आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
१४ नोव्हेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता
****
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल
नेहरू यांची १२८ वी जयंती आज देशभरात साजरी करण्यात येत आहे. राष्ट्रपती रामनाथ
कोविंद,
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरुंना
आदरांजली वाहिली आहे.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह राजकीय पक्षाच्या
नेत्यांनी दिल्ली इथलं पंडित नेहरुंचं समाधी स्थळ शांतिवन इथं पुष्प अर्पण करुन
आदरांजली वाहिली.
पंडीत नेहरू यांची जयंती बालदिन
म्हणूनही साजरी करण्यात येत आहे. यानिमित्तानंही बालकांसाठी स्पर्धा तसंच माहितीपूर्ण
कार्यक्रमांचं सर्वत्र आयोजन करण्यात आलं आहे.
औरंगाबाद इथं गरवारे कम्यूनिटी
सेंटरच्या गरवारे बाल भवनतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी बालोत्सव २०१७ चं आयोजन
करण्यात आलं आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आज
दिवसभर विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
****
डेबीट आणि क्रेडीट कार्ड तसंच
इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आर्थिक क्षेत्रात केली जाणारी फसवणूक रोखण्यासाठी करण्यात
आलेल्या उपाययोजनांचा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काल आढावा घेतला. बँक
तसंच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून व्यवहार करणाऱ्या कंपन्यांकडून ग्राहकांना एस एम एस
आणि ई - मेलच्या माध्यमातून माहिती देणं, फसवणूक करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी आकड्यांचं विश्लेषण, आणि व्यवहार पूर्व आर्थिक सेवा देणाऱ्या कंपन्यांसाठी
ग्राहकांची माहिती संकलित करणं, नो
युवर कस्टमर - के वाय सी अनिवार्य करण्यासह सर्व उपाय योजनांचा यावेळी आढावा
घेण्यात आला.
****
मुख्यमंत्री पाणीपुरवठा योजनेत समावेश
करण्यात येणाऱ्या योजनांची माहिती
पंधरा दिवसात सादर करण्याचे निर्देश, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सर्व
जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते काल मुंबई इथं
यासंदर्भातल्या आढावा बैठकीनंतर बोलत होते.
****
राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर ५००
मिटरच्या आत मद्य विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश महानगरपालिका क्षेत्राला लागू होत
नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. मद्रास उच्च न्यायालयानं
यासंदर्भात शंका उपस्थित केली होती, या शंकेचं निरसन करताना सर्वोच्च न्यायालयानं हे स्पष्टीकरण
दिलं. गेल्यावर्षी ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयानं राज्य आणि राष्ट्रीय
महामार्गावर ५०० मिटरच्या आत मद्य विक्रीस बंदी घालण्याचे आदेश दिले होते.
*******
No comments:
Post a Comment