Thursday, 21 September 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 21.09.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 September 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ सप्टेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राज्याचा दौरा करुन आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचं राणे यांनी सांगितलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ इथं जाहीर सभेत आज ते बोलत होते.
आपल्याला चार वेळा मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन देऊन काँग्रेसनं ते पाळलं नसल्याचा आरोप राणे यांनी काँग्रेस पक्षावर केला. सत्तेत असताना, हवं ते खातं मागा असं सांगून काँग्रेसनं आपल्याला विश्वासात न घेता उद्योग खातं दिलं असं त्यांनी सांगितलं. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर तसंच शिवसेनेवरही त्यांनी यावेळी जोरदार टीका केली. मी काँग्रेसपक्ष सोडल्यानंतर २५ नगरसेवकांनी लगेच काँग्रेस पक्ष सोडला असून यानंतर अनेक जिल्ह्यातून अनेक जण काँग्रेस पक्ष सोडतील असं राणे म्हणाले.

****

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज आपल्या नव्या संघटनेची घोषणा केली. ‘रयत क्रांती संघटना’ असं या संघटनेचं नाव आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत मतभेद झाल्यानंतर खोत यांना संघटनेतून बाहेर काढण्यात आलं होतं.

****

उत्तर महाराष्ट्राचं आराध्यदैवत आणि साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धे पीठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील वणी इथल्या सप्तश्रृंगी देवीच्या शारदीय नवरात्रास प्रारंभ झाला आहे. यानिमित्त आज वैदिक मंत्रोच्चारात देवीच्या अलंकारांची महापूजा करण्यात आली. देवस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हा सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. नवरात्राच्या निमित्तानं देवीचं मंदिर २४ तास खुलं राहणार असून या परिसरात संपूर्ण प्लास्टिक बंदीचा निर्णय देवस्थानच्या वतीनं घेण्यात आला आहे. यावर्षीपासून प्रथमच बोकड बळी प्रथेवर बंदी घालण्यात आली आहे.
औरंगाबाद शहरातल्या कर्णपुरा इथल्या मंदिरातही शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला. तुळजापूर, माहूर, अंबाजोगाई इथल्या नवरात्रौत्सवासही परंपरेनुसार आज प्रारंभ झाला आहे.

****

जालना जिल्ह्यात आज दुपारपासून मध्यमस्वरूपाचा पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदी-नाले ओसंडून वाहत असून अनेक भागात पिकांमध्ये पाणी साचलं आहे. जालना शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या घाणेवाडी जलाशयातील जलसाठा १६ फुटांपर्यंत वाढला असून पाण्याची आवक सुरुच आहे. शहरातल्या मोती तलावाच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. औरंगाबाद शहरातही आज दिवसभरापासून पावसाची उघडझाप सुरु आहे.
पाणी पातळी वाढल्यामुळे सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे आज दुपारी एक वाजता आणखी एक फुट वर उचलण्यात आले. यामुळे नदी पात्रात १८ हजार सातशे चौसष्ठ घनफूट प्रति सेकंद इतक्या पाण्याचा विसर्ग होणार आहे.

****

डिजीटल सरकार हे चांगलं सरकार असून गरीबांसाठी अधिक लाभदायी असल्याचं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. डिजीटल संपर्काच्या माध्यमातून सरकारच्या कामाचा स्तर उंचावणं हा सरकारचा विकासाचा मंत्र असल्याचं त्यांनी नमूद केलं. डिजीटल पद्धतीनं सेवा पुरवणं म्हणजेच डिजीटल इंडिया प्रत्यक्षात साकारणं असून, सरकार या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, सबका साथ सबका विकास साठी कटीबद्ध असल्याचं प्रसाद म्हणाले.

****

जम्मू कश्मिरच्या त्राल मधल्या पुलवामा इथं आज सकाळी दहशतवाद्यांनी बाँब हल्ला केला. या हल्ल्यात  सहा नागरिकांचा मृत्यू झाला असून १७ जण जखमी झाले आहेत.

****

भारतीय क्रिकेट संघ पुढच्या वर्षी पाच जानेवारी पासून दक्षिण आफ्रिकेचा दौरा करेल. या दौऱ्यात भारतीय संघ तीन कसोटी सामने, सहा एकदिवसीय तर तीन टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळेल. सामन्यांची ठिकाणं आणि तारखा नंतर जाहीर केल्या जाणार आहेत.

****

हैदराबाद इथं पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईत आखाती देशातल्या शेख लोकांशी लग्नासंबंधीचं रॅकेट उघडकीला आलं आहे. या रॅकेटचा प्रमुख सुत्रधार मुंबईचा रहिवासी  असून काजी फरीद अहमद खान असं त्याचं नाव आहे. बाल विवाह आणि करार विवाहांच्या प्रकरणांच्या चौकशी दरम्यान हे रॅकेट उघडकीस आलं. या प्रकरणी २० लोकांना अटक करण्यात आली असून यातले पाच जण ओमानचे, कतार चे तीन, तीन काजी, पाच स्थानिक दलाल तर चार जण हॉटेलचे मालक आहेत. दलालांकरवी गरीब कुटुंबातल्या कमी वयाच्या मुलींची ओळख करवून घेऊन त्यांना सोयी सुविधा पुरवून अशा लग्नांसाठी तयार करुन या रॅकेटचा भाग बनवलं जात होतं.

****

No comments:

Post a Comment