Tuesday, 5 September 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 05.09.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 5 September 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ५ सप्टेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

ज्या राजकारण्यांवर गंभीर गुन्ह्यांसाठी आरोप निश्चित करण्यात आले आहेत अशा राजकारण्यांना निवडणूक लढवण्यास प्रतिबंध घालण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणीसाठी एका पाच सदस्यीय न्यायाधिशांच्या पीठाची निर्मिती केली जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील एका पीठापुढे एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं ही माहिती दिली.

****

सर्वसामान्यांच्या जीवनात कायापालट घडवून आणण्यासाठी काम करा, असा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय प्रशासन सेवा - आयएएस मध्ये निवड झालेल्या नवीन अधिकाऱ्यांना दिला. २०१६ तुकडीतून महाराष्ट्र केडरमध्ये निवड झालेल्या आयएएस अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी या अधिकाऱ्यांकडून प्रशासकीय सेवेत येण्यामागचा उद्देश जाणून घेतला. नेमणुकीस असलेल्या जिल्ह्यातील समस्या, अधिकाऱ्यांनी तिथल्या परिस्थितीचं केलेलं निरीक्षण आदीं बाबींवर मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली.

****

विवाहीत जोडप्यांमधील गर्भनिरोधक पद्धतींची वाढती गरज लक्षात घेता आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दोन नवीन गर्भनिरोधक पद्धती सुरु केल्या आहेत. यामध्ये अंतरा कार्यक्रमांतर्गत इंजेक्टेबल गर्भनिरोधक एमपीए आणि छाया गर्भनिरोधक गोळ्या यांचा समावेश आहे.

***

राज्यभरात सर्वत्र गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात सुरू आहे. मुंबईत गणेशगल्लीचा राजा, लालबागचा राजा पाठोपाठ अनेक मोठे गणपती विसर्जनासाठी समुद्र किनाऱ्यांकडे मार्गस्थ झाले आहेत. पुण्यातही मानाच्या गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर अनेक मंडळांच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका सुरू आहेत.
नाशिक शहरात गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत गुलाल उधळत बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. प्रदूषण टाळण्यासाठी देव द्या देवपण घ्या ही गणेश मूर्तींचं दान स्वीकारण्याची चळवळ हे नाशिकच्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य आहे.
मराठवाड्यात औरंगाबादसह सर्वत्र गणेश विसर्जन सोहळा पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशाच्या गजरात सुरू आहे. औरंगाबाद इथं घरगुती गणपतींपाठोपाठ सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचं विसर्जन सुरू आहे.
बीड जिल्ह्यातही गणपती बाप्पा मोरयाचा गजरात आणि गुलालाची उधळण करत बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीला दुपारी प्रारंभ झाला. स्वयंसेवी संघटनांतर्फे गणेश भक्तांना या विसर्जन मिरवणुकीत पाणी, फळं, नाश्त्याचं वाटप केलं जात आहे.
नांदेड जिल्ह्यात आणि शहरात श्री विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या आहेत. विसर्जन घाटावर १७० जीवन रक्षक तैनात करण्यात आले आहेत. शहरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे
लातूर शहरातील लहान मंडळाचे विसर्जन सुरु आहे. शहरात पाच ठिकाणी श्री च्या विसर्जनाची महापालिकेच्या वतीने व्यवस्था करण्यात आली असुन अग्नीशामक दला सोबत जीवनरक्षक तैनात करण्यात आले आहेत. पोलीस बंदोबस्त मोठ्या संख्येने असून मिरवणूकीसाठी वाहतूक मार्गात बदल केले आहेत.
परभणी, हिंगोली, उस्मानाबाद इथंही गणेश विसर्जन उत्साहात सुरू आहे.

****

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारनं ६०५ अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी विशेष मागास वर्ग कल्याण मंत्री राम शिंदे यांनी दिली आहे. राज्यातल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास वर्गातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या ६०५ अभ्यासक्रमांमध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय, वास्तुशास्त्र, कृषी, आयुर्वेद, फलोत्पादन, संगणक शास्त्र, या विषयांच्या अभ्यासक्रमांसाठी ही शिष्यवृत्ती मिळणार आहे.

****

बीड जिल्ह्यातील बिंदुसरा नदीवरील पूल ८४ वर्षे जुना आणि जीर्ण झाला असून पूलाचा डेक स्लॅब वारंवार कोसळत असल्यामुळे वाहतुकीस धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीकरीता बंद ठेवण्यात यावा असं  भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प सुधारणा विभागाकडून कळवण्यात आलं आहे. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत या पुलावरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

****

केंद्र शासनाच्या पेयजल आणि स्वच्छता मंञालयाच्या वतीनं आयोजित ‘स्वच्छाथॉन’ या देश पातळीवरील स्पर्धेत नांदेड जिल्हा परिषदेची पहिल्या फेरीत दिल्ली इथं सादरीकरणासाठी निवड करण्यात आली आहे. याबद्दल राज्य शासनाच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचं अप्पर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांचा औरंगाबाद इथं काल सत्कार केला.

****

No comments:

Post a Comment