▼

Wednesday, 13 September 2017

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 13.09.2017 17 .25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 September 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ सप्टेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे, यांचं दोन दिवसांच्या भारत भेटीसाठी आज अहमदाबाद इथे आगमन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर शिंजो आबे यांचं स्वागत केलं. हे दोन नेते विमानतळापासून साबरमती आश्रमापर्यंत एका रोड शो मध्ये सहभागी झाले. साबरमती आश्रमात या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला फुलं अर्पण करून अभिवादन केलं. आज रात्री या नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार असून, उद्या दोन्ही पंतप्रधानांच्या हस्ते मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं भूमीपूजन होणार आहे.

****

सरकारनं तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘जन धन योजने‘च्या माध्यमातून आत्तापर्यंत सुमारे तीस कोटी कुटुंबांची बँक खाती उघडण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. आज नवी दिल्ली इथे झालेल्या एका अर्थविषयक परिषदेमध्ये ते बोलत होते. ही योजना सुरू होण्यापूर्वी देशातली बेचाळीस टक्के जनता बँकिंग सुविधेपासून वंचित होती, असं त्यांनी यावेळी सांगितलं. या योजनेच्या सुरुवातीच्या काळात शून्य बॅलन्स असणाऱ्या खात्यांचं प्रमाण सुमारे शहात्तर टक्के होतं, ते आता वीस टक्क्यांवर आल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणाची व्याप्ती वाढवल्यानंतर हे प्रमाण अजूनही कमी होईल, असं जेटली यांनी म्हटलं आहे.

****

नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाला सगळ्या बँकांनी आर्थिक सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी केलं आहे. बँक अधिकाऱ्यांसोबत आज मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. या महामार्गामुळे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येणार असून, लाखो लोकांना रोजगाराची संधी मिळणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अनेक राष्ट्रीयीकृत बँकांच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देण्याचं यावेळी मान्य केलं.

****

राज्यातल्या अन्न आणि कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी तयार करण्यात आलेलं धोरण मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी तातडीनं सादर करावं, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. अन्न आणि कृषी प्रक्रिया उद्योगासंदर्भात तयार करण्यात आलेल्या धोरणाचा आढावा घेण्यासाठी आज मुंबईमध्ये बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात प्रक्रिया उद्योगाला चालना मिळावी यासाठी कृषी आयुक्तालयात अन्न प्रक्रिया संचालनालय स्थापन करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत येत्या १५ सप्टेंबरपर्यंत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठीचे अर्ज अजून सादर केलेले नाहीत त्यांनी उद्यापर्यंत अर्ज सादर करावेत, असं आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे. या योजनेसाठी १२ सप्टेंबरपर्यंत ४४ लाख २१ हजार ६६५ शेतकरी कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले असून, या अर्जांमधल्या माहितीची छाननी पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे.  दरम्यान, कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी धुळे जिल्ह्यातल्या ८५ हजार ४८५ शेतकऱ्यांनी अर्ज भरले असल्याचं, तसंच तांत्रिक अडचणींमुळे अर्ज भरण्यात होणाऱ्या विलंबामुळे अंतिम मुदत वाढवून देण्याची मागणी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

ग्रामपंचायत आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणूक शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी निवडणूक आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करावं, तसंच मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी आज दिले. नांदेड इथे आज यासंदर्भात एक आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. थेट सरपंचपदासाठी यावेळी पहिल्यांदाच मतदान होत असल्यानं यासंदर्भातही मतदार जागृती करावी, असे आदेश सहारिया यांनी यावेळी दिले.

****

सहकारी संस्थांनी वसूली आणि पारदर्शक कारभारावर भर देऊन आपली संस्था नफ्यात ठेवण्यासाठी काम करण्याचं आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे. बागडे यांच्या हस्ते आज औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ठेवीदार आणि कर्जदारांना रुपे किसान क्रेडिट कार्डचं वाटप करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते.

सहकारी संस्था आर्थिकदृष्या बळकट राहिल्यास,गरजू आर्थिक दुर्बल घटक आणि शेतकऱ्यांना सावकाराच्या जाचक दडपणापासून दूर ठेवून वेळेवर आर्थिक मदत करणं शक्य होईल, असं ते म्हणाले.

****

राज्यभाषा हिंदी दिन उद्या साजरा करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या वतीनं विविध मंत्रालयात, विभागात आणि कार्यालयात राजभाषेचा उत्कृष्ट वापर करणाऱ्या प्रमुखांना विज्ञान भवन, नवी दिल्ली इथं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. यावेळी देशातल्या विविध भाषेतून हिंदी भाषा शिकण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लर्निंग इंडियन लैंग्वेज विद आर्टिफिशियल इंटेलिजेंस अर्थात लीला या मोबाइल एपचं लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.

****

No comments:

Post a Comment