Tuesday, 3 October 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 03.10.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 OCT. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ ऑक्टोबर २०१७ सकाळी .५० मि.

****

** इतर मागासवर्गीय संवर्गात, उपश्रेणी बनवण्यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी न्यायमूर्ती जी रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन

** मूग आणि उडीद  हमीभावानं खरेदीसाठी आजपासून राज्यात ८३ नोंदणी केंद्र सुरू होणार

** केंद्र सरकारच्या विविध धोरणांच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इशारा

आणि

** राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरात त्यांना अभिवादन

****

इतर मागासवर्गीय संवर्गात, उपश्रेणी बनवण्यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी न्यायमूर्ती जी रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली, राष्ट्र्पती रामनाथ कोविंद यांनी एक आयोग स्थापन केला आहे. येत्या १२ आठवड्याच्या आत हा आयोग आपला अहवाल राष्ट्रपतींना सादर करेल. अन्य मागासवर्गीय संवर्गात, उपश्रेणी तयार करण्यासाठी वैज्ञानिक आधार घेऊन हा आयोग निकष निश्चित करेल. याशिवाय आयोग मागसवर्गीयांच्या यादीप्रमाणे जाती, समुदाय आणि उपजाती यांची ओळख पटवण्यासाठी आवश्यक प्रक्रियेचा अवलंब करेल आणि त्यानुसार उपश्रेणीचं विभाजन करेल. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर केंद्र सरकार इतर मागासवर्गीयांमधल्या अति मागासलेल्या घटकांनादेखील केंद्र सरकारच्या संस्था तसंच शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळण्यासाठीची प्रक्रिया निश्चित करेल.

****

जनतेनं एकत्र काम केल्यास कोणतंही स्वप्न पूर्ण होऊ शकतं, असं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल नवी दिल्लीत गांधी जंयतीनिमित्त स्वच्छ भारत दिवस, स्वच्छ भारत अभियानाचा तिसरा वर्धापन दिन, तसंच, ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाचा समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत विविध पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं. यामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल, महाराष्ट्राला ‘स्वच्छता ही सेवा’ या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

****

राज्य परिवहन मंडळाच्या सर्व आगारात काल गाडगेबाबा स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. येत्या डिसेंबर अखेर हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यावर महाराष्ट्रातली प्रत्येक बस आणि बसस्थानक स्वच्छ आणि टापटीप झालेलं दिसेल, असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या अभियानाचा शुभारंभ करताना सांगितलं.

****

वर्धा जिल्ह्यातल्या सिंदी रेल्वे ड्रायपोर्ट आणि सेवाग्राम विकास आराखड्याच्या कामांचं ई-भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल करण्यात आलं. यावेळी बोलताना फडणवीस यांनी राज्यातल्या वर्धा आणि जालना इथल्या ड्रायपोर्टमुळे या भागाच्या विकासाला गती मिळणार असल्याचं सांगितलं.

रस्ते जोडणी आणि ड्रायपोर्ट मुळे शेतमालासह इतरही उत्पादन विदेशात पाठवण्याची संधी निर्माण झाली आहे. याचा या परिसरातील नागरीकांनी फायदा घ्यावा, असं आवाहन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं.

दरम्यान, वर्धा इथं सेवाग्राम आश्रमात गांधी जंयती निमित्त आयोजित एका कार्यक्रमातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सहभाग घेतला. आश्रमातल्या बापू कुटीतल्या सामुदायिक प्रार्थनेतही  ते सहभागी झाले. तसंच, चरख्यावर सुत कातून त्यांनी महात्मा गांधीजींना अभिवादन केलं. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते.

****

हमीभावानं मूग आणि उडीद खरेदीसाठी आजपासून राज्यात ८३ नोंदणी केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. या केंद्रांवर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची आधी नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर खरेदीची प्रक्रिया सुरु केली जाईल.. नोंदणीनंतर शेतकऱ्यांनी मूग आणि उडीद विक्रीसाठी कधी आणायचा या संदर्भातला संदेश पाठवण्यात येणार आहे.

****

केंद्र सरकारच्या विविध धोरणांच्या विरोधात राज्यभर आंदोलनाचा इशारा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नाशिक इथं बोलताना दिला. किसान मंचच्या वतीनं नाशिक इथं आयोजित अधिवेशनात काल ते बोलत होते. सरकारच्या धोरणांचा शेतकरी आणि कष्टकऱ्यांना फटका बसला असून, आता राज्यकर्त्यांना जाब विचारायची वेळ आली आहे. यामुळे सरकारला ठराविक मुदत देऊन नंतर राज्यभर आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. २०१७ पर्यंतच्या सर्व थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासह ९ ठराव या अधिवेशनात संमत करण्यात आले.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त काल देशभरात त्यांना अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत गांधीजी आणि शास्त्रीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. विधानभवनात विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

मराठवाड्यातही सर्वत्र गांधीजी आणि शास्त्रीजींना अभिवादन करण्यात आलं. औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जालना इथं जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, नांदेड इथं जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी, गांधीजी तसंच शास्त्रीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.

