Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 OCT. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ ऑक्टोबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
·
यवतमाळ जिल्ह्यातल्या कीटकनाशक विषबाधा मृत्यू प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन
·
मुंबई महापालिकेत मनसेच्या सात पैकी सहा नगरसेवकांचा
शिवसेनेत प्रवेश
·
दिवाळीच्या काळात भारनियमन
होणार नाही - ऊर्जामंत्र्यांची ग्वाही
·
राज्य सरकारकडून साडे चार
हजार डॉक्टरांची नोंदणी रद्द
आणि
·
समतोल विकासासाठी ‘केळकर’ समितीचा अहवाल जाहीर करण्याची
मागणी
****
यवतमाळ जिल्ह्यातल्या कीटकनाशक विषबाधा मृत्यू प्रकरणी राज्यशासनानं विशेष तपास
पथकाची स्थापना केली आहे. अमरावतीच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील ही सात
सदस्यीय समिती या प्रकरणाची चौकशी करेल.
दरम्यान, या प्रकरणी यवतमाळ जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी दत्तकुमार कळसाईत
यांना निलंबित करण्यात आलं आहे. जिल्ह्यात कीटकनाशकांची फवारणी करतांना विषबाधा झाल्यानं,
१९ शेतकऱ्यांचा मुत्यु झाला आहे.
****
कृषीविषयक औषधांची विक्री करतांना सुरक्षा
संच देणं बंधनकारक असून, ते न देणाऱ्या कंपन्या तसंच औषध विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा
दाखल करण्याचे आदेश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले आहेत. यवतमाळसारख्या घटना पुन्हा घडू नये
यासाठी कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या विविध स्तरावरील बैठका घेण्यात येत आहेत.
बंदी असलेली औषधं दुकानात आढळल्यास, कडक कारवाईचे निर्देशही खोत यांनी दिले आहेत.
****
मुंबई
महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सात पैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश
केला आहे. काल मातोश्री इथं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या सर्वांचा
पक्ष प्रवेश झाला. ही कोणतीही फोडाफोडी नसून, कार्यकर्त्यांची घरवापसी असल्याचं, ठाकरे
म्हणाले. या पक्षांतरामुळे मुंबई महापालिकेत शिवसेनेचं संख्याबळ ८८ वरून ९४ इतकं झालं
आहे. दरम्यान, नांदेड महापालिकेत मिळालेला जनादेश खुल्या दिलानं स्वीकारून काँग्रेस
पक्षाला विशेषत: पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांचं अभिनंदन करत असल्याचं,
ठाकरे म्हणाले.
****
राज्य
सरकारनं आता निवडणुकीच्या वातावरणातून बाहेर पडून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या
समस्या सोडवाव्यात, अन्यथा आंदोलनाचा
इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. त्या
काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर घाईघाईनं
लागू केल्याची टीका त्यांनी केली. राज्यात भाजप आणि शिवसेना यांची भांडणं, आता मनोरंजक
ठरत असल्याचं, त्या म्हणाल्या.
****
दिवाळीपर्यंत
कर्जमाफी करण्याचं आश्वासन सरकार पाळू शकलेलं नाही, अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते
राधाकृष्ण विखेपाटील यांनी केली आहे. काल अहमदनगर इथं सरपंच आणि ग्राम पंचायत सदस्यांच्या
सत्कार समारंभात ते बोलत होते. एक ऑक्टोबरपासून कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात
जमा करण्याची सरकारची घोषणा फोल ठरली असल्याचं, विखे पाटील म्हणाले.
****
राज्यात
वीज पुरवठ्याची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून दिवाळीच्या काळात भारनियमन होणार
नाही अशी ग्वाही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते काल नागपुरात बोलत
होते. महानिर्मिती कंपनीला दररोज २८ रॅक्स कोळशाची गरज असताना टंचाईमुळे दररोज फक्त
१४ ते १५ रॅक्स कोळसा मिळत होता. ही टंचाई दूर झाल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.
दरम्यान,
महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यातल्या ७७ हजार कर्मचाऱ्यांना
१३ हजार ५०० रुपये तसंच कंत्राटी कामगारांना साडेसात हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची
घोषणा बावनकुळे यांनी काल केली.
****
एस
टी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त अडीच हजार रुपये आणि अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये सानुग्रह
अनुदान देण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. जुलै २०१६ पासूनचा
अकरा टक्के महागाई भत्ता थकबाकीसह दिला जाणार आहे. या निर्णयाचा लाभ एक लाख चार हजार
कर्मचाऱ्यांना होणार आहे.
****
राज्य
सरकारनं चार हजार ५४८ डॉक्टरांची नोंदणी रद्द केली आहे. ग्रामीण भागात वर्षभर सेवा
पुरवणं अनिवार्य असतं. आणि तसं केलं नाही तर दंड भरणं आवश्यक आहे. हे दोन्ही नियम न
पाळणाऱ्या या डॉक्टरांवर कारवाई केल्याचं वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयानं
स्पष्ट केलं आहे. ग्रामीण भागात सेवा न देणाऱ्या एमबीबीएस डॉक्टरांना दहा लाख रुपये,
पदव्युत्तर पदवीधारक डॉक्टरांना ५० लाख रुपये तर सुपर स्पेशालिटी डॉक्टरांना दोन कोटी
रुपये दंडाची तरतूद या कायद्यात आहे.
