Thursday, 3 August 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 03.08.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 AUG. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

                                       Language Marathi      

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० मि.

****

** विरोधक संख्याबळाच्या जोरावर विधान परिषदेचं एकतर्फी कामकाज चालवत असल्याचा आरोप;  सत्ताधारी पक्षांचा कामकाजावर बहिष्कार

** रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार ध्वनीफीत आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्पावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ; मोपलवार यांची एका महिन्यात स्वतंत्रपणे चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

** रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात करण्याचा भारतीय रिझर्व्ह बॅंकेचा निर्णय

** डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जीवन गौरव पुरस्काराची घोषणा

आणि

** भारत आणि श्रीलंका यांच्यात आजपासून दुसरा कसोटी क्रिकेट सामना

****

विरोधक संख्याबळाच्या जोरावर विधान परिषदेचं एकतर्फी कामकाज चालवत असल्याचा आरोप करत, संसदीय कामकाजाच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसनेनं विधान परिषदेच्या कामकाजावर काल बहिष्कार घातला. सभागृहात एकही विषय नियमाप्रमाणे होत नाही. आठवड्याभरात इथं एकही कायदा मंजूर झालेला नाही. बहुमताच्या जोरावर विरोधक दादागिरी करत आहेत. हे सहन करणार नाही, याबाबत आचारसंहिता तयार होईपर्यंत बहिष्कार सुरूच राहिल, असं सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनीही विरोधकांवर टीका केली.

यासंदर्भात बोलतांना विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देता येत नसल्यानं सत्ताधाऱ्यांनी सभागृहातून पळ काढल्याची घटना इतिहासात पहिल्यांदाच घडल्याचं सांगितलं. ते म्हणाले……….

****

समृद्धी महामार्गाचे प्रमुख सनदी अधिकारी आणि रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची प्रसारित झालेली ध्वनीफीत आणि झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्प प्रकरणात अडचणीत आलेले गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यावरून काल विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. मोपलवार यांची हकालपट्टी करून मेहतांचा राजीनामा घ्या अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी लावून धरल्यामुळं विधानसभा आणि विधानपरिषदेचं कामकाज चार वेळा तहकूब करावं लागलं. मोपलवार यांची एका महिन्यात स्वतंत्रपणे चौकशी केली जाईल, आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सकृतदर्शनी या प्रकरणाचा समृध्दी महामार्गाशी संबंध दिसत नसून, पदामुळे चौकशीवर परिणाम होणार असेल तर, मोपलवारांना पदावरुन दूर केलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत सांगितलं. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मोपलवार यांच्या निलंबनाची मागणी केली होती. ती मागणी मुख्यमंत्र्यांनी फेटाळली. दूरध्वनी संभाषणाची पडताळणी सुरु असून, ते न्याय सहायक वैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलं जाईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. मात्र यावर विरोधी पक्ष सदस्यांचं समाधान न झाल्यानं सरकारविरोधी घोषणा देत त्यांनी सभात्याग केला.

दरम्यान, भाजपात बिल्डर लॉबी सक्रीय असल्याचं भाजपा आमदारानंच सांगितलं असून बदल्यांसाठी मंत्रालयात पैसे घेतले जातात, असा आरोप काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी केला. त्यावरुन गदारोळ झाल्यानं सभागृहाचं कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब झालं होतं.

****

शालेय अभ्यासक्रमात इतिहास शिकताना त्यात प्रत्यक्ष घडलेल्या घटनांचा समावेश करण्यात येतो. तथापि, या माध्यमातून कोणाचीही बदनामी होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात येत असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे सांगितलं.

****

नांदेड जिल्ह्यात डेंग्यू आणि हिवतापासारख्या आजारांवर प्रतिबंध आणि नियंत्रण आणण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचं, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी काल विधानसभेत सांगितलं. नांदेड जिल्ह्यात डेंग्यू तसंच हिवतापाच्या रूग्णांमध्ये वाढ झाल्यासंदर्भात सदस्य अमिता चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याच्या उत्तरात सावंत यांनी ही माहिती दिली.

