Tuesday, 19 September 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 19.09.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 SEP. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ सप्टेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.

****

** महाराष्ट्राचं सिंचन क्षेत्र येत्या दोन वर्षात ४० टक्क्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी २६ प्रकल्पांची आखणी

** राज्यात सत्तेत कायम राहण्यासंदर्भात शिवसेना लवकरच निर्णय घेणार

** दहावी आणि बारावी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर

** एक्क्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता बडोद्यात

आणि

** जायकवाडी धरणाची पाणी पातळी सुमारे ८८ टक्के; गोदाकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा

****

महाराष्ट्राचं सिंचन क्षेत्र येत्या दोन वर्षात ४० टक्क्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचं, केंद्रीय परिवहन आणि जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. राज्य शासन आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज - फिक्की यांच्या वतीनं आयोजित ‘प्रगतीशील महाराष्ट्र २०१७’ या परिषदेचं पाचवं पर्व मुंबईत सुरु आहे, या परिषदेत ते काल बोलत होते. महाराष्ट्राचं सिंचन क्षेत्र सध्या केवळ २२ टक्के इतकं आहे, ते ४० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करुन २६ प्रकल्पांची आखणीही केल्याची माहिती, गडकरी यांनी दिली. सिंचन वाढल्यास, राज्याचा कृषी विकास दर २२ ते २३ टक्क्यापर्यंत पोहोचू शकेल, असं ते म्हणाले. यापुढे कालव्यांऐवजी जलवाहिन्यांद्वारे पाणी पोहोचवलं जाईल, वाहतुकीसंदर्भात दूरदृष्टीनं अनेक प्रकल्प राबवले जातील, आणि येत्या दोन वर्षात राज्याचा चेहरामोहरा बदलून देशात महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

राज्यातल्या उद्योग धोरणात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात आल्यामुळे आंतरराष्ट्रीय उद्योगांसाठी राज्यात पोषक वातावरण तयार झालं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं इन्डो अमेरिकन चेंबर फ कॉमर्सद्वारे आयोजित दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. इन्डो अमेरिकन कंपन्यांनी राज्यात गुंतवणूक केल्यास उभय देशांना लाभ मिळेल तसंच सबंध वृद्धींगत होण्यास मदत होईल, असं मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

राज्यात विद्यापीठांमध्ये एक विद्यार्थी एक झाड योजना राबवणार असल्याचं कुलपती तथा राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं काल वृक्ष लागवड संमेलनाचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. तरुणांनी नदी संवर्धन आणि वृक्ष लागवडीसाठी काम करण्याचं आवाहन राज्यपालांनी केलं.

**** 

शिक्षकांनी काळानुरुप आपल्यात बदल करुन घ्यायला हवा, असं शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. राज्य शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कार तसंच सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराचं वितरण काल सोलापूर इथं तावडे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. शिक्षकांनी स्वत:ला अद्ययावत ठेऊन नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असं ते म्हणाले. अभ्यासक्रमातही काळानुरुप बदल होण्याची गरज तावडे यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, सोलापूर विद्यापीठाचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ असं नामकरण करावं, या मागणीसाठी धनगर समाजाच्या कायकर्त्यांनी या कार्यक्रमात घोषणाबाजी करत, पत्रकं भिरकावली. तर दुसरीकडे लिंगायत समाजानं या विद्यापीठाचं सिद्धेश्वर विद्यापीठ असं नामकरण करण्यासाठी काल सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्यात सत्तेत कायम राहण्यासंदर्भात शिवसेना लवकरच निर्णय घेणार असल्याचं, खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी काल मुंबईत शिवसेनेचे मंत्री, आमदार, तसंच खासदारांची बैठक घेतली, त्यानंतर राऊत पत्रकारांशी बोलत होते. सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्यानं, सध्या राज्यात तसंच देशभरात सरकारविरोधात तीव्र संताप असल्याचं, राऊत यांनी सांगितलं. त्यामुळे अशा सरकारमध्ये सहभागी राहण्यात शिवसेनेला स्वारस्य नाही, असं राऊत यांनी नमूद केल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. याबाबतीत पक्षप्रमुखांचा निर्णय सर्वमान्य असल्याचं, राऊत म्हणाले. महागाईच्या निषेधार्थ राज्यव्यापी मोर्चा काढण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याचं राऊत यांनी सांगितलं.