****

स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत काल जालना इथं महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं. यानिमित्त काढण्यात आलेल्या जनजागृती फेरीला पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, खासदार रावसाहेव दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी विद्यार्थीनी, सामाजिक संस्था, नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी या रॅलीत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. 

****

नांदेड जिल्ह्यातल्या लोहा आणि भोकर तालुक्यात तर परभणी, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागात काल पाऊस झाला. लोहामधल्या शंभरगाव शिवारात सोयाबीन कापणी करणाऱ्या एका शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यु झाला. भोकर तालुक्यातल्या आमदरी इथं हायब्रिड पिकाची खुडणी करत असताना एक महिला वीज अंगावर पडून मरण पावली. परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातही राजेगाव इथं अंगावर वीज पडून एक शेतकऱ्याचा मृत्यु झाला.

****

लातूर महापालिकेत जन-आधार संस्थेच्या वतीनं शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी शाश्वत घनकचरा व्यवस्थापन उपक्रमाचा शुभारंभ काल करण्यात आला. त्याचबरोबर जन आधार घंटागाडीचं उद्घाटन, खासदार डॉ.सुनिल गायकवाड आणि महापौर सुरेश पवार यांनी यावेळी केलं. घंटागाडीवरील कामगारासाठी सुरक्षा साधनं, पोशाख तसंच साहित्याचं वाटप जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांच्या हस्ते काल करण्यात आलं.

****

उस्मानाबाद इथल्या धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष, तसंच, श्रीराम मंदिर संस्था समर्थनगर चे विश्वस्त म्हणून कार्यरत असलेले, रामकृष्ण देशपांडे यांचं काल सोलापूर इथं हृदयविकारामुळे निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. काल उस्मानाबाद इथं त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात स्वच्छता गृह असलेल्या घरांची संख्या, ८८ टक्क्यांवर पोहोचली असल्याचं, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी काल सांगितलं. उस्मानाबाद इथं स्वच्छता ही सेवा अभियान आणि मिशन ९० दिवस अभियानाच्या समारोपप्रसंगी काल ते बोलत होते. जिल्ह्यात शौचालय असलेल्या घरांची संख्या, १०० टक्के होण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी अधिक जोमानं काम करावं, असं आवाहन रायते यांनी यावेळी केलं

****

महागाई, वस्तू आणि सेवा कर, नोटबंदीच्या विरोधात, तसंच शेतकरी कर्जमुक्तीच्या मागणीसाठी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं काल औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौकात चूल पेटवून निदर्शनं करण्यात आली. खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली, महिला संपर्कप्रमुख प्राध्यापक मनिषा कायंदे  यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शनं करण्यात आली. त्यानंतर शिष्टमंडळानं, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेतली. तसंच, अप्पर जिल्हाधिकारी, विजय सोरमारे यांना निवेदन देऊन समस्या सांगितल्या.

****

औरंगाबाद इथं विविध नागरी समस्यांच्या निषेधार्थ, गब्बर अॅक्शन कमिटीची स्थापना करण्यात आली. काल या समितीनं महापालिका प्रवेशद्वाराजवळच्या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमध्ये फुलं टाकून, प्रशासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त करत आंदोलनाला सुरूवात केली. शहरातले रस्ते त्वरित दुरुस्त करावे, अशी मागणी या ॲक्शन कमिटीचे कार्याध्यक्ष इम्रान पठाण यांनी केली. 

****

तेली समाजानं तेल गाळपाच्या पारंपारिक व्यवसायाला उद्योगाचं स्वरूप देणं गरजेचं असल्याचं मत, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं आयोजित तेली समाज जागृती मेळावा, आणि राज्यस्तरीय गुणवंत मेळ्याव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. आजचं युग हे स्पर्धेचं युग असल्यामुळे समाजातल्या मुलांनी गुणवत्तेचं शिक्षण घ्यावं, असं ते म्हणाले.

****

भारत ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. यसंघात आशिष नेहरा, शिखर धवनला स्थान देण्यात आलं, तर रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजाला विश्रांती देण्याचा निर्णय निवड समितीनं घेतला आहे.

****


No comments:

Post a Comment