Tuesday, 8 August 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 08.08.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 08 AUG. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ ऑगस्ट २०१ दुपारी १.००वा.

****

काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या वाहनावर गुजरातमध्ये बनासकाठा इथं झालेल्या दगडफेकीचे पडसाद आज संसदेत उमटले. लोकसभेत काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी या घटनेच्या निषेधार्थ घोषणाबाजी सुरू केली. गृहमंत्री राजनाथसिंह यांनी या संदर्भात सदनासमोर निवेदन सादर करताना, दगडफेकीची ही घटना दुर्भाग्यपूर्ण असल्याचं नमूद केलं. मात्र राहुल गांधींनी सुरक्षा मापदंडांचं पालन गांभीर्यानं केलं नसल्याचं, त्यांनी सांगितलं. या दौऱ्यात पोलिसांनी दिलेल्या वाहनाऐवजी राहुल गांधी दुसऱ्या वाहनानं गेले. याशिवाय गेल्या दोन वर्षात राहुल गांधी यांनी सुरक्षा नियमांचा सुमारे शंभरहून अधिक वेळा भंग केला असून, कोणतीही सुरक्षा न घेता, ते सहा वेळा एकूण ७२ दिवसांसाठी परदेशी गेल्याचं, राजनाथसिंह यांनी सांगितलं.

यानंतर काँग्रेस खासदारांचा गदारोळ वाढत गेल्यानं, अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.

राज्यसभेत काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी पाचशे रुपये मुल्याच्या वेगवेगळ्या नोटा छापल्या जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत, त्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. या मुद्यावरून सदनाचं कामकाज आधी तीन वेळा आणि त्यानंतर एक वाजेपर्यंत स्थगित झालं.

त्यापूर्वी राज्यसभेचं कामकाज सुरू होताच, दिवंगत माजी सदस्य विश्वजीतसिंह यांना सदनानं श्रद्धांजली अर्पण केली. महाराष्ट्रातून दोन वेळा राज्यसभेवर गेलेले सिंह यांचं परवा रविवारी सहा तारखेला वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झालं.

****

राज्यसभेच्या गुजरातमधल्या तीन जागांसाठीच्या मतदानाला आज सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षातर्फे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री स्मृती इराणी तसंच काँग्रेसमधून बाहेर पडलेले बलवंतसिंह राजपूत हे तीन उमेदवार निवडणूक लढवत असून, काँग्रेसतर्फे पक्षाचे सरचिटणीस अहमद पटेल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गुजरातमधले ज्येष्ठ नेते शंकरसिंग वाघेला यांनी, आपण अहमद पटेल यांना मतदान केलं नसल्याचं म्हटलं आहे. सायंकाळी पाच वाजेनंतर मतमोजणीला सुरूवात होणार असून, सायंकाळी उशीरापर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर गेलेल्या पाच सदस्यांचा कार्यकाळही यामहिन्यात पूर्ण होत आहे, यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांचा समावेश आहे. मात्र माकपनं येचुरी यांना पुन्हा उमेदवारी दिलेली नाही.

****

देशभरात पहिली ते आठवीपर्यंत सर्व शाळांमध्ये योगाभ्यास अनिवार्य करण्याची मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. शाळांमध्ये काय शिकवलं जावं, हे ठरवण्याचा अधिकार आपला नाही, ही बाब आपल्या अखत्यारीत येत नसल्यानं, त्याबाबत आपण आदेश देऊ शकत नसल्याचं, न्यायालयानं म्हटलं आहे. योगभ्यासासंदर्भात एक राष्ट्रीय धोरण आखून त्याअंतर्गत सर्व शाळातून योगाभ्यास बंधनकारक करावा, असं या याचिकेत म्हटलं होतं.

****



ज्येष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ते डॉ. भीमराव गस्ती यांचं आज पहाटे कोल्हापूर इथं निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. आक्रोश, सांजवारा या पुस्तकांसह 'बेरड' हे त्यांचं आत्मकथन प्रसिद्ध आहे. या आत्मकथनाला महाराष्ट्र तसंच कर्नाटक राज्यसरकारच्या पुरस्कारासह विविध सात पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.देवदासींचे प्रश्न सोडवण्यासाठी गस्ती यांनी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातही मोलाचं कार्य केलं. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या हैदराबाद शाखेत ज्येष्ठ शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी काम केलं होतं.

       डॉ. भीमराव गस्ती यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. गस्ती यांच्या निधनाने वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी संघर्ष करणारे व्यक्तिमत्त्व आपण गमावलं, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

****

भारतीय वृत्त सेवा विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी आणि आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचे पहिले वृत्त विभागप्रमुख वसंतराव देशपांडे यांचं शनिवारी नांदेड इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. दिल्लीत आकाशवाणीचे वार्ताहर म्हणून काम केलेल्या देशपांडे यांनी पणजी आणि औरंगाबाद इथंही आकाशवाणीत कार्यरत होते. १ सप्टेंबर १९८० रोजी औरंगाबाद इथं प्रादेशिक वृत्त विभाग स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यापूर्वी ते औरंगाबाद इथंचं आकाशवाणीचे वार्ताहर म्हणून कार्यरत होते. शासकीय नोकरीत येण्यापूर्वी देशपांडे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामातही सहभाग नोंदवला होता.

****

पुणे शहरात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असून, सध्या स्वाइन फ्लूचे 20 रुग्ण शहरातल्या विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. शहरात या वर्षात आतापर्यंत या आजारानं 81 जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी 24 रुग्ण पुणे शहरातले तर 57 रुग्ण पुण्याबाहेरचे असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. नागरिकांनी आरोग्यांची काळजी घेऊन, प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

No comments:

Post a Comment