Tuesday, 7 November 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 07.11.2017 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 07 November 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ नोव्हेंबर २०१७ सकाळी .५० मि.

****

·    पॅराडाईज पेपर्स प्रकरणाचा तपास करण्याचे केंद्र सरकारचे आदेश

·    आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस,  समविचारी पक्षांशी युती करणार

·    राज्य उर्दू अकादमीचे २०१५ आणि २०१६ वर्षासाठीचे पुरस्कार जाहीर

·     राज्यभरात आज विद्यार्थी दिवसाचं आयोजन

आणि

·    राष्‍ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पी. व्ही. सिंधु आणि सायना नेहवाल महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत

****

पनामा पेपर फुटीप्रकरणाचा तपास करणाऱ्या विविध संस्थेच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समितीला, पॅराडाईज पेपर्स प्रकरणाचाही तपास करण्याचा आदेश केंद्र सरकारनं दिला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली हा गट कार्यरत असून सक्त वसूली संचालनालय, भारतीय रिझर्व्ह बँक आणि आर्थिक गुप्त वार्ता विभागाचे प्रतिनिधी या गटात आहेत. ज्या भारतीय नागरीकांनी विदेशात पैसा ठेवला आहे, त्या पैशाची वैधता तपासण्याचं काम हा गट करत आहे.

शोध पत्रकारांची आंतरराष्ट्रीय संघटना – आय.सी.आय.जे.नं प्रसिद्ध केलेल्या पॅरेडाईज पेपर्स मध्ये १८० देशांच्या यादीत भारत १९व्या क्रमांकावर असून, त्यात एकूण ७१४ भारतीयांची नावं आहेत. वाय एस आर काँग्रेसचे प्रमुख जगन मोहन रेड्डी, उद्योजक विजय मल्ल्या, नीरा राडिया, यांच्यासह नागरी उड्डयन राज्यमंत्री जयंत सिन्हा यांचंही या यादीत नाव आहे. 

दरम्यान, या यादीत झालेला उल्लेख हा, ओमिड्यार नेटवर्क कंपनीसाठी काम करत असताना केलेल्या आर्थिक व्यवहारांच्या अनुषंगानं झालेला असून, याचा आपल्याशी वैयक्तिक काहीही संबंध नसल्याचं सिन्हा यांनी सांगितलं आहे.

काँग्रेस पक्षाकडून मात्र या प्रकरणात केंद्र सरकारनं चौकशीचे आदेश जारी करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे..

****

विमुद्रीकरण निर्णयाला उद्या एक वर्ष पूर्ण होत असून, या निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीनं उद्या आठ नोव्हेंबर हा काळा दिवस पाळला जाणार असून मोर्चा काढला जाणार आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी ही माहिती दिली. ‘नोटाबंदी आणि जीएसटी क्या खोया क्या पाया’ या विषयावर नऊ नोव्हेंबर रोजी मुंबईत एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती निरुपम यांनी दिली.

****

काँग्रेस पक्षाची जनआक्रोश यात्रा केवळ नैराश्यातून आयोजित होत असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते मध चव्हाण यांनी केली आहे. ते काल कोल्हापूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. काँग्रेसनं त्यांच्या निराशाजनक कामगिरीबद्दलच जन आक्रोश करावा, असं सांगून चव्हाण यांनी, ठराविक माध्यमं ही भाजपच्या विरोधात कार्यरत असल्याचं सांगितलं.

****

आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि समविचारी पक्षांशी युती करणार असल्याचं सूतोवाच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे. रायगड जिल्ह्यातल्या कर्जत इथं आयोजित पक्षाच्या दोन दिवसीय चिंतन शिबिरात ते काल बोलत होते. भारतीय जनता पक्षाच्या ध्येयधोरणांवर या शिबिरात कडाडून टीका करण्यात आली.  पक्षाचे अध्यक्ष, शरद पवार आज या शिबिराचा समारोप करतील.

