असून, सर्व शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईन भरुन होईपर्यंत ही केंद्र सुरु राहतील,
असं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीनं भरण्याची सुविधा मोफत
उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी सुविधा केंद्रांवर शेतकऱ्यांनी कोणालाही पैसे देऊ नये, असं आवाहन सहकार मंत्र्यांनी
केलं आहे. अर्ज भरण्यासाठी आपले सरकार
केंद्र, नागरीक सुविधा केंद्र, संग्राम केंद्र आणि काही ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी
बँका आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था इथं सुविधा केली असून, एकही पात्र लाभार्थी या योजनेतून वंचित राहणार
नाही, असं त्यांनी
सांगितलं.
****
No comments:
Post a Comment