Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 OCT. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ ऑक्टोबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
छत्रपती शिवाजी
महाराज कृषी सन्मान योजनेमध्ये आज सुमारे दहा लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची
रक्कम जमा केल्याबद्दल, वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी राज्यसरकारचे
आभार मानले आहेत. दिवाळीनंतर महिनाभरात सर्वच पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यावर कर्जमाफीची
रक्कम जमा करण्याच्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेचं तिवारी यांनी स्वागत
केलं आहे. नोव्हेंबरअखेर ही प्रक्रिया पूर्ण होईल, असं तिवारी यांनी म्हटलं आहे.
****
यावर्षीच्या जुलै महिन्यात अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी
हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या, महाराष्ट्रातल्या
पालघर जिल्ह्यातल्या दोन व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रूपयांचे धनादेश
पालकमंत्री विष्णु सावरा यांच्या हस्ते देण्यात आले. या हल्ल्यात जखमी झालेल्या सात
व्यक्तींनाही प्रत्येकी पंचाहत्तर हजार रूपयांचे धनादेश देण्यात आले.
****
पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं
उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात दहा भारतीय नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. जम्मू
काश्मीरच्या पूंच्छ आणि राजौरी जिल्ह्यात पाकिस्ताननं आज सकाळपासून गोळीबार आणि उखळी
तोफांचा मारा सुरू केला आहे. भारतीय सैन्य या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहे.
****
श्रीलंकेतल्या हिंदू
तमिळ नागरिकांनी दिवाळी साजरी करण्यास सुरुवात केली असून श्रीलंकेचे राष्ट्रपती मैथ्रीपाला
सिरिसेना आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या
आहेत.
****
ऐन दिवाळीत संपावर
गेलेल्या राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर परतावं, असं आवाहन राज्य सरकारनं केलं
आहे. कर्मचारी कामावर परतले नाहीत तर त्यांना निलंबित करण्यात येईल आणि त्यांच्या जागी
हंगामी कर्मचारी नेमण्यात येतील, असा इशारा एसटी महामंडळ प्रशासनानं दिला आहे.
आज संपाचा दुसरा
दिवस असून ऐन दिवाळीचे दिवस असल्यानं प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर अडचण होत आहे. यापूर्वी
एसटी कर्मचाऱ्यांनी १९७२ मध्ये ,१९९६ मध्ये आणि २००७ मध्ये संप केले होते. सातवा वेतन
आयोग लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी हे कर्मचारी संपावर गेले असून निधीअभावी ही
मागणी पूर्ण करणं शक्य नसल्याचं परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या
प्रसिध्द अष्टंबा यात्रेला कालपासून सुरुवात झाली. महाभारताशी निगडीत अश्वत्थामाचं
स्थान असलेल्या या देवस्थानाला दरवर्षी दिवाळीत महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्यप्रदेशातले
हजारो भाविक भेट देतात.
****
नाशिक जिल्ह्यात
येत्या तेवीस ते एकोणतीस तारखेदरम्यान कीटकनाशकांच्या वापराबाबत सुरक्षा सप्ताह आयोजित
करण्यात येणार आहे. कीटकनाशकांची फवारणी प्रतिबंधात्मक उपाययोजना हा सप्ताह साजरा करण्याचे
आदेश महसूल उपायुक्त रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत.
****
वीज ग्राहकांकडून
२० जानेवारी २००५ ते ३० एप्रिल २००७ या कालावधीत सेवा जोडणी आकार आणि मीटर आकारापोटी
घेतलेली रक्कम वीज ग्राहकांना परत करण्याची प्रक्रिया महावितरणनं सुरु केली आहे. महाराष्ट्र
विद्युत नियामक आयोगानं ही रक्कम ग्राहकांना व्याजासह परत करण्याचे आदेश जारी केले
आहेत.
****
ठाणे इथला तहसीलदार
किसन भदाणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दहा लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक
केली. जमीन अकृषक दाखवून त्यापोटी कर भरण्याचे आदेश काढण्यासाठी भदाणे यानं लाच मागितली
होती, वाहन चालक राम उगले याच्यामार्फत ही लाच स्वीकारताना त्याला अटक करण्यात आली.
****
वस्तू
आणि सेवा कराचा वात्पुरता प्रतिकूल परिणाम आता संपला असून, ऑगस्ट
महिन्यात उत्पादन क्षेत्रात तीन पूर्णांक एक टक्के, इतकी वाढ नोंदली गेली असल्याची
माहिती आर्थिक व्यवहार सचिव एस.सी गर्ग यांनी दिली आहे. दोन महिन्यांच्या खालावलेल्या
दरानंतर ही वाढ नोंदली
गेल्याचं गर्ग यांनी म्हटलं आहे.
****
अमेरिकन लेखक जॉर्ज
सॉंडर्स यांना यावर्षीचा मॅन बुकर पुरस्कार घोषित झाला आहे.’ लिंकन इन द बारडो’ या
कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. मानाचा बुकर पुरस्कार मिळवणारे ते दुसरे
अमेरिकन लेखक आहेत.
****
ओडेन्स इथे खेळल्या
जाणा-या डेन्मार्क खुल्या सुपरसीरिज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या पी.व्ही.
सिंधू, सायना नेहवाल आणि किदंबी श्रीकांत यांच्यासह चौदा खेळाडूंचे पहिल्या फेरीचे
सामने होणार आहेत. द्वितीय मानांकित सिंधूचा सामना चीनच्या चेन युफेयीशी, तर सायनाचा
सामना स्पेनच्या कॅरोलिना मारीनशी होणार आहे.
****
बांगलादेशात ढाका इथे खेळल्या जात असलेल्या एशिया चषक पुरुष
हॉकी स्पर्धेच्या सुपर फोर फेरीतल्या पहिल्या सामन्यात आज भारताचा सामना
दक्षिण कोरियाशी होणारी आहे. या
फेरीतला भारताचा पुढचा सामना उद्या मलेशियाशी तर शनिवारी पाकिस्तानशी होणार आहे. अंतिम
फेरीत पोहचणाऱ्या दोन संघांचा
सामना येत्या रविवारी होणार आहे.
****
No comments:
Post a Comment