****

ग्रामपंचायत इमारत, दहनभूमी आणि दफनभूमीसाठीची असलेली दहा लाख रुपयांची तरतूद वाढवण्यासाठीचा प्रस्ताव नियोजन विभागाला देण्यात आला असून, यासंदर्भात पाठपुरावा करून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी काल विधानसभेत दिली. एका प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते.

****

भारतीय रिझर्व्ह बॅंकेनं आपल्या रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केली आहे. गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय चलन विषयक धोरण समितीनं हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे रेपो दर आता ६ पूर्णांक २५ वरून ६ टक्क्यांवर आला आहे. तर रिव्हर्स रेपो दर सहा टक्क्यांवरून ५ पूर्णांक ७५ टक्के झाला आहे. गेल्या सहा वर्षांमधला हा निच्चांकी दर आहे. या निर्णयामुळे गृह कर्जाच्या व्याज दरातही कपात होण्याची शक्यता आहे.

****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

औरंगाबाद इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच मान्यवर व्यक्तींना  जीवन गौरव पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. कुलगुरू बी. ए. चोपडे यांनी काल झालेल्या व्यवस्थापन परिषदेत हा ठराव घेण्यात आल्याचं सांग़ितलं. या व्यक्तींमध्ये माजी सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी, एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, माजी न्यायमूर्ती सी.एल. थूल, ज्येष्ठ पत्रकार मुरलीधर शिंगोटे, आणि राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिकस्वीकृती समिती- नॅकचे सल्लागार डॉ. जगन्नाथ पाटील यांचा समावेश आहे. येत्या २३ ऑगस्टला विद्यापीठाच्या वर्धापनदिनी हे पुरस्कार प्रदान केले जातील  . दरम्यान,उस्मानाबाद इथं असलेल्या विद्यापीठाच्या उपपरिसराच्या १६ ऑगस्ट या वर्धापनदिनीही असेच पुरस्कार दिले जाणार असून त्यात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या मान्यवर व्यक्तींची निवड करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास सरकारने दहा लाख रुपये बक्षीस जाहीर केलं आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी काल पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. विनय पवार आणि सारंग अकोलकर हे सनातन संस्थेचे दोघे कार्यकर्ते पानसरे हत्या प्रकरणातले मुख्य आरोपी असून, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणातही या दोघांचा तपास सुरू आहे.

****

भारत आणि श्रीलंका यांच्यात आजपासून कोलंबो इथं दुसरा कसोटी क्रिकेट सामना खेळला जाणार आहे. या आधीची पहिला कसोटी क्रिकेट सामना भारतानं जिंकून तीन सामन्याच्या मालिकेत एक - शून्यनं आघाडी घेतली आहे.

****

मानवतचे तहसीलदार बालाजी शेवाळे हे अधिकारी- कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे वागत असून त्यांची बदली करण्यात यावी या मागणीसाठी कर्मचारी आणि अधिकारी सामुहिक रजेवर गेले आहेत. जो पर्यंत त्यांची बदली होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार असल्याचं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

****

लातूर - मुबंई एक्सप्रेस पूर्वीप्रमाणेच सुरु ठेवावी, त्या रेल्वेच बीदरपर्यंतचे विस्तारीकरण रद्द करावं, या मागणीसाठी रेल्वे बचाव कृती समितीने पुकारलेल्या लातूर शैक्षणिक बंदला काल संमिश्र प्रतिसाद मिळाला. महाविद्यालय बंद पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

औरंगाबाद महापालिकेनं  अवैध आणि बेकायदा धार्मिक स्थळं काढून टाकण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेत शहरातली पाच धार्मिक स्थळं काल काढून टाकण्यात आली. पैठण रस्त्यावरील मा- बाप दर्गा, एकनाथनगर परिसरात असलेलं लक्ष्मीमाता मंदिर, महूनगर इथंलं जलमंदिर, तसंच बौद्धविहार आणि उदय कॉलनी भोईवाडा इथलं तुळजाभवानी मंदिर या स्थळांवर पथकानं कारवाई केली. कारवाई करत असतांना नागरिकांनी पथकाला सुरूवातीला विरोध करण्याचा प्रयत्न केला त्यामुळं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र, पथकानं आपली कारवाई विरोधाला न जुमानता पूर्ण केली.

****






























No comments:

Post a Comment