Saturday, 30 September 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 30.09.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 SEP. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० सप्टेंबर २०१७ सकाळी .५० मि.
****
** मुंबईत प्रभादेवी इथं चेंगराचेंगरी होऊन २२ जण ठार तर ४० हून अधिक जण जखमी
** रेल्वेला सर्वाधिक महसूल देणारी मुंबई उपनगरी रेल्वे सेवा स्वतंत्र करावी- शिवसेनेची मागणी
** राज्यात सर्व ग्रामपंचायतीमध्ये उद्या महिला सभा; गर्भलिंग निदानविरोधी शपथ घेतली जाणार
** स्वच्छ भारतअभियानांतर्गत महाराष्ट्राची कामगिरी देशात चांगली
आणि
** आज िजयादशमी; शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता; धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन  
**
****
मुंबईत प्रभादेवी आणि परळ या दोन रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होऊन २२ जण ठार तर ४० हून अधिक जण जखमी झाले. काल सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये एकूण १४ पुरुष आणि आठ महिलांचा समावेश आहे. जवळपास ३९ जखमींवर परळ इथं केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी काल मुंबर्इतला आपला नियोजित कार्यक्रम रद्द करत केएर्इएम रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना रेल्वे मंत्र्यांनी दहा लाख रुपये तर राज्यशासनातर्फे पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. गंभीर जखमींना एक लाख रुपये तर किरकोळ जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेची राज्य शासन आणि रेल्वे विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. रुग्णालयात जखमींची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या दुर्घटनेसाठी दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देत, भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी रेल्वे प्रशासनाला विविध उपाययोजनांसह आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

