Monday, 4 September 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 04.09.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 SEP. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

                                       Language Marathi      

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ सप्टेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.

****

** केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात चार राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती; नऊ नवीन चेहऱ्यांना राज्यमंत्रिपदाची शपथ

** निर्मला सीतारामन संरक्षण मंत्री; पियुष गोयल रेल्वे मंत्री; तर सुरेश प्रभू यांच्याकडे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय

** भाजपला फक्त विधेयकं मंजूर करताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीची आठवण - शिवसेना खासदार संजय राऊत यांची टीका

** श्रीलंकेविरुद्ध पाचवा एकदिवसीय सामना जिंकून भारताचा मालिकेत निर्भेळ विजय; धोनीचा शंभर यष्टिचीतचा विक्रम

आणि

** औरंगाबाद खंडपीठाची क्षमता कमी होणार नाही, याची दक्षता घेण्याचं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय ललित यांचं आवाहन

****

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात काल, चार राज्यमंत्र्यांना बढती देत कॅबिनेट मंत्रिपदीपदाची तर नऊ नवीन चेहऱ्यांना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. काल सकाळी राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथग्रहण सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्व मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. बढती मिळालेल्या मंत्र्यांमध्ये निर्मला सीतारामन यांच्यासह मुख्तार अब्बास नक्वी, पियुष गोयल आणि धर्मेंद्र प्रधान यांचा समावेश आहे. यापूर्वी वाणिज्य मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार सांभाळलेल्या सीतारामन यांच्याकडे संरक्षण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वाणिज्य मंत्रालयाचा कार्यभार सुरेश प्रभू यांच्याकडे, तर पियुष गोयल यांच्याकडे रेल्वेसह कोळसा मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. स्मृती इराणी यांच्याकडे माहिती प्रसारण तसंच वस्रोद्योग,  मुख्तार अब्बास नक्वी यांच्याकडे अल्पसंख्याक, तर धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पेट्रोलियम मंत्रालय कायम ठेवण्यात आलं आहे. प्रधान यांच्याकडे कौशल विकास मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी, सोपवण्यात आली आहे. नितीन गडकरी यांच्याकडे परिवहन मंत्रालयासह गंगा आणि जलसंसाधन मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली असून, उमा भारती यांच्याकडे पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाचा कार्यभार असेल.

      राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालयासह क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा स्वतंत्र प्रभार, आर के सिंह यांना ऊर्जा मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार, संतोष कुमार गंगवार यांना श्रम आणि रोजगार मंत्रालय, के जे अल्फोन्स यांच्याकडे पर्यटन मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार, तर हरदीप सिंग पुरी यांच्याकडे गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला आहे.

      शिवप्रताप शुक्ल - अर्थराज्यमंत्री, अश्विनीकुमार चौबे - आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, अनंत कुमार हेगडे - कौशल्य विकास राज्यमंत्री, गजेंद्र सिंग शेखावत - कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री, डॉ. सत्यपाल सिंग - मनुष्यबळ विकास तसंच जलसंसाधन राज्यमंत्री, तर वीरेंद्र कुमार - महिला आणि बालकल्याण खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पाहतील.

दरम्यान, काल शपथ घेतलेल्या केंद्रीय मंत्र्यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केलं आहे. या विस्तारामुळे महाराष्ट्राला आणखी लाभ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

****

भाजपला फक्त विधेयकं मंजूर करताना तसंच निवडणुका जवळ आल्या की, एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडी ची आठवण होते, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी सध्या एनडीए केवळ कागदावर आणि बैठकीपुरती उरल्याची टीका केली.

****

२०२२ पर्यंत सर्वांना घर देण्याचं महत्वाकांक्षी ध्येय गाठण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्यात आली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. माहिती आणि प्रसारण महासंचालनालयाच्या मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमात ते काल बोलत होते. यावेळी त्यांनी सर्वांसाठी परवडणारी घरे या विषयावर नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली.

****

राज्यातली ३० टक्क्यांपेक्षा कमी प्रवेश असलेली जवळपास ५९ अभियांत्रिकी महाविद्यालयं बंद होणार असल्याचे संकेत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद AICTE नं दिले आहेत. आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव, तसंच ३० टक्क्यांहून अधिक जागा सलग पाच वर्षे भरली न जाणारी महाविद्यालयं बंद करण्याचा AICTE चा नियम आहे. यंदाही राज्यभरातल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांतल्या ५० हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत.

