▼

Wednesday, 18 October 2017

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 18.10.2017 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 October 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ ऑक्टोबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कामावर रुजू व्हावं किंवा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं, असा इशारा एसटी महामंडळाने दिल्यानंतरही कर्मचारी संघटनांनी  संपावर ठाम राहण्याचा निर्धार केला आहे. कामगार न्यायालयानं संपावर जाण्यास प्रतिबंध केला असल्याचं महामंडळानं सगळ्या कर्मचाऱ्यांना वारंवार सूचित केलं आहे. महाराष्ट्र शासनानं राज्य परिवहन मंडळाला लोकोपयोगी सेवा म्हणून घोषित केलं आहे. त्यामुळे संप केल्यास कर्मचाऱ्यांना तुरुंगवास किंवा दंड अशी शिक्षा होऊ शकते.

दरम्यान, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज मंडळाच्या कर्मचारी संघटनेच्या नेत्यांसोबत बैठक घेऊन, संघटनांच्या मागण्यांबाबत चर्चा केली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांसाठी महामंडळानं आगारातून खासगी बसची सुविधा उपलब्ध केली होती.

या संपादरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात अकोले आगारातले वाहक एकनाथ वाकचौरे यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

निकषांमध्ये बसणारा शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना सुरू राहील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्रांचं वाटप करताना बोलत होते. कर्जमाफीसाठीच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेवर टीका झाली, मात्र योजनेचा लाभ खऱ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात कर्जमुक्तीची प्रमाणपत्रं घेतलेल्या शेतकऱ्यांमध्ये औरंगाबाद विभागातले रावसाहेब सांगळे, सर्जेराव खरात, अशोक डिडोरे, आणि जमनाबाई सिसोदे, तर लातूर विभागातले शंकर सावंत, देविदास इंगळे, जयदत्त खोटे,वत्सला माने, मोहन पाटील, शंकर चाटे यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधत, कर्जमुक्ती योजना आणि शेतकऱ्यांच्या प्रगती विषयीच्या धोरणांची माहिती दिली. या सोहळ्याचं दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात थेट प्रक्षेपण करण्यात आलं.

परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आणि अधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले. परभणी जिल्हयातल्या, कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकरी कुटुंबांना यावेळी कर्जमुक्ती प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं.

नांदेड इथं जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते जिल्ह्यातल्या पंचवीस पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रतिनिधिक प्रमाणपत्रं देण्यात आली.

लातूर इथेही पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्रं देण्यात आली.

राज्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंमलात आणून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला प्रत्यक्ष सुरुवात केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे पाटील यांनी अभिनंदन केलं आहे. अत्यंत पारदर्शी पद्धतीने ही प्रक्रिया राबवल्याबद्दल आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचं अभिनंदन करतो, असं दानवे यांनी म्हटलं आहे.

****

पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावरच्या, पाटे डेव्हलपर्सच्या ‘सेया’ या गृहप्रकल्पाच्या  अकराव्या मजल्यावरून पडून तीन कामगाराचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर या गृहप्रकल्पाचं काम थांबवण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. या इमारतीच्या आर्किटेक्ट आणि बिल्डरला नोटीस बजावुन खुलासा मागवण्यात आल्याचं नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितलं.

****

जालना जिल्ह्यातल्या सेवली पोलिस ठाण्यातले सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत बलय्या आणि पोलीस नाईक विष्णु चव्हाण, या दोघांना पंधरा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज अटक केली. तक्रारदारावर दाखल गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी आणि प्रतिपक्षावर मोठं कलम लावण्यासाठी या दोघांनी पंधरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ तारखेला आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ३७ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. नागरिकांनी येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत आपल्या सूचना  १८०० ११ ७८०० या निशुल्क क्रमांकावर किंवा माय जीओव्ही ओपन फोरमवर नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे.

****


No comments:

Post a Comment