Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 2 October 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २ ऑक्टोबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर
शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सह्याद्री
अतिथीगृह इथं त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. विधानभवनात विधानपरिषदेचे
सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन
केलं.
मराठवाड्यातही सर्वत्र गांधीजी आणि शास्त्रीजींना अभिवादन
करण्यात आलं. जालना इथं जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी, नांदेड इथं जिल्हाधिकारी
अरुण डोंगरे यांनी, धुळे इथं संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी, गांधीजी तसंच
शास्त्रीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.
****
औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी
महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन
केलं. यावेळी केलेल्या भाषणात भापकर यांनी पुढच्या दोन महिन्यात मराठवाड्यातला ग्रामीण
भाग स्वच्छ करायचा असल्याचं सांगितलं. येत्या सहा ऑक्टोबरला औरंगाबाद शहरातली सगळी
ऐतिहासिक स्थळं आणि महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात येणार असल्याचं
भापकर यांनी यावेळी सांगितलं.
****
स्वच्छ भारत अभियानाला आज तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त
देशभरात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी
दोन ऑक्टोबर २०१४ रोजी या अभियानाला प्रारंभ झाला होता. राज्य परिवहन मंडळाच्या सर्व
आगारात आज गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पाची सुरवात करण्यात आली. सोलापूर बस स्थानकावर
पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी या अभियानाचं उद्घाटन केलं.
****
लातूर इथं भारतीय स्टेट बँक क्षेत्रीय कार्यालयातर्फे
आयोजित स्वच्छता अभियानाअंतर्गत आदर्श कॉलनी परिसर स्वच्छ करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यातही
नगर परिषद आणि बँकांच्या वतीनं स्वच्छता अभियान राबविण्यात आलं
****
भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज
नागपूर वर्धा मार्गावर पांजरा पथकर नाका इथं ट्रक चालक आणि त्यांच्या सहायकांसाठी मोफत
डोळे तपासणी मोहिमेला प्रारंभ झाला. राष्ट्रीय महामार्गांवर सुरक्षित वाहतुकीकरता हा
उपक्रम राबवण्यात येत असून, ही मोहीम पाच दिवस चालणार आहे.
****
जागतिक वारसास्थळ असलेल्या सातारा जिल्ह्यातल्या कास
पठारला जाणारा येवतेश्वर घाटातला मुख्य रस्ता आज सकाळी अचानक खचला. यामुळे कासपठारकडे
जाणारी वाहतूक बंद केली असून, वाहनं अडकली आहेत. हा रस्ता बंद झाल्यानं सुमारे २० हून
अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. पहाटे घटना उघड झाल्यानंतर सुरक्षेच्या उपाययोजना राबवण्यास
सुरुवात करण्यात आली.
****
ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक ह. मो. मराठे यांच्या
निधनानं एक प्रयोगशील संपादक आणि बहुपेडी लेखक आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी मराठे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मराठे यांचं आज पहाटे पुणे
इथं दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात
आले.
****
औरंगाबाद इथं विविध नागरी समस्यांच्या निषेधार्थ आज
गब्बर अॅक्शन कमिटीची स्थापना करण्यात आली. महापालिका प्रवेशद्वाराजवळच्या रस्त्यावर
असलेल्या खड्ड्यांमध्ये फुलं टाकून, प्रशासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त करून या समितीनं
आपल्या आंदोलनाची सुरूवात केली. महानगरपालिकेनं शहरातले रस्ते त्वरीत दुरुस्त करावे,
अशी मागणी या ॲक्शन कमिटीचे कार्याध्यक्ष इम्रान पठाण यांनी केली.
****
तेली समाजानं तेल गाळपाच्या पारंपारिक व्यवसायाला उद्योगाचं
स्वरूप देणं गरजेचं असल्याचं मत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केलं.
औरंगाबाद इथं आयोजित तेली समाज जागृती मेळावा आणि राज्यस्तरीय गुणवंत मेळाव्याच्या
उद्घाटनप्रसंगी ते आज बोलत होते. आजचं युग हे स्पर्धेचं युग असल्यामुळे समाजातल्या
मुलांनी गुणवत्तेचं शिक्षण घ्यावं, असं ते म्हणाले.
****
आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन आज पाळण्यात आला.
‘भविष्यात पुढे चला’ हा यंदाचा या दिनाचा विषय आहे. यानिमित्त आज नवी दिल्ली इथं ज्येष्ठ
नागरिकांसाठी चालण्याची स्पर्धा आयोजित केली होती. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद
गहलोत यावेळी उपस्थित होते. सरकारनं ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक कल्याणकरी योजना सुरु
केल्या असल्याचं गहलोत यांनी यावेळी सांगितलं.
****
जम्मू काश्मीरमधल्या बारामुला जिल्ह्यातल्या रामपूर
सेक्टर इथं आज दुपारच्या सुमारास भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न
उधळून लावला. यावेळी झालेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. या दहशतवाद्यांकडून
शस्त्रं जप्त करण्यात आल्याची माहिती संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यानं दिली.
****
भारत ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेसाठी भारतीय
संघ जाहीर झाला आहे. या संघात आशिष नेहरा, शिखर धवनला स्थान देण्यात आलं, तर रविचंद्रन
अश्विन आणि रविंद्र जडेजाला विश्रांती देण्याचा निर्णय निवड समितीनं घेतला आहे.
****
No comments:
Post a Comment