रेल्वे मंत्रालयाला सर्वाधिक महसूल मिळवून देणारी मुंबई उपनगरी रेल्वे सेवा स्वतंत्र करावी, आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काकोडकर समितीने केलेल्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सकाळी केईएम रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली, त्यानंतर ही मागणी करण्यात आली.
      या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. मुंबईकरांना बुलेट ट्रेनची नव्हे तर सुरक्षित लोकल प्रवासाची गरज असल्याचं, चव्हाण म्हणाले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनते धनंजय मुंडे यांनी, ही दुर्घटना म्हणजे, सरकारची अनास्था आणि बेपर्वाईनं घडवलेलं हत्याकांड असून त्याबद्दल दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असं म्हटलं आहे. दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना रेल्वेत नोकरी द्यावी, तसंच बुलेट ट्रेनसाठी राज्यशासन खर्च करणार असलेले पाच हजार कोटी रुपये तातडीने मुंबईच्या रेल्वे सुधारणेसाठी वर्ग करण्याची मागणीही मुंडे यांनी केली.
****
ग्रामपंचायतींना ताकद देणाऱ्या ७३ व्या आणि ७४ व्या घटना दुरूस्तीला यंदा २५ वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये एक ऑक्टोबरला होणाऱ्या महिला सभांमध्ये गर्भलिंग निदानविरोधी शपथ घेतली जाणार आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी ही माहिती दिली. त्या काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होत्या. या सभेत होणाऱ्या ठरावांबाबत माहिती देताना त्या म्हणाल्या...
डीपीडीसी चा जो निधी असतो, त्या माध्यमातून निदान दहा टक्के निधीची कामं ही त्या दिवशी महिलांनी सुचवावीत, ग्रामसभेनं ठराव घ्यावा, आणि निर्णय घ्यावा की आम्ही सगळे प्रयत्न करू की आमच्या शाळेतली एकही मुलगी शाळाबाह्य राहणार नाही. गर्भलिंग निदान करणार नाही, आमचं गाव हे गर्भलिंग निदान कुठेही करणार नाही, त्यापासून मुक्त राहील. शौचालय बऱ्याचदा वापरलं पण जात नाही. त्यामुळे ते वापरण्याची मानसिकता व्हावी, याकरता सुद्धा प्रयत्न करण्याकरता ठराव घेण्यात यावा, असे चार ठराव, हे मी या निमित्त सगळ्यांना आवाहनही करते, सगळ्या ग्रामसभांना आणि सगळ्या जिल्हा परिषदेच्या सीईओंना, की त्यांच्याकडच्या ग्रामसभा त्यांनी या विषयावर घ्याव्यात.
****
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या प्रभावी अंमलबाजवणीसाठी राज्यस्तरीय विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी ही माहिती दिली. या विशेष नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून सहकार विभाग, माहिती तंत्रज्ञान विभाग, राज्यातील सर्व बँका, आणि आपले सरकार पोर्टलद्वारे प्राप्त माहितीवर समन्वयातून कामकाज करण्यात येणार आहे.
****
स्वच्छ भारतअभियानांतर्गत महाराष्ट्राची कामगिरी देशात चांगली असून राज्य २०१८ पर्यंत उघड्यावर शौचापासून मुक्त करण्यासाठी गावागावात स्वच्छतेचा संदेश पोहोचवावा, असं आवाहन पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं आहे. ते काल अमरावती विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. शौचालय बांधकामात राज्या समाधानकारक काम झालं असून, १५ जिल्हे, १६३ तालुके, १८ हजार ग्रामपंचायती आणि २६ हजार गावं उघड्यावर शौचापासून मुक्त झाले असल्याची माहिती लोणीकर यांनी दिली.
****
ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं, ते ६७ वर्षांचे होते. हिंदी, इंग्रजी भाषेतले अनेक चित्रपट, टीव्ही मालिका तसंच नाटकांमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या.पद्मश्री या नागरी पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
विजयादशमी अर्थात दसरा आज सर्वत्र साजरा होत आहे. ाज्यपाल सी विद्यासागर राव तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या सणानं समाजातला बंधुभाव वृद्धींगत होवो असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे, तर अनिष्ट प्रथांना तिलांजली देऊन विधायकतेचा स्वीकार करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात केलं आहे.
दरम्यान, काल महानवमीला ठिकठिकाणच्या नवरात्रोत्सवाची सांगता झाली. मराठवाड्यात उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं तुळजाभवानी, नांदेड जिल्ह्यात माहूर इथं रेणुका तसंच बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सुरक्षेसह इतर व्यवस्था करण्यात आली आहे. ुळजापूर इथं तुळजाभवानी देवीचा सीमोल्लंघन सोहळा आज पहाटे पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला. देवीच्या पाच दिवसांच्या मंचकी निद्रेला आजपासून प्रारंभ होत आहे.
****
धम्मचक्र प्रवर्तन दिन आज सर्वत्र साजरा केला जात आहे. यानिमित्त आज ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतरत्न डॉ.बासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीनं नागपूर इथं दीक्षा भूमीवर मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
****
नांदेड तसंच औरंगाबाद इथल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात आज कामकाज सुरू राहणार आहे. वाहनधारकांनी या सुविधेचा लाभ घेऊन, वाहनांची नोंदणी करून घ्यावी, असं आवाहन, नांदेडच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
पैठणचं जायकवाडी धरण शंभर टक्के भरलं आहे. धरणात सध्या तीन हजार दोनशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून, धरणाच्या डाव्या कालव्यातून एक हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं तर उजव्या कालव्यातून पाचशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात होणारी अत्यल्प आवक पाहता, धरणातून अद्याप विसर्ग करण्याची शक्यता नाही, असं पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, नाशिक शहरात काल दुपारी सुमारे पाऊण तास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती.
****
ळगाव इथले ज्येष्ठ पत्रकार विद्याधर पानट यांचं काल निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. आज सकाळी त्यांच्या पार्थिव देहावर जळगाव इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
एक ऑक्टोबर हा दिवस ऐच्छिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. रक्तदानाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती व्हावी या उद्देशानं एक ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाच्या विभागीय रक्तपेढीच्या वतीनं जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
दरम्यान, घाटी रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाला आज दसर्ऱ्यानिमित्त सुटी असून, उद्या रविवारी बाह्यरुग्ण विभाग सुरू राहणार आहे.
****
इंधन दरवाढीच्या निषेधासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उस्मानाबाद शाखेच्या वतीनं येत्या सहा ऑक्टोबरला उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी जारी केलेल्या एक पत्रकात ही माहिती देण्यात आली.
****
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या एक हजार ३२९ गावात दोन लाख ६६ हजारावर कर्जमाफी अर्जांचं चावडी वाचन केलं जात आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता लागू असलेल्या ग्रामपंचायती वगळता, इतर सर्व गावांमध्ये हे अर्ज वाचन सुरू असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. कर्जमाफी अर्जांवरचे आक्षेपही या दरम्यान स्वीकारले जाणार आहेत.
****
बीड जिल्ह्यात ई-पॉस मशिनद्वारे धान्य वाटप न करणाऱ्या ६२५ स्वस्त धान्य दुकानांविरुद्ध  जिल्हा पुरवठा विभागानं  कारवाईचा इशारा दिला आहे. दुकानदारांना ई-पॉस मशीन हाताळण्याचे प्रशिक्षणही देऊनही काही दुकानदार अजूनही  यंत्रणेचा वापर करत नसल्यानं ही कारवाई केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
****


No comments:

Post a Comment