Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 18 November 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ नोव्हेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
उच्च शिक्षण संस्थांनी केवळ चांगल्या नोकरी मिळवून देण्याऐवजी
विद्यार्थ्यांमधील ज्ञानाची पातळी वाढवण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत, असं राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्ली विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमात
बोलत होते. दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून विद्यापीठांनी समाज सुधारण्याच्या दूरगामी
अशा ध्येयपूर्तीसाठीही प्रयत्न करायला हवे, असंही राष्ट्रपती कोविंद यांनी यावेळी सांगितलं.
****
केंद्र सरकारनं देशात आयात करण्यात येणाऱ्या कच्च्या पाम
तेलांवरील आयात शुल्क १५ टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत. देशात आयात होणाऱ्या
स्वस्त तेलावर निर्बंध घालून देशाअंतर्गत शेतकऱ्यांना आणि तेल उत्पादकांच्या हिताचं
रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे शुद्ध कच्च्या पाम तेलावरींल
आयात शुल्क हे २५ टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आलं आहे. तसंच कच्च्या
सोयाबीन तेलावरील आयात शुल्क हे साडे सतरा टक्क्यांवरून ३० टक्के करण्यात आले आहे;
तर शुद्ध सोयाबीन तेलावरील शुल्क २० टक्क्यांवरून ३५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आलं
आहे.
****
दरम्यान, केंद्र सरकारनं सोयाबीन, सुर्यफूल, मोहरीच्या
तेलावरच्या आयात शुल्कात मोठी वाढ करुन, शेतकरी आणि देशी तेल उद्योगाला मोठा दिलासा
दिला असल्याची माहिती, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली आहे.
ते आज लातूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सोमवारपासून बाजारात सोयाबीनचे भाव हमी
भावाइतके होतील, अशी खात्री असल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारनं आयात शुल्कात वाढ
केल्यामुळे तेल उद्योगातील व्यापाऱ्यांनीही आनंद व्यक्त केला असल्याचं त्यांनी यावेळी
सांगितलं.
****
देहदानाबाबत
समाजात जनजागृती होणं गरजेचं असल्याचं मत, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे
न्यायमूर्ती पी.आर.बोरा यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
आणि रूग्णालय - घाटीच्या शरीरशास्त्र विभागात आज देहदात्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी
‘देहदान ऋणनिर्देश सोहळ्या’चं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते.
****
गोवा इथं होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय
चित्रपट महोत्सवात कॅनडीयन निर्माते ॲटम एगोयान यांना जीवनगौरव पुरस्कार
दिला जाणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी ट्विटरद्वारे ही घोषणा
केली. गोव्यात पणजी इथं २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवात एगोयान
यांचे तीन चित्रपट विशेष विभाग या श्रेणीत दाखवले जाणार आहेत.
****
उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या
धरणग्रस्त आणि इतर शेतकऱ्यांसाठी उन्हाळ्यात पाणी उपलब्ध व्हावं, यासाठी १० एम.एम.क्यूब
पाण्याचं आरक्षण करण्याची मागणी उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी, कामगार
मंत्री आणि राज्य कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे
केली आहे. मांजरा धरणातून लातूर औद्योगिक वसाहतीला मोठ्या प्रमाणात पाणी देण्यात येतं,
त्याऐवजी लातूर शहरानजीकच्या पाणीसाठ्यातून औद्योगिक वापराचं आरक्षण करण्यात यावं,
असं त्यांनी निलंगेकर यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या रस्त्यावरच्या
खड्ड्याची तक्रार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे केल्यास, त्याचा पाठपुरावा संबंधित
विभागाकडे करुन, त्याचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात येईल यासाठी नागरिकांनी
पुढाकार घ्यावा, असं आवाहन जिल्हा न्यायाधीश उर्मिला जोशी यांनी केलं आहे. परभणी इथं
विधीसेवा दिनानिमित्त आयोजित जनजागृती मोहीमेअंतर्गत आयोजित वार्ताहर परिषदेत त्या
आज बोलत होत्या. कोणत्याही कार्यालयात नियमानुसार काम होत नसेल, तर विधीसेवा प्राधिकरणाशी
संपर्क साधावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
प्रवाशांची वाढती
मागणी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड - पनवेल एक्सप्रेसला एक अतिरिक्त द्वितीय
श्रेणी डबा कायम स्वरूपी वाढवण्याचं ठरवलं आहे. हा डबा २९ नोव्हेंबरपासून नांदेड इथून
निघणाऱ्या गाडीला तर ३० नोव्हेंबरपासून पनवेल इथून निघणाऱ्या गाडीला जोडला जाईल.
मध्य प्रदेशातल्या
भोपाळ इथं होणाऱ्या इज्तेमा यात्रेकरता नांदेड विभागातून मुस्लिम भाविकांसाठी एक विशेष
रेल्वे गाडी सोडण्यात येणार असल्याचंही दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं
कळवलं आहे. २३ नोव्हेंबरला ही गाडी नांदेडहून सुटेल आणि परतीच्या प्रवासात २७ नोव्हेंबरला
भोपाळहून सुटेल. निझामाबाद, सिकंदराबाद, काझीपेट, बल्लारशामार्गे ही गाडी धावणार आहे.
****
औरंगाबाद शहराच्या
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशांचे पर्यटकांना नृत्यरूपातून दर्शन होण्यासाठी महात्मा
गांधी मिशनच्या महागामीतर्फे आयोजित ‘ऑरा औरंगाबाद’ नृत्यशृंखलेचं पाचवं सत्र आजपासून
सुरू होत आहे. आज संध्याकाळी साडेसात वाजता सिडको एन ६ मधल्या महागामीच्या शारंगदेव
भवन इथं घृष्णेश्वर मंदीर, मुघल कालीन आणि भगवान शिव तांडव कथ्थक नृत्याद्वारे सादर
करण्यात येणार आहे.
****
No comments:
Post a Comment