Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 18 September 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ सप्टेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
राज्यातल्या
उद्योग धोरणात अत्याधुनिक तंत्रज्ञाचा वापर वाढवण्यात आल्यामुळे आंतरराष्ट्रीय उद्योगांसाठी
राज्यात पोषक वातावरण तयार झालं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं
आहे. मुंबई इथं आज इन्डो एशियन चेंबर ऑफ कॉमर्सद्वारे आयोजित दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र
हे देशात प्रथम क्रमांकाचं राज्य असून, गेल्या वर्षी राज्यात मोठ्या प्रमाणात प्रकल्प
सुरू झाले असल्याचं त्यांनी सांगितलं. इन्डो अमेरिकन कंपन्यांनी राज्यात गुंतवणूक केल्यास
उभय देशांना लाभ मिळेल तसंच सबंध वृद्धींगत होण्यास मदत होईल, असं मत मुख्यमंत्र्यांनी
यावेळी व्यक्त केलं.
****
रोहिंग्या
मुसलमान हे देशासाठी धोकादायक असून, त्यांना भारतात राहू दिलं जाणार नाही, असं केंद्र
सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे. रोहिंग्या मुसलमान भारतात बेकायदेशीरपणे
येत असून, ते हवाला, मानवी तस्करी सारख्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचं सरकारनं सादर
केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. हे लोक देशात आल्यास काही भागात लोकसंख्येचा
समतोल बिघडण्याची शक्यताही सरकारनं व्यक्त केली आहे. पुढच्या सुनावणीच्या आधी रोहिंग्यांसंदर्भातल्या
बेकायदा कारवायांचे पुरावे सादर केले जातील, असंही सरकारनं सांगितलं आहे.
****
अर्थमंत्री
अरुण जेटली यांनी आज नवी दिल्ली इथं गूगलच्या युनिफाईड पेमेंट इंटरफेस - युपीआय आधारित
डिजिटल पैसे भरणा सेवा - तेज चा शुभारंभ केला. तेज सेवा आणि इतर डिजिटल सेवांमुळे भारतात
डिजिटल व्यवहारात मोठं परिवर्तन होईल, असं जेटली यावेळी म्हणाले. गुगलच्या तेज मध्ये
मराठी, हिंदी, बंगाली, गुजराथी, तेलुगु सह अन्य प्रादेशिक भाषांचा समावेश आहे.
****
भारतीय पोलिस
सेवेतले वरिष्ठ अधिकारी वाय सी मोदी यांची राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएच्या महासंचालकपदी
नियुक्ती करण्यात आली आहे. मोदी यांनी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयचे अतिरिक्त
संचालक म्हणूनही काम पाहिलं आहे.
****
राज्यातल्या
विद्यापीठांमध्ये एक विद्यार्थी एक झाड ही योजना राबवणार असल्याचं कुलपती तथा राज्यपाल
सी विद्यासागर राव यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं आज वृक्ष लागवड संमेलनाचं उद्घाटन राज्यपालांच्या
हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार,
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यावेळी उपस्थित होते. तरुणांनी नदी संवर्धन आणि वृक्ष
लागवडीसाठी काम करण्याचं आवाहन राज्यपालांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलेल्या
भाषणात जल, वन आणि नदी संवर्धनाचा विचार गावागावातून लोकांपर्यंत पोहोचवला जाईल, असं
सांगितलं.
****
राज्य माध्यमिक
आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून दहावी आणि बारावी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर झालं
आहे. दहावीची लेखी परीक्षा एक मार्च ते २४ मार्च २०१८ दरम्यान, तर बारावीची लेखी परीक्षा
२१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१८ दरम्यान होण्याची शक्यता आहे. वेळापत्रक संभाव्य असल्यामुळे
यामध्ये बदल होऊ शकतो, असं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.
****
शिक्षकांनी
काळानुरुप आपल्यात बदल करुन घ्यायला हवा, असं शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी
म्हटलं आहे. सोलापूर इथं आज राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचे आदर्श शिक्षक पुरस्कार
तसंच सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराचं वितरण तावडे यांच्या हस्ते झालं,
त्यावेळी ते बोलत होते. शिक्षकांनी स्वत:ला अद्ययावत ठेऊन नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब
करावा, असं ते म्हणाले. अभ्यासक्रमातही काळानुरुप बदल होण्याची गरज तावडे यांनी यावेळी
व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसोबत जलप्रतिज्ञा घेऊन, त्यांच्याशी
संवाद साधला. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी पायाभूत चाचण्या सुरु केल्या असल्याचं
त्यांनी सांगितलं.
****
लातूर इथं
स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता
मोहीम राबवण्यात आली. खासदार डॉ सुनिल गायकवाड यांनी या मोहीमेत सहभाग नोंदवला. त्यानंतर
त्यांनी महाविद्यालयाच्या विकास कामाविषयी आणि स्वच्छतेविषयी अधिष्ठाता डॉ राजाराम
पोवार आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
****
राज्यातल्या
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे सुमारे ७३ लाख बालकांना सात दिवस पोषण आहार
न मिळाल्यानं अनेक बालकं तीव्र कुपोषणाच्या मार्गावर असल्याचं निदर्शनास आलं आहे. मानधन
वाढीच्या मागणीसाठी दोन लाख अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर आहेत.
दरम्यान, अंगणवाडी
कर्मचाऱ्यांनी आज जालना इथं मोर्चा काढला. गांधीचमन चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत
काढण्यात आलेल्या या मोर्चात अंगणवाडी सेविका, मदतनिस यांनी सहभाग घेत, जिल्हाधिकाऱ्यांना
आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं.
****
औरंगाबाद इथं
आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं पैठण गेट परिसरात पेट्रोल दरवाढीचा तीव्र निषेध
करण्यात आला. फलक झळकावत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment