Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 November 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ नोव्हेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
माध्यमांनी विश्वासार्हता राखण्यासाठी
विशेष प्रयत्न करावेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज चेन्नई इथं,
दैनिक थंथी या आघाडीच्या तमिळ वृत्तपत्राच्या ७५व्या वर्धापनदिन समारंभात ते बोलत होते.
संपादकीय स्वातंत्र्य सार्वजनिक हितासाठी वापरलं गेलं पाहिजे, असं ते म्हणाले. तामिळनाडूचे
मुख्यमंत्री ई पलानीसामी, उपमुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन,
प्रसिद्ध तमिळ अभिनेते रजनीकांत यावेळी उपस्थित होते. त्यापूर्वी, मुख्यमंत्र्याशी
झालेल्या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी, चेन्नईसह आसपासच्या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे
निर्माण झालेली स्थिती सावरण्यासाठी केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करेल, असं आश्वासन
दिलं. आपल्या एक दिवसाच्या चेन्नई दौऱ्यात, पंतप्रधान, द्रमुक पक्षाचे अध्यक्ष करुणानिधी
यांची भेट घेणार आहेत.
****
शोध पत्रकारांची आंतरराष्ट्रीय संघटना - आयसीआयजेनं प्रसिद्ध केलेल्या पॅरेडाईज
पेपर्स मध्ये १८० देशांच्या यादीत भारत १९व्या क्रमांकावर असून, त्यात एकूण ७१४ भारतीयांची
नावं आहेत. वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगन मोहन रेड्डी, उद्योजक विजय मल्ल्या, नीरा
राडिया, यांच्यासह नागरी उड्डयन राज्यमंत्री जयंत सिन्हा यांचंही या यादीत नाव आहे.
दरम्यान, या यादीत झालेला उल्लेख
हा, ओमिदयार नेटवर्क कंपनीसाठी काम करत असताना केलेल्या आर्थिक व्यवहारांच्या अनुषंगानं
झालेला असून, याचा आपल्याशी वैयक्तिक काहीही संबंध नसल्याचं सिन्हा यांनी ट्विटरच्या
माध्यमातून सांगितलं आहे. केंद्रीय मंत्री झाल्यापासून, संबंधित कंपनीशी आपला काहीही
संबंध नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
****
शिक्षण क्षेत्रातल्या महत्त्वाच्या संकल्पनांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ
मंत्रालयानं आज नवी दिल्ली इथं एक कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत डिजीटल
शिक्षण, शारिरीक शिक्षण, मुल्यशिक्षण, जीवन कौशल्य शिक्षण आणि अनुभव शिक्षण या पाच
संकल्पानांवर चर्चा होणार आहे.
****
समानतेचं उद्दीष्ट साध्य होईपर्यंत सामाजिक असमानता दूर करण्यासाठी राज्य घटनेतील
तरतुदी सुरूच ठेवाव्यात असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी
म्हटलं आहे. राजस्थानात जयपूर इथं, राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाच्या स्वर गोविंदम कार्यक्रमाच्या समारोप सत्रात ते बोलत होते. देशात
जातीयता आणि अस्पृश्यता अजूनही आढळते हे दुर्देवी असल्याचं त्यांनी नमूद केलं. असमानता
दूर व्हायलाच हवी आणि यासाठी आवश्यक उपाययोजनांचा पाठिंबाही मिळायला हवा यावर भागवत
यांनी भर दिला.
****
काँग्रेस पक्षाची जनआक्रोश यात्रा
केवळ नैराश्यातून आयोजित होत असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते मधु
चव्हाण यांनी केली आहे. ते आज कोल्हापूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. काँग्रेसनं
त्यांच्या निराशाजनक कामगिरीबद्दलच जन आक्रोश करावा, असं सांगून चव्हाण यांनी, ठराविक
माध्यमं ही भाजपच्या विरोधात असल्याचं सांगितलं.
****
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान
योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या जालना जिल्ह्यातल्या ७७ शेतकऱ्यांची पहिली
यादी ग्रामीण बँकेला प्राप्त झाली आहे. पडताळणी झाल्या नंतर कर्जमाफीचे आठ कोटी २८
लाख रुपये या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात येणार आहे. ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक
रत्नाकर केसकर यांनी ही माहिती दिली.
****
सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात
येणाऱ्या राज्य पात्रता प्रवेश परीक्षा - सेटसाठी अर्ज करण्याची मुदत दोन दिवसांनी
वाढवण्यात आली आहे. आता या परीक्षेसाठी परवा आठ नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
सेट परीक्षा येत्या २८ जानेवारीला होणार आहे.
****
ऑस्ट्रेलियात
गोल्ड कोस्ट इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या
२५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात भारताच्या अनिश भानवालानं रौप्य तर नीरज कुमारनं
कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत रायफल आणि पिस्तुल प्रकारात चार सुवर्ण पदकांसह भारतानं
एकूण १६ पदकं जिंकली आहेत. शॉटगन प्रकारात भारतानं एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकलं
आहे. रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात अंतिम फेरीत भारताचे एकूण तीन नेमबाज आहेत.
****
व्हिएतमान इथं सुरु असलेल्या आशियाई
महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताची एल सरिता देवी, सोनिया लॅथर आणि लवलीना बोर्गोहेन
उपान्त्य फेरीत पोहोचल्या आहेत. उपान्त्यपूर्व फेरीत सरितानं ६४ किलोग्रॅम वजनी गटात
उजबेकिस्तानच्या मुफ्तुनाखोनचा, सोनियानं ५७ किलोग्रॅम वजनी गटात कजाकिस्तानच्या नाजीम
इशानोचा हिचा, तर लवलीनानं ६९ किलोग्रॅम वजनी
गटात मंगोलियाच्या एर्डेनेतुआ इंखत बार हिचा पराभव केला. पाच वेळा जागतिक विजेतेपद मिळवणारी भारताची
मेरी कोम याआधीच या स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत पोहोचली असून, उपान्त्य फेरीत तिचा
सामना उद्या जपानच्या शुबाशा कोमुरा विरुद्ध होणार आहे.
*******
No comments:
Post a Comment