Sunday, 6 August 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 06.08.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 06 AUG. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

                                       Language Marathi      

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० मि.

****

** उपराष्ट्रपतीपदी एम व्यंकय्या नायडू यांची निवड

** नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अर्थतज्ज्ञ राजीव कुमार यांची नियुक्ती

** बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अपहार प्रकरणी दबावाला बळी न पडता तपास अहवाल सादर करण्याचे तसंच गंगाखेड शुगर अँड एनर्जी फॅक्टरीच्या पीक कर्ज घोटाळ्यात मुख्य सूत्रधारांच्या मालमत्ता जप्त करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

आणि

** दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर फॉलोऑनची नामुष्की; दुसऱ्या डावात दोन बाद ०९ धावा

****

भारतीय जनता पक्षाचे एम व्यंकय्या नायडू देशाचे नवे उपराष्ट्रपती असतील. काल झालेल्या निवडणुकीत नायडू यांनी आपले प्रतिस्पर्धी विरोधी आघाडीचे उमेदवार गोपालकृष्ण गांधी यांचा २७२ मतांनी पराभव केला. नायडू यांना ५१६ मतं तर गांधी यांना २४४ मतं मिळाली. एक जुलै १९४९ रोजी आंध्रप्रदेशातल्या नेल्लोर जिल्ह्यात जन्मलेले व्यंकय्या नायडू यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच राजकारण तसंच समाजकारणात उडी घेतली. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचं तसंच भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद भुषवलेल्या नायडू यांनी वाजपेयी सरकारमध्ये ग्रामीण विकास, तर मोदी सरकारमध्ये नागरी विकास तसंच माहिती प्रसारण मंत्रिपद भुषवलं आहे. नायडू यांना त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार गोपालकृष्ण गांधी, विद्यमान उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातले सदस्य तसंच विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. येत्या ११ ऑगस्टला नायडू उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतील.

दरम्यान, उपराष्ट्रपती पदासाठी काल ९८ पूर्णांक दोन टक्के मतदान झालं. एकूण ७८५ मतदारांपैकी १४ जणांनी मतदान केलं नाही. मतदान केलेल्या ७७१ खासदारांपैकी ११ जणांची मतं बाद झाल्याची माहिती राज्यसभेचे महासचिव तथा निवडणूक अधिकारी शमशेर के शरीफ यांनी दिली.

****

नीती आयोगाच्या अध्यक्षपदी अर्थतज्ज्ञ रवीकुमार यांची नियुक्ती झाली आहे. अरविंद पनगडिया यांनी राजिनामा दिल्यानं ही नियुक्ती करण्यात आली आहे. विविध वित्त संस्थांमध्ये वरिष्ठ पदावर काम केलेल्या रवीकुमार यांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर अनेक पुस्तकं लिहीली आहेत.

****

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबई कॉंग्रेसच्या वतीनं घाटकोपर इथं मेहता यांच्या निवासस्थानाबाहेर काल धरणे आंदोलन करण्यात आलं. कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आणि प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. पोलिसांनी निरुपम आणि सावंत यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेऊन काही वेळानंतर त्यांची सुटका केली. एम.पी. मिल झोपडपट्टी पुनर्वसनात घोटाळा आणि मुंबईतील अन्य ठिकाणच्या प्रकल्पात घोटाळा केल्याचे मेहता यांच्यावर आरोप आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मेहतांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विधानभवनात विरोधी पक्षांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला. त्यानंतर आता विधानभवनाबाहेरही या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं.

****

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अपहार प्रकरणात तपासणी पथकानं दबावाला बळी न पडता तपास करून अहवाल सादर करावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. या प्रकरणातले माजी संचालक अधिकारी, कर्मचारी यांच्या मालमत्तांवर बोजा टाकावा असे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १४५ कोटी रूपयांच्या अपहरणासंदर्भात दाखल दोन याचिकांच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे आदेश दिले आहेत.

गंगाखेड शुगर अँड एनर्जी फॅक्टरीच्या पीक कर्ज घोटाळ्यात मुख्य सूत्रधारांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. परभणी, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, आकोलासह सहा जिल्ह्यातल्या अंदाजे २९ हजार शेतकऱ्यांच्या नावे बोगस कागदपत्रे जोडून ३२८ कोटी रूपयांचे पीक कर्ज उचलण्यात आले आहे. याप्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष पथक नेमण्याचे आदेश न्यायालयानं राज्याच्या पोलिस महासंचालकांना दिले आहेत.