****
महसूल कर्मचारी संघटनेनं आपला संप मागे घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी
या संदर्भात संघटनेशी काल चर्चा केली. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत या
वेळी सकारात्मक चर्चा झाल्यानं, संप स्थगित करण्यात आल्याचं संघटनेकडून जाहीर
करण्यात आलं.
****
माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती १५ ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. उद्या
१५ ऑक्टोबरला रविवार
असल्यानं राज्यभरात काल
वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
****
हे
बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राज्याच्या समतोल विकासासाठी शासनानं ‘केळकर’ समितीचा
अहवाल जाहीर करावा, अशी मागणी मराठवाडा अनुशेष निमूर्लन आणि विकास मंचचे अध्यक्ष डॉ.
संजय लाखेपाटील यांनी केली आहे. ते काल जालना इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. पश्चिम
महाराष्ट्र आणि विदर्भाच्या तुलनेत मराठवाडा प्रत्येक क्षेत्रात मागे असल्यानं, शासनाने विदर्भ-मराठवाडा आणि उर्वरीत महाराष्ट्रात
विभागनिहाय केलेल्या कामांची श्वेतपत्रिका काढावी, विकास कामांबाबत मराठवाड्याचा सर्व
क्षेत्रातला वाटा निश्चित करून देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, अशी
मागणीही लाखेपाटील यांनी
केली. येत्या सोमवारी जालना दौऱ्यावर येत असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांनी
मराठवाड्याच्या अनुशेषाबाबत चर्चा करण्यासाठी व्यापक बैठक घ्यावी, असंही
ते म्हणाले.
****
मुलींच्या जन्मदरात वाढ होण्यासाठी मराठवाड्यात बेटी बचाओ
बेटी पढाओ हे अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती अभियानाचे संयोजक प्राध्यापक
शाम सातपुते यांनी दिली. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. या अभियानाअंतर्गत
प्रत्येक जिल्ह्यात कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती सातपुते
यांनी दिली.
****
मराठवाड्यात
परतीच्या पावसानं कालही अनेक ठिकाणी हजेरी लावली. जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यात
पानेवाड़ी इथं कापूस वेचणी करणाऱ्या महिलेचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. या पावसामुळे
मका, सोयाबीन तसंच वेचणीस आलेल्या कापसाचं नुकसान झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
लातूर
जिल्ह्यात काल दुपारी निलंगा, उदगीर, शिरुर अनंतपाळ, चाकुर तालुक्यात पावसाच्या जोरदार
सरी कोसळल्या. जिल्ह्यातलं रेणा धरण ७५ टक्के भरलं आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात
पाऊस सुरु असल्याने, पाणीपातळी वाढल्यास, धरणाचे दरवाजे उघडण्याची वेळ येऊ शकते, त्यामुळे
नदी काठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी असा इशारा जलसंपदा विभागानं दिला आहे.
परभणी
शहरासह जिल्हाभरात काल पावसाने चांगली हजेरी लावली. औरंगाबाद इथंही दिवसभर ढगाळ वातावरण
होतं, दुपारच्या सुमारास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी
तालुक्यात फुटाणा या गावात वीज पडून एक युवक
ठार झाला.
उस्मानाबाद
जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या १०४ टक्के पाऊस झाला.
जिल्ह्यात उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक पाऊस तर कळंब तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला.
या पावसामुळे जिल्ह्यातल्या पाणी साठ्यात वाढ झाली मात्र सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान
झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मार्च २०१८ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक
शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावीच्या परीक्षेचे
अर्ज १६ ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीनं भरावे, असं
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं एका पक्षकाद्वारे कळलवं
आहे. सात ते १४ नोव्हेंबर पर्यंत विलंबित शुल्कासह अर्ज भरता येणार
आहेत. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एस एस सी बोर्ड डॉट महाराष्ट्र
डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर हे अर्ज भरता येणार आहेत.
****
नांदेड
जिल्ह्यात कीटकनाशक तपासणीत ८४ प्रकरणात तीन कोटी ७५ लाख रुपयांचा औषध साठा विकण्यास
बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी काल यासंदर्भात घेतलेल्या आढावा
बैठकीत ही माहिती दिली. औषधांचे ५१ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असल्याचं त्यांनी
सांगितलं. फवारणी करताना, दक्षता बाळगण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
****
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी दोषी पोलिस उपनिरीक्षकाला
उस्मानाबाद इथल्या अतिरिक्त सत्र न्यायालयानं दहा वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख पाच हजार
रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. प्रेमकुमार बनसोडे असं याचं नाव असून, गेल्या वर्षी
ऑगस्ट महिन्यात उस्मानाबाद इथं सुटीवर आला असता, त्यानं संबंधित मुलीवर अत्याचार केला
होता.
****
No comments:
Post a Comment