Sunday, 5 November 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 05.11.2017 05.25PM

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 November 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ नोव्हेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
भारतानं महिला आशिया हॉकी चषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात भारताचं चीनचा पेनल्टी शूट आऊटमध्ये पाच चार असा पराभव केला. या विजयामुळे भारतीय संघ पुढच्या वर्षी होणाऱ्या हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
****
सौर ऊर्जा निर्मिती आणि वापरात महाराष्ट्रानं आघाडीवर राहावं, त्यासाठी राज्य शासनानं अधिकची आर्थिक तरतूद करावी, असं राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी म्हटलं आहे. पुण्यात, राजभवन परिसरात, एक मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. सौर ऊर्जा निर्मितीच्या यंत्रसामग्रीत सातत्याने संशोधन होऊन त्याचे दर कमी होण्याची तसंच सौर ऊर्जा क्षेत्राचा विकास होण्यासाठी पूरक धोरण आखून त्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचं, राज्यपाल म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलेल्या भाषणात, राज्यातल्या तीनही राजभवनात सौर ऊर्जा प्रकल्प उभारल्याचं सांगितलं. वीजनिर्मितीबरोबरच वीज बचतीचं धोरण ही राज्यशासनानं आखलं असून, एलईडी बल्ब आणि ऊर्जा कार्यक्षम उपकरणांचा वापर करण्यावर भर दिला जात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. ते आज नागपूर इथं आयोजित धनगर आरक्षण निर्णायक मेळाव्यात बोलत होते. धनगर समाजाला आरक्षण देण्यास शासन कटीबद्ध असून, याबाबत टाटा समाज विज्ञान संस्थेचा अहवाल लवकरच प्राप्त होईल, त्या आधारे केंद्र सरकारकडे आरक्षणाची शिफारस करणार असल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले.
****
राज्य शासनाचे संगीत - नाट्य जीवनगौरव पुरस्कार आज जाहीर झाले. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांना तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे यांना जाहीर झाला. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. पाच लाख रूपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या दोन्ही पुरस्कारांचं स्वरुप आहे. येत्या २० तारखेला मुंबईत बोरीवली इथं प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.
****
परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्य शासनाचा आंतरविद्यापीठ युवक महोत्सव इंद्रधनुष्य २०१७ ला आजपासून प्रारंभ झाला. कुलगुरू डॉ बी व्यंकटेश्वरलू यांच्या अध्यक्षतेखाली, आमदार राहुल पाटील यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. मोबाईल युगात संवाद संपला असल्यानं, कला संस्कृतीची जोपासना करणं, आवश्यक असल्याचं कुलगुरू म्हणाले. आमदार पाटील यांनी, या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळून, त्यातून चांगले कलाकार पुढे येतील, असा विश्वास व्यक्त केला.
****
आजच्या युगात महात्मा गांधीजींचे विचार आत्मसात करणं महत्वाचं असल्याचं प्रतिपादन गांधीजींचे पणतु तुषार गांधी यांनी केलं आहे. आज लातूर इथं विद्यार्थी सहाय्यक मंडळाचं उद्घाटन केल्यानंतर एकविसाव्या शतकाची आव्हाने आणि गांधी विचार या विषयावर ते बोलत होते. प्रश्न विचारण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि तो वापरलाच पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं.
****
जालना जिल्ह्यात आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पाच शासकीय खरेदी केंद्रास मान्यता मिळाली असून, या केंद्रांवर आधारभूत किंमतीत सोयाबीन खरेदी तातडीनं सुरु करावी, असे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत. शासकीय खरेदी केंद्राची स्थिती आणि सोयाबीन अनुदानासंबंधी घेतलेल्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. सोयाबीनचं उत्पादन मोठ्या प्रमाणात अपेक्षित असल्यानं वाढीव शासकीय खरेदी केंद्रांसाठी नियोजन करावं, तसंच या योजनेचा कोणी गैरफायदा घेऊ नये यासाठीही दक्षता घेण्यात यावी, असंही लोणीकर यांनी यावेळी सांगितलं.
****
सरकारनं दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळापासून निष्क्रीय असलेल्या सव्वा दोन लाख कंपन्यांची नोंदणी रद्द केली आहे. या कंपन्यांच्या बँक खात्यांवरच्या व्यवहारांवरही बंदी आणली आहे. कंपनी कामकाज व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. विमुद्रीकरणानंतर ३५ हजार कंपन्यांच्या ५८ हजार बँक खात्यातून १७ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढल्याचं निदर्शनास आल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.
****
पुणे-सोलापूर महामार्गावर आज पहाटे झालेल्या अपघातात एका ऊसतोड मजुराचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. हे सर्वजण बीड जिल्ह्यातले रहिवासी आहेत. ऊस तोडणी मजुरांच्या बैलगाडीस टँकरने धडक दिल्यानं झालेल्या या अपघातात तीन बैलही दगावल्याचं वृत्त आहे.
****

No comments:

Post a Comment