आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
०६ नोव्हेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडुच्या दौऱ्यावर असून, आज सकाळी मुख्यमंत्री ई पलानीसामी यांनी त्यांचं चेन्नई विमानतळावर स्वागत केलं. तामिळनाडूत उद्भवलेल्या पूर परिस्थितीबद्दल पंतप्रधानांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. दैनिक थंथी वृत्तपत्राच्या ७५व्या वर्धापनदिनाचा समारंभ पंतप्रधानांच्या उपस्थितीत सध्या सुरू आहे. या समारंभानंतर पंतप्रधान द्रमुक पक्षाचे अध्यक्ष करुणानिधी यांची भेट घेणार आहेत.
****
रायगड जिल्हयातल्या कर्जत इथं आजपासून राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होत आहे. वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी, शेतकरी कर्जमाफी, कृषीक्षेत्रा पुढची आव्हानं तसंच युवक आणि महिला सक्षमीकरणासह अन्य महत्वाच्या मुद्यांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं पक्षाच्या प्रसिध्दीपत्रकात म्हटलं आहे.
****
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे येत्या बुधवारी नोटबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त श्वेत धन दिवस साजरा केला जाणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल नागपूर इथं ही माहिती दिली. नोटबंदीच्या माध्यमातून काळ्या पैशावर टाच आणण्यासाठी घेतलेल्या निर्णयास धन्यवाद देण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, पुढील महिन्यात होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणूकीत आपला पक्ष भारतीय जनता पक्षाला समर्थन देत असल्याचं आठवले यांनी सांगितलं.
****
पॅरामेडिकल कौन्सिलच्या माध्यमातून राज्यातल्या ग्रामीण तसंच सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी आणि आरोग्यासंबंधीच्या सर्व वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक तपासण्या सहज उपलब्ध करुन द्याव्यात, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नागपूर इथं आयोजित वेद कॉन २०१७ या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यात लखमापूर इथलं आरोग्य उपकेंद्र आणि कर्मचारी निवासस्थानाच्या बांधकामाचं लोकार्पण खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते काल करण्यात आलं. या आरोग्यकेंद्रामुळे लखमापूर, गणेशवाडी, अमळनेर, कायगाव, भेंडाळा यासह जवळपास १० गावांना आरोग्यसेवेचा लाभ होणार आहे.
****
No comments:
Post a Comment