****

राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती संभाजी म्हसे पाटील, यांचं काल पहाटे औरंगाबाद इथं निधन झालं, ते ७० वर्षांचे होते. पाटील यांच्या पार्थिव देहावर काल अहमदनगर जिल्ह्यातल्या नालेगाव इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

श्रीलंकेविरुद्धचा पाचवा एकदिवसीय सामना सहा गडी राखून जिंकत भारतानं पाच सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ विजय मिळवला. श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करत, भारतासमोर २३९ धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारतीय संघाचे दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद ११० धावांच्या बळावर भारतानं ४७ व्या षटकात चार गडी गमावत हे लक्ष्य साध्य केलं. पाच बळी घेणारा भुवनेश्वर कुमार सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या दौऱ्यातला एकमेव टी-ट्वेंटी सामना परवा बुधवारी खेळवला जाणार आहे.



दरम्यान या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी याने आपल्या कारकिर्दीतला १००वा यष्टीचित करत नवा विक्रम केला. असा विक्रम करणारा धोनी पहिला यष्टिरक्षक ठरला आहे. या यादीत श्रीलंकेचा कुमार संगाकारा ९९ यष्टिचीत करून दुसऱ्या स्थानी आहे.

****

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची चीनी जोडीदार पेंग शुआर्इ यांनी स्पर्धेच्या ‘अंतिम १६’मध्ये प्रवेश केला. सानिया-पेंग जोडीने मॅग्डालेना रायबरीकोव्हा आणि जाना सेपेलोव्हा जोडीचा ६-७, ६-३, ६-३ असा पराभव करत उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

****

औरंगाबाद खंडपीठाची क्षमता कमी होणार नाही, याची दक्षता घेण्याचं आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय ललित यांनी केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त काल औरंगाबाद इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशात अलीकडच्या काळात स्थापन झालेली न्यायालयांची खंडपीठं, औरंगाबाद खंडपीठाची प्रेरणा घेऊन अस्तित्वात आल्याचं ्यांनी सांगितलं, न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे यावेळी उपस्थित होते, नॅशनल लॉ स्कूलमध्ये ५४ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

****

औरंगाबाद इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं उत्कृष्ट संशोधनासाठी देण्यात येणारे नॅशनल रिसर्च प्रोफेसर पुरस्कार आज प्रदान केले जाणार आहेत. नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय भौतिकशास्त्र प्रयोगशाळेचे संचालक ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर पी.के.अस्वाल यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातील. प्राणीशास्त्र विभागाचे डॉक्टर महेंद्र सिरसाठ, डॉक्टर  के.एम.जाधव, डॉक्टर रामफल शर्मा, रसायनशास्त्र विभागाचे डॉक्टर सी.एच.गील, डॉक्टर बापू शिंगटे, संगणकशास्त्र विभागाचे डॉक्टर के.व्ही.काळे, ग्रंथालयशास्त्र विभागाच्या डॉक्टर वैशाली खापर्डे  आणि रसायनतंत्रज्ञान विभागाचे डॉक्टर अनिकेत सरकटे यांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.

****

औरंगाबाद शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणी, समस्या सोडवण्याला प्राधान्य दिलं असल्याचं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं बांधकाम व्यावसायिकांच्या 'क्रेडाई' संघटनेच्या नूतन कार्यकारिणी पदग्रहण सोहळ्यात बोलत होते. बांधकाम व्यावसायिकांनी पाणी या मुलभूत गरजेचा विचार करावा, तसंच व्यवसायात काम करणाऱ्या मजूर, ठेकेदारांना प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजनेचा लाभधारक बनवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

शासनाच्या अनेकविध कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या प्रत्येक घटकाला होण्यासाठी आणि या योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आध्यात्मिक व्यासपीठ हे अत्यंत उपयुक्त असल्याचं प्रतिपादन अपर आयुक्त विजयकुमार फड यांनी केलं. जालना जिल्ह्यातील मंठा इथं सात गाव एक गणपती या वार्षिक गणेश महोत्सवात आयोजित संवादपर्व कार्यक्रमात ते काल बोलत होते. आपल्यातली सात्विकता ही येणारी पिढी घडविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचं सांगत समाजामध्ये मुलगा आणि मुलगी ही विषमता दूर करायाची असेल तर प्रत्येकानं सकारात्मक दृष्टीकोनातुन विचार करण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

पैठणच्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा जवळपास ८१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. काल सायंकाळी धरणात सुमारे तीन हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू होती.

****

जालना इथं स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका कारसह गुटख्याचा साठा जप्त केला. जिल्ह्यातल्या भोकरदन इथून अंबड कडे हा गुटखा नेला जात होता. दोन कंपन्याचा सुमारे साडे तीन लाख रुपयाचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे.

****










No comments:

Post a Comment