Friday, 17 November 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.11.2017 01.00PM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 November 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  १७ नोव्हेंबर २०१ दुपारी १.०० वा.

*******

आर्थिक निकषांवर देशांचं मानांकन ठरवणारी अमेरिकेची संस्था मूडीजनं भारताच्या मानांकनात वाढ केली आहे. विशेष म्हणजे १३ वर्षांनंतर मूडीजनं भारताच्या मानांकनात सुधारणा केली असून, विमुद्रीकरण आणि वस्तू आणि सेवा कर या दोन्ही निर्णयांचंही कौतुक केलं आहे. भारतातल्या आर्थिक सुधारणा विचारात घेऊन मानांकनात सुधारणा करण्यात आली आहे. आर्थिक सुधारणांसाठी पावलं उचलण्यात आल्यानं भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल सकारात्मक असेल, असं मूडीजनं म्हटलं आहे. कर्जाच्या ओझ्याचा देशाच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होत असल्याचा धोक्याचा इशाराही या संस्थेनं दिला आहे.

मूडीजच्या या निर्णयामुळे, सरकारनं आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उपाययोजनांना मान्यता मिळाल्याचं पंतप्रधान कार्यालयानं म्हटलं आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पूर्णपणे विचार करुन पावलं उचलली असल्याचं महसूल सचिव हसमुख अढिया यांनी म्हटलं आहे.  

****

जम्मू काश्मीरमधल्या पूँछ जिल्ह्यात आज पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला. देवगार भागात आज सकाळी पाकिस्तानी सैन्यानं हातबॉम्ब फेकल्याचं संरक्षण प्रवक्त्यांनी सांगितलं. भारतीय सेनेनंही या गोळीबाराला चोख प्रत्यूत्तर दिलं. बराच वेळ ही चकमक सुरु होती.

****

संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठीच्या तारखा या आठवडयात निश्चित करण्यात येतील असं संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल यांनी म्हटलं आहे. संसदीय कामकाज समितीची त्यासाठी बैठक होणार असल्याचं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. हिवाळी आधिवेशन लांबणीवर पडल्याबद्दल काँग्रेसह सर्व विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली आहे.

****

कापणीनंतर राहिलेले पिकांचे खुंट शेतकऱ्यांकडून प्रति टन पाच हजार ५०० रुपये या दरानं सरकार विकत घेणार असल्याची माहिती केंद्रीय उर्जा मंत्री आर के सिंग यांनी दिली आहे. त्याचा उपयोग सरकारी मालकीच्या राष्ट्रीय औष्णिक वीज प्रकल्प - एन टी पी सी मध्ये वीज संयंत्रांमधे करण्यात येणार असल्याचं त्यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. पिकांचे खुंट जाळल्यामुळेच दिल्ली आणि लगतच्या परिसरात हवेच्या प्रदूषणाचं प्रमाण वाढत आहे, विशेषतः पंजाब आणि हरियाणातले शेतकरी मोठ्या प्रमाणात हे खुंट जाळत असल्याचं वृत्त आहे.   

****

राज्य सरकारनं कारागृहात होणाऱ्या मृत्यूप्रकरणी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती स्थापन केली आहे. सांगलीच्या पोलिस कोठडीत अनिकेत कोथळे या तरुणाच्या मृत्यू प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. भविष्यात अशा घटना घडू नये, तसंच पोलिस ठाण्यात नागरिकांना मिळणारी वागणूक, पोलिसांची मानसिक स्थिती याप्रकरणी उपाययोजना सुचवण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आल्याचं गृह राज्य मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.   

****

बाल आणि माता मृत्यूदरात झालेली घट, शिव आरोग्य टेलिमेडिसिन, दुचाकी रुग्णवाहिका यासह आरोग्य क्षेत्रातल्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्राला देशातला सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा पुरवणाऱ्या राज्याचा सन्मान मिळाला आहे. सांघिक प्रयत्नामुळेच राज्याला हे यश मिळाल्याच्या भावना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त केल्या. इंडिया टुडे माध्यम समुहाच्या वतीनं विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्यांचा काल मुंबईत सत्कार करण्यात आला.

****

ऊस आणि कापसासारख्या उत्पादनांचं वजन करणाऱ्या राज्यातल्या सर्व वजन काट्यांचं लेखापरिक्षण आणि तपासणी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या वजन काट्यामंधल्या वजनांमध्ये विसंगती आणि अनियमितता आढळून आल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारींनंतर सरकारनं हा निर्णय घेतल्याचं मापन विभागाचे नियामक अमिताभ गुप्ता यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

****

राज्यातल्या प्रस्तावित धोरण संशोधन संस्थेच्या अध्यक्षपदी माजी केंद्रीय अर्थ सचिव विजय केळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या प्रशासकीय विभागातर्फे ही घोषणा करण्यात आली. पुण्यातल्या ताथवडे इथं ही संस्था उभारण्यात येणार आहे.

****

चीनमधल्या फुझोऊ इथं सुरु असलेल्या चायना खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधूचा उपान्त्यपूर्व फेरीचा सामना आज चीनच्या गाओ फिंग्जीशी होणार आहे. काल झालेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात सिंधूनं चीनच्या यू ए हानचा २१ - १५, २१ - १३ असा पराभव केला होता.

****

भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलकाता इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याचा आजचा दुसर्या दिवसाचा खेळही पावसामुळे थांबवण्यात आला. भारताना आज तीन बाद १७ धावांवर खेळ सुरु केला, काही वेळानंतर पाऊस सुरु झाल्यानं खेळ थांबवण्यात आला. भारताच्या पाच बाद ७४ धावा झाल्या आहेत.

*******

No comments:

Post a Comment