Wednesday, 6 September 2017

Text-AIR News Bulletin HLB, Aurangabad 06.09.2017 11.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

०६ सप्टेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

****

बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथं धुळे सोलापूर महामार्गवर ट्रक आणि इंडिका कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

****

बारा दिवस भक्तीभावानं पूजन केलेल्या गणपतीला काल ढोल ताशांच्या गजरात निरोप देण्यात आला. राज्यभरात गणेश विसर्जन सोहळा काल मोठ्या उत्साहात साजरा झाला. मुंबई आणि पुण्यामधले मोठे गणपती आज सकाळी विसर्जित झाले. पुण्यातल्या दगडुशेठ हलवाई गणपतीचं तसंच मुंबईतल्या प्रसिद्ध लालबागच्या राजाचं विसर्जन आज सकाळी नऊ वाजता झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

देशातल्या आघाडीच्या पत्रकारांपैकी एक असलेल्या कर्नाटकच्या पत्रकार गौरी लंकेश यांची बंगळुरूमधल्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ५५ वर्षीय गौरी लंकेश या साप्ताहिक लंकेश पत्रिकाच्या संपादक होत्या. त्यांनी उजव्या विचारसरणीच्या प्रवृत्तीवर सातत्यानं टीका केली होती. या हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाले असून, पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. 

****

केंद्र शासनाच्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या वतीनं आयोजित, स्वच्छाथॉन या देश पातळीवरील स्पर्धेत, नांदेड जिल्हा परिषदेची पहिल्या फेरीत दिल्ली इथं सादरीकरणासाठी निवड करण्यात आली आहे. याबद्दल राज्य शासनाच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे अप्पर मुख्य सचिव, श्यामलाल गोयल यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अशोक शिनगारे यांचा औरंगाबाद इथं सत्कार केला.

****

सर्वसामान्यांच्या जीवनात कायापालट घडवून आणण्यासाठी काम करा, असा संदेश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय प्रशासन सेवा - आय ए एस मध्ये निवड झालेल्या नवीन अधिकाऱ्यांना दिला. २०१६ च्या तुकडीतून महाराष्ट्र केडरमध्ये निवड झालेल्या आय ए एस अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते काल मुंबईत बोलत होते.

****

राष्ट्र उभारणीत शिक्षणाचं स्थान सर्वाधिक महत्त्वाचं असून, देशाची भावी पिढी घडवण्याचं श्रेय शिक्षकांना द्यायला हवं, असं प्रतिपादन, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. काल शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्लीत उपराष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

****




No comments:

Post a Comment