▼

Sunday, 15 October 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 15.10.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 OCT. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ ऑक्टोबर २०१७ सकाळी ६.५० मि.

****

** राज्यातल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतले ११४ जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी  अर्थसहाय्य करण्याची राज्यपालांची मागणी

** राष्ट्रीय आयुष अभियानाअंतर्गत देशातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ५० खाटांची रुग्णालयं उभारणार - आयुष मंत्री श्रीपाद नाईक

** काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विधिज्ञ महादेव शेलार यांची आत्महत्या

आणि

** मराठवाड्यात  सर्वत्र पाऊस

****

राज्यातल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतले प्रस्तावित ११४ जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास केंद्र शासनानं विशेष बाब म्हणून सात हजार, १८० कोटी रुपयांचं अर्थसहाय्य करावं, अशी मागणी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केली आहे. नवी दिल्ली इथं आयोजित दोन दिवसीय राज्यपाल परिषदेच्या समारोपप्रसंगी ते काल बोलत होते. राज्यातलं कृषी क्षेत्र गंभीर संकटात असल्यामुळे या प्रस्तावाकडे विशेष प्रकरण म्हणून पाहण्याची विनंती राज्यापालांनी केली आहे.

राज्यातील आदिवासी- दुर्गम भागात आरोग्य सुविधा देण्यासाठी विविध उपाययोजनाही त्यांनी आपल्या भाषणातून सूचवल्या, राज्यात नर्सिंग महाविद्यालय सुरू केल्यास मुलींना रोजगार मिळेल असंही ते म्हणाले.

****

राष्ट्रीय आयुष अभियानाअंतर्गत येत्या दहा वर्षात देशातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ५० खाटांची रुग्णालयं उभारण्यात येणार असल्याची माहिती, आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली आहे. येत्या मंगळवारी धन्वंतरी जयंतीचं औचित्य साधून साजऱ्या करण्यात येणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाबद्दल वार्ताहरांना माहिती देताना ते काल नवी दिल्ली इथं बोलत होते. आयुषसह आयुर्वेदाच्या क्षेत्रात विकास घडवणाऱ्या राज्य सरकारांच्या प्रयत्नांना सहाय्य करण्याच्या हेतुनं हे अभियान राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. या अभियानाअंतर्गत आतापर्यंत एक हजार ११७ कोटीहून अधिक रक्कम राज्यांना उपलब्ध करुन दिल्याची माहिती नाईक यांनी दिली.

****

काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विधिज्ञ महादेव शेलार यांनी काल मुंबईत राहत्या घरी आत्महत्या केली. ६४ वर्षीय शेलार यांनी मुलुंड इथल्या राहत्या घरी गळफास घेतल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. शेलार यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, शेलार यांच्या निधनानं एक संवेदनशील नेतृत्व हरपल्याची प्रतिक्रिया विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. आपण एक व्यक्तिगत मित्र गमावला अशा शब्दात विखे पाटील यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

****

जागतिक मानक दिनानिमित्त भारतीय मानक कार्यालयानं काल मुंबईत एका चर्चासत्राचं आयोजन केलं होतं. स्मार्ट शहरांसाठी मानक पध्दती असा या चर्चासत्राचा विषय होता. पश्चिम विभागाचे मुख्य अभियंता डॉ.के.एम.सोनी यांच्या हस्ते चर्चासत्राचं उद्घाटन झालं. स्मार्ट शहरांच्या विकासाकरता नवीन मानकं तयार केली असून या मानकांची केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयानं आखून दिलेल्या चौकटीत तत्परतेनं अंमलबजावणी करण्याची गरज सोनी यांनी व्यक्त केली.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या १६५ ग्रामपंचायतींसाठी उद्या १६ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचाराची मुदत काल संपली. जिल्ह्यातल्या १६५ सरपंच पदासाठी तर एक हजार ५६१ सदस्य पदांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी काल खामसवाडी, हासेगाव, मस्सा, आदी ठिकाणच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या.

****

नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या आणखी ४ शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा भूसंपादनाला चांगला प्रतिसाद मिळत असून, संपूर्ण खरेदी प्रक्रिया सुव्यवस्थितपणे होण्याच्या दृष्टीनं जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे संबंधितांना योग्य त्या सूचना देऊन वेळोवेळी मार्गदर्शन करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

****

जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंच  आणि सदस्यांचा काल जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या. हस्ते सत्कार करण्यात आला  धामणगाव, भेंडाळा, इथल्या सरपंच तसंच सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