****

राज्य उर्दू अकादमीचे २०१५ आणि २०१६ वर्षासाठीचे विविध पुरस्कार काल जाहीर झाले. मराठवाड्यातल्या अनेक साहित्यिक, समीक्षक, शिक्षक तसंच पत्रकारांना विविध श्रेणीत पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये औरंगाबादचे नुरुल हसनैन, असवद गौहर, डॉ कीर्ती जावळे, डॉ शर्फुनिहार, अब्दुल वहीद, शेख मोहम्मद शरफुद्दीन, डॉ अब्दुल अजीज, मोहम्मद अब्दुल हाई, डॉ सहर सईदी, इंतेकाज अफजल, बीडचे काझी मकदुम, सबीहा बेगम, मोहसीन अहमद, सिद्दीकी मोहम्मद इरफान, अंबाजोगाईचे डॉ अकोला गौस, लातूरचे डॉ मोहम्मद खलील सिद्दीकी, नांदेडचे मोहम्मद इमामुद्दीन, परभणीचे डॉ सलीम मोहियोद्दीन, यांचा समावेश आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

राज्यभरात आज विद्यार्थी दिवस साजरा केला जात आहे. आजच्याच दिवशी १९०० साली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळेत प्रवेश केला होता, त्यांचा शाळा प्रवेश हा शैक्षणिक क्रांतीचं पहिलं पाऊल ठरला, त्यामुळे हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. या दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम डॉ. आंबेडकरांनी प्रथम प्रवेश घेतलेल्या सातारा जिल्ह्यातल्या राजवाडा चौक इथल्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये होणार आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

***

नांदेड जिल्ह्यातला माहूर तालुका, पायाभूत सर्वेक्षणानुसार हागणदारीमुक्त घोषीत करण्यात आला आहे. स्वच्छ भारत अभियानातर्गंत  देशभर स्वच्छतेची कामं सुरु असून, यापूर्वी नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर, मुदखेड, आणि धर्माबाद ही तालुके हागणदारीमुक्त झाली आहेत.

****

दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत, जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातल्या शहापूर आणि साष्ट पिंपळगांव इथं ३३ के.व्ही उपकेंद्राचं भुमीपूजन पालकमंत्री बबनराव लेाणीकर यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्ह्यात १५०० नवीन ट्रान्सफॉर्मर्स बसवण्यात आले असून, जिल्ह्यासाठी ३३ केव्हीचे, नवीन ४९ उपकेंद्रं मंजूर करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं भारतीय जनता पक्षाचं सरकार देशाचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे विद्यार्थी नेते कन्हैय्या कुमार यांनी केला आहे. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथं कॉम्रेड गंगाधरप्पा बुरांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित जाहीर सभेत ते काल बोलत होते. मोदी सरकारच्या अनेक निर्णयांमुळे देशात लोकशाही ऐवजी हुकुमशाहीचं वातावरण तयार होत असून, याविरुद्ध आवाज उठवण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.

त्यानंतर लातूर इथं व्ही एस. पँथरच्या महाअधिवेशनाचं उद्घाटन कन्हैय्याकुमार यांच्या हस्ते झालं. देशाचं विभाजन करणाऱ्या शक्ती संपवण्यासाठी एकत्र आलं पाहीजे, असं यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं.

****

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या जालना जिल्ह्यातल्या ७७ शेतकऱ्यांची पहिली यादी ग्रामीण बँकेला प्राप्त झाली आहे. पडताळणी झाल्यावर कर्जमाफीचे आठ कोटी २८ लाख रुपये या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात येणार आहे. ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक रत्नाकर केसकर यांनी ही माहिती दिली. 

****

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत जालना इथं आज 'समरसता संगम’ सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्गे बुलडाण्याकड़े जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक आज दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत बंद असणार आहे.

****

नागपूर मध्ये सुरू असलेल्या ८२व्या राष्‍ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधु आणि सायना नेहवाल  महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पोहोचली आहे. पुरूष एकेरीत किदाम्बी श्रीकांतनंही विजय मिळवत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. मिश्र दुहेरीत सात्विक साई राज आणि अश्विनी पोनप्‍पाच्या जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

****

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात १४ व्या तुकडीतल्या ११७ प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत समारंभ काल झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य पोलीस उपमहानिरिक्षक डॉ.डी. जे. सिंह उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षणार्थीनी लक्षवेधी प्रात्यक्षिकं सादर केली.

****

५७ व्या राज्य नाट्य स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. औरंगाबाद इथं प्राथमिक फेरीत २१ नाटकांचं सादरीकरण होणार आहे. शहरातल्या तापडिया नाट्य मंदिरात दररोज सकाळी साडे अकरा वाजता आणि सायंकाळी सात वाजता प्रयोगांचं सादरीकरण होईल.

*****

No comments:

Post a Comment