****

ग्रामविकास विभागाच्या वतीनं १ ते १५ ऑक्टोबर दरम्यान ग्रामसमृद्धी आणि स्वच्छता पंधरवाडा साजरा होणार आहे. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या तसंच ग्रामपंचायतींनी झीरो पेंडन्सी आणि कार्यालयांची स्वच्छता मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. मिशन अंत्योदय अंतर्गत मुंबई इथं ग्रामसमृद्धी आणि स्वच्छता पंधरवड्याच्या नियोजनासाठी आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत काल त्या बोलत होत्या. 

दरम्यान, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधानवाढीबाबत सरकार सकारात्मक असून, बालकांना वेठीस न धरता संप मागे घ्यावा, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे. या संदर्भातला प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवला असून, त्यावर कार्यवाही सुरू असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून दहावी आणि बारावी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर झालं आहे. दहावीची लेखी परीक्षा एक मार्च ते २४ मार्च २०१८ दरम्यान, तर बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१८ दरम्यान होण्याची शक्यता आहे. वेळापत्रक संभाव्य असल्यामुळे यामध्ये बदल होऊ शकतो, असं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.

****

एक्क्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात होणार असल्याची घोषणा महामंडळानं काल नागपूर इथं केली. संमेलन स्थळाच्या वादानंतर हिवरा आश्रमानं संमेलनाच्या आयोजनातून माघार घेतली होती. बडोद्यातल्या मराठी वाङमय परिषदेकडून संमेलनाच्या आयोजनासंदर्भात अनुकूलता दर्शवणारं पत्र प्राप्त झाल्यानंतर ही महामंडळानं काल ही घोषणा केली.

****

पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी सुमारे ८८ टक्क्यांपर्यंत पोहोचली असल्यानं, मराठवाड्यात गोदावरी नदी काठालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात आगामी दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढल्यास, धरणातून कधीही पाण्याचा विसर्ग करावा लागू शकतो, त्यामुळे नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क राहावं, नदीपात्रात जाणं टाळावं, असं आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चारुदत्त बनसोड यांनी केलं आहे. धरणात काल सायंकाळी सुमारे साडे १० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु होती.

****

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काल काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं  अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद इथं काल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं पैठण गेट परिसरात पेट्रोल दरवाढीचा तीव्र निषेध करण्यात आला. तर काँग्रेसच्या वतीनं क्रांतीचौक परिसरात निदर्शनं करण्यात आली

लातूर इथं राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर काँग्रेसच्या वतीनं बार्शी रस्त्यावर आंदोलन करण्यात आलं. अतिरीक्त दरवाढ मागे घेण्यात आली नाही तर जनआंदोलन करण्याचा इशाराही या पक्षांनी दिला आहे.

****

मानधन वाढीसह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी काल जालना इथं मोर्चा काढला. गांधीचमन चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून संघटनेच्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं.

****

औरंगाबाद इथं एका प्राध्यापकाकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना गजानान तुपे या पोलिस हवालदाराला काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ अटक केली. एका प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी तुपे यानं लाच मागितली होती.

****

लातूर इथं स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत काल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. खासदार डॉ सुनील गायकवाड यांनी या मोहीमेत सहभाग नोंदवला. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयातली विकास कामं आणि स्वच्छतेविषयी अधिष्ठाता डॉ राजाराम पोवार आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

****

पुणे इथल्या क्रांतीगुरु लहुजी साळवे यांच्या स्मारकाचं आरक्षण कायम ठेवावं या मागणीसाठी मातंग शक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं काल जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. हे स्मारक पुणे शहरात तत्काळ उभारण्यात यावं अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या ३५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सदस्य पदाकरता १७ तर सरपंच पदाकरता ९ असे एकूण २६ अर्ज प्राप्त झाले आहेत. २२ सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून, मतदान सात ऑक्टोबरला होणार आहे. या निवडणुकीत जिल्ह्यात साडे तीन हजारावर लोकप्रतिनिधी निवडले जाणार आहेत.

****

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांचं लवकरच औरंगाबाद इथं स्मारक उभारलं जाणार आहे. महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी ही माहिती दिली. रेणापूरचे स्वातंत्र्यसैनिक मुर्गाआप्पा खुमसे यांनी औरंगाबाद खंडपीठात या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं पुतळा उभारणीसाठी योग्य जागेची पाहणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार क्रांतीचौकात काळा चबुतरा इथं उभारल्या जात असलेल्या दोनशे फूट उंच ध्वजाजवळ रामानंद तीर्थ यांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याचं, मुगळीकर यांनी सांगितलं.

****




No comments:

Post a Comment