Sunday, 5 November 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 05.11.2017 - 17.25


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

०५ नोव्हेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

****

जम्मू काश्मीरमधल्या उरी सेक्टर मध्ये भारतीय लष्करी जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. यावेळी झालेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. 

****

जालना इथल्या फन रनर फाउंडेशनच्यावतीनं आज पहिल्या हॉफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. जालना-परभणी मार्गावरच्या मंठा चौफुली इथून सकाळी साडेसहा वाजता पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जून खोतकर, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत २१, १० आणि पाच किलोमीटर गटात दोन हजार १०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

****

राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नवी दिल्ली इथं केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या वतीनं सुरु असलेल्या ‘वर्ल्ड फूड इंडिया’ कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी काल राज्याचं ‘अन्न प्रकिया धोरण २०१७’ जाहीर केलं.

राज्याला अन्न प्रक्रिया उद्योगाचं गंतव्य स्थान बनवणं, प्रतिवर्षी या उद्योगाचा दुहेरी आकड्यात विकास करणं, या उद्योगात शेतकऱ्यांचा सहभाग वाढवून येत्या पाच वर्षात शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं, या क्षेत्रात जवळपास पाच लाख कौशल्याधारित मनुष्यबळ निर्माण करणं, सकस आहारातून कुपोषणाच्या समस्येवर मात करणं आदी उद्दिष्ट या धोरणात ठेवण्यात आले असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. राज्य शासनाकडून उद्योगांना पाणी पुरवठ्यावर एक लाख रुपये तर वीज पुरवठयावर दोन लाख रुपयांचं अनुदान देण्यात येणार असल्याचंही या धोरणात नमूद करण्यात आलं आहे.

****

शिक्षकांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काल राज्यभरात ३४ जिल्ह्यांमध्ये शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढण्यात आले. शिक्षकांच्या बदल्या फक्त जून महिन्यातच कराव्यात, वरिष्ठ श्रेणीची जाचक अट रद्द करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी, आदी मागण्यांचं निवेदन यावेळी प्रशासनाला देण्यात आलं.

****

No comments:

Post a Comment