Friday, 17 November 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.11.2017 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

१७ नोव्हेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

*****

अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्याचा अधिकार हा अत्यंत पवित्र असून तो नाकारला जाऊ शकत नाही, तसंच त्याबाबत सामान्यपणे हस्तक्षेप केला जाऊ नये, असं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. कोणताही चित्रपट, नाटक, कादंबरी ही कलेची निर्मिती असते आणि न्यायालयानं सर्जक मनाचा बळी घेऊ नये, असं सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील पीठानं म्हटलं आहे. अॅन इन्सिग्निफिकंट मॅन या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी, या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे मत मांडलं.

****

देशातल्या वेगवेगळया विमानतळांवर कार्यरत असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातल्या सुमारे ७१ पूर्णांक ७१ शतांश टक्के व्यक्तींची कार्यपध्दती सर्वोकृष्ट आढळून आली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातर्फे झालेल्या एका पाहणीचा हा निष्कर्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अहवालाच्या नोंदींबाबत आनंद व्यक्त केला आहे. 

****

राज्यातल्या कृषीपंपधारक थकबाकीदार शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी शासनानं १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. आता ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांची वीज खंडित होणार नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. अनधिकृत वीजजोडणीविरुध्द नियमानुसार कारवाई करावी असंही सूचित करण्यात आलं आहे. 

****

राज्य परिवहन महामंडळाच्या २४ तास चालणाऱ्या कॉलसेंटरचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते काल मुंबईत उद्घाटन झालं. एक आठ शून्य शून्य दोन दोन एक दोन पाच शून्य या क्रमांकावर प्रवाशांना आवश्यक ती माहिती प्राप्त होऊ शकेल त्याच प्रमाणे या प्रणालीद्वारे प्रवाशी चौकशी, तक्रारी आणि सूचनांबाबत कार्यवाही करण्यात येईल, असं रावते यांनी सांगितलं.

****

शेतकऱ्यांच्या शेतमालाला शासनानं हमीभाव जाहीर केलेला असताना, काही व्यापारी कमी भावानं शेतमाल खरेदी करत असून त्याबाबत प्रशासनानं योग्य ती कारवाई करावी अशा सूचना जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे. जालना जिल्ह्यातल्या मंठा कृषी उत्पन्न बाजार समिती इथं नाफेडमार्फत सुरु करण्यात आलेल्या  हमीभाव दरानं सोयाबीन खरेदी केंद्राचं उद्घाटन लोणीकर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांनी ऑनलाईन पध्दतीनं नोंदणी करुन आपला माल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

*******

No comments:

Post a Comment