▼

Monday, 18 September 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 18.09.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 SEP. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ सप्टेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.

****

** सरदार सरोवर प्रकल्पामुळे लाखो शेतकऱ्यांचं भवितव्य बदलणार - पंतप्रधानांचं प्रतिपादन

** हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन काल ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी साजरा

** मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे संकेत

** कोरिया खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू अजिंक्य

आणि

** डकवर्थ लुईस नियमाआधारे पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय

****

सरदार सरोवर प्रकल्पामुळे देशातल्या लाखो शेतकऱ्यांचं भवितव्य बदलणार असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमधल्या नर्मदा जिल्ह्यात केवाडिया इथं उभारण्यात आलेल्या सरदार सरोवर धरणाचं राष्ट्रार्पण केल्यानंतर दभोई इथं आयोजित सभेत ते काल बोलत होते. या धरणावर उभारण्यात आलेल्या जलविद्युत  प्रकल्पामुळे गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाला वीज मिळणार असून पेयजल तसंच सिंचनासाठी लाभ होणार आहे. सरदार सरोवर धरण देशातलं सर्वात मोठं आणि अमेरिकेतल्या ग्रँड क्युली धरणानंतर जगातलं दुसरं सर्वात मोठं धरण आहे.

****

देशाचा विकास करण्यासाठी, तसंच गरीबी, भ्रष्टाचार आणि कर्जबाजारीपणातून मुक्तीसाठी आता संग्राम करायचा असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. दमणगंगा पिंजाळ प्रकल्पातून मराठवाड्याला ५० टीएमसी पाणी, शेतकरी कर्जमाफी, औद्योगिक विकास, औरंगाबादसह मराठवाड्यातल्या इतर शहरांचा विकास, या मुद्यांवर मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणावर भर दिला. ते म्हणाले…

पीक विम्याची योजना केली आणि जवळजवळ ५३ लाख म्हणजे ८० टक्के जे काही विमा निघाला तो एकट्या मराठवाड्यामध्ये निघाला. आणि देशामध्ये सर्वात जास्त विमा प्राप्त केलेले देखील जे काही जिल्हे आहेत त्यात मराठवाड्यातले जिल्हे आहेत. यासोबत राज्य सरकारने जी कर्जमाफीची योजना घोषित केली, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद हा मराठवाड्यात मिळालेला आहे. आणि लवकरच आता त्याची छाननी करुन मराठवाड्यासहीत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या अकाऊंटमध्ये कर्जमाफीचे पैसे देण्याची सुरुवात होईल. आपल्याला गरीबीपासनं मुक्ती हवीय. भ्रष्टाचारापासून मुक्ती हवीय. दहशतवादापासनं आपल्याला मुक्ती हवीय. शेतकऱ्यांना कर्जापासनं मुक्ती हवीय. हा मुक्तीचा संग्रामदेखील एकत्रितपणे आपण लढू आणि निश्चितपणे मराठवाडा यामध्येही विजयी होईल.



यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. पोलिस दलाच्या वतीनं हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री रामदास कदम, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, वक्फ मंडळाचे अध्यक्ष एम एम शेख, खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मराठवाड्यात सर्वत्र मुक्तीसंग्राम दिन साजरा झाला.

जालना इथं पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते, बीड इथं जिल्हाधिकारी एम डी सिंह यांच्या हस्ते, हिंगोली इथं पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

नांदेड इथं पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. खोतकर यांनी यावेळी स्वातंत्र्यसेनानी आणि ज्येष्ठ नागरिकांची भेट घेऊन, मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

उस्मानाबाद इथं पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या इतिहासाचा शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करावा, असं मत रावते यांनी यावेळी व्यक्त केलं.

लातूर इथं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं, मुक्तीसंग्रामातल्या हुतात्म्यांच्या प्रेरणेतून मराठवाड्याचा विकास झाल्याचं मत निलंगेकर यांनी व्यक्त केलं. निलंगेकर यांच्या हस्ते लोकराज्य मासिकाच्या ‘आपले जिल्हे विकासाची केंद्रे’ या विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं.

