Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 07 November 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ नोव्हेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
विमुद्रीकरणानंतर देशात स्वच्छ, पारदर्शी आणि इमानदार
अर्थव्यवस्था निर्माण झाली असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे.
सध्या काही लोकांना विमुद्रीकरणाचे फायदे दिसत नाहीत, मात्र ते कालांतराने दिसतील,
असं ते म्हणाले. आठ नोव्हेंबर २०१६ हा दिवस भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासात एक ऐतिहासिक
दिवस म्हणून स्मरणात राहील, हा दिवस देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी सरकारनं केलेल्या
संकल्पाचं प्रतीक असल्याचं जेटली यांनी नमूद केलं.
****
कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराशी
संबंधित तक्रारी सोडवण्यासाठी आपलं मंत्रालय कटीबद्ध असल्याचं केंद्रीय महिला आणि बालकल्याण
मंत्री मेनका गांधी यांनी म्हटलं आहे. कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या
तक्रारी ऑनलाईन दाखल करण्यासाठी ‘शी बॉक्स’ या तक्रार व्यवस्थापन प्रणालीचं गांधी यांनी
आज नवी दिल्लीत उद्घाटन केलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. माध्यमांनी या व्यवस्थेबद्दल
महिलांमध्ये जागरुकता निर्माण करावी, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
****
राज्य सरकारनं दिलेली शेतकरी कर्जमाफी ही अपमानित करणारी
असल्याचं, माजी केंद्रीय कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार
शरद पवार यांनी म्हटलं आहे. रायगड जिल्ह्यात कर्जत इथं आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाच्या चिंतन बैठकीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. राज्य सरकारच्या जाहिरातींसंदर्भात
बोलताना पवार यांनी, सत्तेच्या खुर्चीत बसलेले हे खरे लाभार्थी असल्याची टीका केली.
चुकीच्या अर्थकारणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत असून, शेती अर्थव्यवस्था
संकटात सापडली असल्याचं, पवार यांनी नमूद केलं. शेतमालाला भाव नसल्यानं, शेतकरी आत्महत्येचा
आलेख वाढत जात असल्याचं सांगत, आत्महत्येचा प्रमाणात गेल्या तीन वर्षात मोठी वाढ झाली
असल्याचंही पवार म्हणाले.
****
विशेष आर्थिक क्षेत्राच्या विकासकांना, सहविकासकांना आणि
या क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या उद्योगांना मुद्रांक आणि नोंदणी शुल्क दहा वर्षांऐवजी
२५ वर्षांसाठी माफ करण्याचा निर्णय, आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
जालना इथं सीडपार्कची उभारणी कृषी विभागाकडून करणं आणि त्यासाठी उद्योग विभागाकडून
पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
****
एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातल्या ग्रामीण,
आदिवासी तसंच नागरी क्षेत्रातल्या ५५३ प्रकल्पातल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस तसंच
मिनी अंगणवाडी सेविकांना २०१७-१८ या आर्थिक वर्षात गणवेशासाठी १० कोटी ६८ लाख रुपये
अनुदान वितरित करण्यात येत आहे. महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी हा निधी
वितरीत करण्यास नुकतीच मान्यता दिली होती.
****
आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब
आंबेडकरांचे विचार आत्मसात करावे, असं प्रतिपादन उस्मानाबादचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप
यांनी केलं आहे. उस्मानाबाद इथं आयोजित विद्यार्थी दिन कार्यक्रमात ते आज बोलत होते.
यावेळी विद्यार्थ्यांना डॉ आंबेडकर यांच्या कार्याची माहिती देण्यात आली.
****
औरंगाबाद इथंही आज शैक्षणिक संस्थांमधून विद्यार्थी दिन
साजरा करण्यात आला. यानिमित्तानं विद्यार्थ्यांसाठी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या
जीवनकार्यावर निबंध लेखनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.
****
जालना इथल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल रात्री
अंबड चौफुली इथं एका जीपमधून ३० लाख ४० हजार रुपयांची रोकड जप्त केली. नाकाबंदी दरम्यान,
वाहनांच्या तपासणीवेळी केलेल्या या कारवाईमध्ये पोलिसांनी अंबड इथल्या दोन संशयितांना
चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
****
औरंगाबाद इथं येत्या ११ आणि १२ नोव्हेंबरला गुरू शिष्य
परंपरेला समर्पित ‘तस्मै श्री गुरवे नम:’ या दोन दिवसीय नृत्य महोत्सवाचं आयोजन करण्यात
आलं आहे. महात्मा गांधी मिशनच्या महागामीच्या संचालिका पार्वती दत्ता यांनी आज वार्ताहर
परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान, ऑरा औरंगाबाद या नृत्य श्रृखंलेचं पाचवं सत्र येत्या
१८ नोव्हेंबरला सुरू होणार आहे. दर शनिवारी आणि रविवारी संध्याकाळी ७.३० वाजता महागामीच्या
शारंगदेव सदनात हा कार्यक्रम होणार असल्याचं दत्ता यांनी सांगितलं.
****
भारताची मुष्टीयोद्धा एम सी मेरी कोमनं विएतनाम इथं सुरु
असलेल्या आशियाई महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. ४८ किलो
वजनी गटात आज झालेल्या उपान्त्य सामन्यात मेरी कोमनं जपानच्या सुबासा कोमुराचा पराभव
केला.
****
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तीसरा ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट
सामना आज तिरुवअनंतपुरम इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात
होईल. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक एकनं बरोबरीत आहेत.
****
No comments:
Post a Comment