शिवसेनेच्यावतीनंही काल  औरंगाबाद इथं जिल्ह्यातल्या पक्षाच्या नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह, आमदार संजय शिरसाट, आमदार हर्षवर्धन जाधव, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयाणी डोणगावकर उपस्थित होते. यावेळी ८८ सरपंच आणि नव्यानं  पक्षात सामिल झालेल्या आठ अपक्ष सरपंचांचा सत्कार करण्यात झाला.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

राज्यात काल अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मुंबईसह ठाणे, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग, गडचिरोली, सातारा इथं पाऊस झाल्याचं वृत्त आहे. मराठवाड्यातही काल जवळपास सर्वच जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद शहरात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. जालना शहरातही चांगला पाऊस झाला, शहराला पाणी पुरवठा होत असलेला घाणेवाडी जलाशय  पावसानं ओसंडून वाहत आहे, गेल्या पाच वर्षात प्रथमच हा तलाव भरला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेड जिल्ह्यात काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. देगलूर तालुक्यातल्या वन्नाळी इथं अंगावर वीज कोसळून एक शाळकरी मुलगा मृत्यूमुखी पडला. कंधार तालुक्यात गोगधरी इथं दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, यावेळी गोगधरी शिवारात काम करत असलेले चौघेजण झाडाखाली आश्रयाला गेले असता, त्यांच्यावर वीज कोसळली. या चौघांपैकी एक जण जागीच ठार झाला तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. उस्मानाबाद इथं हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. भूममध्ये अनेक घरात पावसाचं पाणी शिरल्यानं रहिवाशांचे हाल झाले.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातल्या विष्णुपुरी धरणाचे दोन दरवाजे काल पुन्हा उघडण्यात आले. जायकवाडी  धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे या धरणातला जलसाठा वाढला आहे.

****

महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचं ५४ वं राज्यस्तरीय अधिवेशन आजपासून लातूर इथं होत आहे.  दुपारी तीन वाजता ग्रंथदिंडीनं अधिवेशनाला प्रारंभ होणार असून, उद्या सकाळी साडे नऊ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अधिवेशनाचं औपचारिक उद्घाटन होणार आहे. या अधिवेशनात 'ग्रंथालयांसमोरील समस्या आणि ग्रंथालय कर्मचारी वेतनश्रेणी, सेवाशर्ती' या विषयावरील परिसंवाद होणार आहे.

****

औरंगाबाद इथं ब्राऊनफिल्ड इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर स्थापन केलं जाणार आहे. मराठवाड्यातल्या सध्या कार्यरत असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील उद्योगांना तसंच नव उद्योगांना चालना देण्याच्या दृष्टीनं चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर - सीएमआयएनं हे क्लस्टर सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी केंद्र सरकारकडून ७५ टक्के, राज्य सरकारकडून १० टक्के तर स्थानिक उद्योजकांकडून १५ टक्के निधी उभारला जाणार आहे.

****

जालना औद्योगिक वसाहतीत ड्रायपोर्टच्या कामाला पुढच्या महिन्यात सुरुवात होईल. जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी ही माहिती दिली. जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत डिग्गीकर बोलत होते. यामध्ये ड्रायपोर्टसाठी रेल्वे रुळ अंथरणं, नियोजित समृद्धी महामार्गापर्यंत स्वतंत्र चौपदरी रस्ता तयार करणं, आदी कामांचा समावेश आहे.

****

चलनातून बाद झालेल्या ५०० रुपयांच्या नोटा बाळगणाऱ्या एका व्यक्तीला काल औरंगाबादनजिक वाळूज पोलिसांनी अटक केली. इम्तियाज खान असं त्याचं नाव असून तो जालना इथला रहिवासी आहे, त्याच्याजवळून पाचशे रुपयांच्या बाद झालेल्या ९९२ नोटा मिळाल्या. या नोटांचं तत्कालीन मूल्य चार लाख ९२ हजार रुपये आहे. जुन्या नोटा बाळगण्याविरूद्धच्या नव्या कायद्यानुसार आरोपीविरुध्द अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या तालखेड इथल्या माजी सरपंच अश्विनी प्रशांत मोरे यांनी आपल्या कार्यकाळात चार लाख, ३१ हजार रूपयांचा अपहार केल्याचं सिद्ध झाल्यानं त्यांचं ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. अपर विभागीय आयुक्तांनी सदस्यत्त्व रद्द करण्याचे आदेश जारी केले. मोरे यांच्याकडून ही रक्कम वसूल करण्यासही सांगण्यात आलं आहे.

****

औरंगाबादच्या बेगमपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वसीम हाश्मी यांना लाच घेतल्याप्रकरणी काल निलंबित करण्यात आलं. १२ ऑक्टोबरला त्यांना लाच घेतांना पकडण्यात आलं होतं.

****

No comments:

Post a Comment