परभणी इथं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यानंतर जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेऊन, पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून कृषीपंपासाठी १२ तासांचा थ्री फेज वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले. कमी पर्जन्यमान असलेल्या चाटोरी आणि बनवस गावांमध्ये अखंडीत वीज पुरवठा उपलब्ध करुन दयावा, असे निर्देशही पाटील यांनी यावेळी दिले.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे संकेत दिले आहेत. औरंगाबाद इथं काल सौर ऊर्जा दालनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यात लवकरच मंत्रिमंडळाची बैठक घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. औरंगाबाद शहरातल्या वेदांत नगर आणि पुंडलिक नगर या दोन नवीन पोलिस ठाण्यांचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं. यावेळी ड्रोन कॅमेरा, ऑपरेशन ऑलआऊट आदींबाबत सादरीकरण करण्यात आलं.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं कोरिया खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात सिंधूनं जपानच्या नोजोमी ओकुहराचा २२-१०, १९-२१, २१-१८ असा पराभव केला.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू झालेल्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत काल चेन्नई इथं झालेला पहिला सामना भारतानं २६ धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करत भारतानं २८१ धावा केल्या, मात्र पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यानं, ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस नियमानुसार २१ षटकांत १६४ धावांचं आव्हान देण्यात आलं. मात्र ऑस्ट्रेलियाला निर्धारित षटकात ९ बाद १३७ धावाच करता आल्या.

****

विभागात काल विविध चार घटनांमध्ये पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्याच्या परंडा तालुक्यात अनाळा इथं एका १५ वर्षीय मुलीचा ओढ्यात बुडून तर ३६ वर्षीय गुराख्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. तुळजापूर तालुक्यात केशेगाव इथं आठवर्षीय मुलगा विहिरीत पडून मरण पावला. बीड जिल्ह्यातल्या नागापूर खुर्द इथं शेततळ्यात बुडून एका १० वर्षीय आणि १३ वर्षीय बहीण भावाचा मृत्यू झाला.

****

मराठवाड्यात कालही अनेक ठिकाणी पाऊस झाला. नांदेड तसंच परभणी इथं पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जालना शहर परिसरात मध्यरात्री जोरदार पाऊस झाला, पहाटेपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. औरंगाबाद शहर परिसरातही काल रात्री सुमारे दीड तास जोरदार पाऊस झाला.

****

शेतकरी कर्जमाफीची रक्कम १५ ऑक्टोबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, असा विश्वास, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे. काल जालना इथं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत उभारण्यात आलेल्या माजी खासदार अंकुशराव टोपे यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. सहकार आणि शिक्षण क्षेत्रात टोपे यांनी केलेलं कार्य भावी पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचं पवार यावेळी म्हणाले.

****

हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ सोशियो इकॉनॉमिक रिसर्च अॅंड नॅशनल इंटिग्रेशन संस्थेच्या वतीनं 'मराठवाडा विकास' या विषयावर काल चर्चासत्र  घेण्यात आलं. मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी शिक्षण, सिंचन, दळणवळण, औद्योगिक क्षेत्र, आणि शेतीपूरक उद्योगांची उभारणी आवश्यक असल्याचं मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केलं.

****

मुक्तीसंग्राम दिनानिमित्तानं औरंगाबाद इथं काल, अनादि मी, अनंत मी या नृत्य,नाट्य आणि संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या रचनांवर आधारित या कार्यक्रमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

****

शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेतीपूरक जोडधंदा करण्याची गरज परभणीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे. परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग यांच्या वतीनं आयोजित शेतकरी मेळाव्याचं उद्धाटन करतांना ते बोलत होते. शेतकऱ्यांनी गटशेतीच्या माध्यमातून आर्थिक विकास साधावा, असं त्यांनी पुढं नमूद केलं. या मेळाव्याला शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस काल उस्मानाबाद इथं विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी गतिमंद मुलांना स्वच्छता पेटी आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं.

****

नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीनं स्वच्छता ही सेवा या अभियानाअंतर्गत नांदेड जिल्हा स्वच्छ आणि उघड्यावर शौचापासून मुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला. जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी काल सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयाचा परिसर, रेल्वे स्टेशन, बसस्थानक या भागात स्वच्छता मोहीम राबवली.

****

औरंगाबाद इथं आज भारतीय टपाल विभागातर्फे आयोजित अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेला प्रारंभ होत आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण-साई केंद्रात आयोजित या स्पर्धेचं उद्धाटन केसरी काका पवार यांच्या हस्ते होणार आहे. डाक कुस्ती केसरीची यातून निवड होईल. नऊ राज्यातले ६८ मल्लं यात सहभागी होत आहेत.

****

 

No comments:

Post a Comment