▼

Tuesday, 17 October 2017

Text-AIR News Bulletin HLB, Aurangabad 17.10.2017 11.00




आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

१७ ऑक्टोबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

****

धनत्रयोदशी आज देशभरात साजरी होत आहे. आजच्या दिवशी प्रामुख्यानं सुवर्णालंकार आणि धातूची भांडी खरेदी केली जातात, तसंच धन्वतंरी जयंती आज साजरी करण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या निमित्तानं दिवाळी पहाटसारख्या सांगितिक कार्यक्रमांचं ठिकठिकाणी आयोजन केलं जातं. औरंगाबाद इथं आज अभ्युदय प्रतिष्ठानच्या वतीनं शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आणि महेश काळे यांची जुगलबंदी आयोजित करण्यात आली होती. रसिकांचा या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.

****

आजच्या राष्ट्रीय आयुर्वेद दिनाचं औचित्य साधून नवी दिल्लीत उभारण्यात आलेल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या इमारतीचं उदघाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या धर्तीवर देशात प्रथमच शिखर संस्था कार्यान्वित करण्यात आली असून, त्याद्वारे आयुर्वेदाचं परंपरागत ज्ञान आणि अद्ययावत चिकित्सा तंत्रज्ञान आणि उपकरणांचा सुयोग्य मेळ घालणं शक्य होईल.

****

राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपाला मध्यरात्रीपासून प्रारंभ झाला. वेतनवाढ आणि अन्य मागण्यांसाठी हे कर्मचारी संपावर गेले आहेत. यामुळे एसटी सेवा ठप्प असून, प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान, या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं खाजगी वाहतूकदारांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे.

****

राज्यातल्या १८ जिल्ह्यातल्या तीन हजार ६६६ ग्राम पंचायतींसाठी काल झालेल्या मतदानाची आज मोजणी होत आहे. काल या सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरी ८१ टक्के मतदान झालं. उस्मानाबाद जिल्ह्यातही १६१ ग्रामपंचायतीसाठी सरासरी ८० टक्के मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दुपारपर्यंत काही ठिकाणचे निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

****

केंद्र, राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ वेळेत लाभार्थ्यांना देऊन, जनतेच्या हिताला प्राधान्य देण्यात यावं, लोकप्रतिनिधींना सहकार्य करून समन्वयातून जनतेचा विकास साधण्यात यावा,  अशा सूचना, औरंगाबाद जिल्हा विकास आणि  संनियंत्रण  समितीचे अध्यक्ष, आणि  खासदार चंद्रकांत खैरे यांनी  केल्या आहेत. ते काल  जिल्हा विकास समन्वय, आणि  संनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत  बोलत होते.

****

No comments:

Post a Comment