****

सन २०१४-१५ मधल्या पीक नुकसान भरपाई निधी वाटपात दोन कोटी ९३ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी सातारा जिल्ह्यातल्या खटावचे तत्कालीन तहसीलदार आणि नंदुरबारचे सध्याचे उपजिल्हाधिकारी अमोल कांबळे यांच्यासह दोघांवर साताऱ्यातल्या वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कांबळे यांनी शेतकऱ्यांना निधी वाटप न करता तो विविध बँका आणि पतसंस्थामधल्या नातेवाईकांच्या खात्यावर वर्ग करत ती रक्कम काढून घेतली होती.

****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती राजू पाटील नवधरे आणि उपसभापती तानाजी पाटील बेंडे यांच्याविरूद्ध दाखल अविश्वास ठराव काल तेरा विरूद्ध शून्य मतानं संमत करण्यात आला. या बैठकीत अविश्वास ठराव दाखल केलेले तेराही संचालक सभागृहात उपस्थीत होते. यावेळी पीठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी काम पाहिले.

दरम्यान, अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी बोलवलेल्या बैठकीपूर्वी नवधरे यांच्या समर्थकांनी बैठकीसाठी जाणाऱ्या संचालकांच्या वाहनांवर दगडफेक केल्यानं आठ जण जखमी झाले. या संचालकांना पोलिस बंदोबस्तात सभेस्थळी आणण्यात आलं.

****

भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर फॉलोऑनची नामुष्की ओढवली, सामन्यात काल तिसऱ्या दिवशी श्रीलंकेचा पहिला डाव १८३ धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारतानं श्रीलंकेला फॉलोऑन दिला. दिवस अखेर श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात दोन बाद ०९ धावा झाल्या. उमेश यादव आणि हार्दिक पंड्यानं प्रत्येकी एक बळी घेतला. डावाने पराभव टाळण्यासाठी श्रीलंकेला अद्याप २३० धावांची आवश्यकता आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातल्या आलियाबाद या गावाला राज्य शासनाचा स्मार्ट ग्राम योजनेतील जिल्हास्तरावरचा ४० लाख रूपयांचा प्रथम क्रमांक मिळाला आहे. अलियाबादच्या ग्रामपंचायतीला आयएसओ २००१ चे नामांकन मिळाले असून संपूर्ण संगणकीकृत असलेल्या या ग्रामपंचायतीत दाखले, प्रमाणपत्र आदीसाठीही संगणकाचा वापर केला जातो. गावात सौर पथदिवे, घन कचरा व्यवस्थापन, पाणलोट विकासाची कामं तसंच लोकसंख्येच्या प्रमाणात दिडपट वृक्ष लागवड झाली आहे.

****

मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबईतल्या ९ ऑगस्टच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर काल उस्मानाबाद तसंच तुळजापूरमध्ये जनजागृती रॅलीमध्ये काढण्यात आली. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर तरूण-तरूणी सहभागी झाले होते. यावेळी आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणा देण्यात आल्या.

****

जळगावहून औरंगाबादकडे स्वयंपाकाच्या गॅसचे सिलेंडर घेऊन येणाऱ्या भारत गॅस कंपनीच्या ट्रकला अचानक आग लागून स्फोट झाला. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यात सर्व सिलेंडर्सचा एकामागे एक स्फोट होत गेल्याने आसपासचा परीसर दणाणून गेला होता. जामनेर, जळगाव, सिल्लोड इथून अग्नि प्रतिबंधक बंब बोलावून ही आग विझवण्यात आली.

****

रक्षाबंधनाचा सण उद्या साजरा होत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं यंदाच्या रक्षाबंधन सणाला प्रवाशांच्या सोयीसाठी ज्यादा एसटी बसेस सोडण्याचं नियोजन केलं आहे. त्यासाठी बसस्थानके, बसथांबे इथं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून प्रवाशांना एसटी सेवेचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करावे, असे निर्देश परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिले आहेत.

****

लातूर इथल्या केंद्रीय पोलीस राखीव दलाच्या प्रशिक्षण केंद्रातल्या तेराव्या तुकडीचा दीक्षांत समारंभ प्राचार्य तथा पोलिस उपमहानिरीक्षक डी जे सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत काल झाला. यावेळी १७० जवानांना सेवा आणि समर्पणाची शपथ देण्यात आली. जवानांनी पथसंचलन करुन अधिकाऱ्यांना मानवंदना दिली.

****

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं काल दिवसभरात विशेष तपासणी मोहीम राबवून, विनातिकीट प्रवास करणाऱ्या ४३४ प्रवाशांकडून एक लाख शेहेचाळीस हजार रुपये एवढा दंड वसूल केला. अनियमित प्रवास तसंच परवानगीपेक्षा जास्त सामान असलेल्या प्रवाशांवही कारवाई करण्यात आली.

****

No comments:

Post a Comment