Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 November 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५
नोव्हेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
·
सर्व
स्वातंत्र्य लढ्यांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात येणं आवश्यक - राज्यपाल सी विद्यासागर
राव
·
येत्या
तीन वर्षात राज्याच्या कानाकोपऱ्यात सौर ऊर्जा वाहिन्यांचं जाळं उभारण्याची मुख्यमंत्र्यांची
घोषणा
·
विविध
मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक संघटनांचे राज्यातल्या ३४ जिल्ह्यांमध्ये मोर्चे
आणि
·
दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात न्युझीलंडकडून भारताचा ४०
धावांनी पराभव
****
मराठवाडा मुक्तीसंग्रामासह सर्व स्वातंत्र्य लढ्यांचा
इतिहास शालेय अभ्यासक्रमात येणं आवश्यक असल्याचं, राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी
म्हटलं आहे. औरंगाबाद इथं उभारण्यात आलेलं स्वातंत्र्य संग्राम स्मारक तसंच गगनचुंबी
राष्ट्रध्वजाचं लोकार्पण काल राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, खासदार रावसाहेब दानवे, विभागीय
आयुक्त पुरुषोत्तम भापकर, उद्योजक राम भोगले, यांच्यासह अधिकारी, लोकप्रतिनिधी, उद्योजक
यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात राज्यपाल म्हणाले...
मराठवाडा मुक्ती संग्राम की याद दिलाता यह क्रांती
चौक विश्वस्तर के मंच पर अपनी अनोखी पहचान बनाने जा रहा है. मुझे पुरा विश्वास है देश
की भावी पिढी में देशभक्ती, स्वाभिमान, आत्मविश्वास, तथा आत्मगौरव की तीव्र भावना जागृत
रखने कार्य इस ध्वज द्वारा होता रहेगा.
हरिभाऊ बागडे यांनी यावेळी केलेल्या भाषणात या स्मारकाची
देखभाल दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेनं व्यवस्थित सांभाळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
****
येत्या तीन वर्षात राज्याच्या कानाकोपऱ्यात सौर ऊर्जा
वाहिन्यांचं जाळं उभारलं जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
काल अहमदनगर जिल्ह्यात राळेगणसिद्धी इथं राज्यातल्या सौर ऊर्जा वाहिनीचं उद्घाटन करताना
ते बोलत होते. सोलर पॅनलद्वारे सर्व फीडर जोडले जाणार असून, यामार्फत शेतकऱ्यांना दिवसा
वीज उपलब्ध करून देता येणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आपल्या भाषणात मुख्यमंत्री
म्हणाले...
ज्या राळेगणसिध्दीमधनं ग्रामविकासाचा
विचार आणि ग्रामविकासाची ऊर्जा ही संपूर्ण देशापर्यंत गेली, त्याच राळेगणसिध्दीमध्ये
एक अत्यंत महत्वाकांक्षी अशा प्रकारचा प्रकल्प आणि त्याची सुरुवात आज या ठिकाणी होतेय
आणि मला विश्वास आहे, येत्या तीन वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही
हे सौर ऊर्जेचे फेडर तयार करु.
ज्येष्ठ
सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या प्रकल्पातून
आगामी तीन महिन्यात दोन मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे सलग
१२ तास अखंड वीज उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
****
राज्यातल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण करण्यासाठी
राज्य शासनानं नाबार्डचे निवृत्त अध्यक्ष यशवंत थोरात यांच्या अध्यक्षतेखाली एका अभ्यास
समितीची स्थापना केली आहे. या समितीला तीन महिन्यांत आपला अहवाल देण्यास सांगण्यात
आलं आहे. सहकार विभागानं याबाबतचा निर्णय जारी केला. राज्यातल्या ३१ जिल्हा मध्यवर्ती
सहकारी बँकांपैकी काही बँका आर्थिक अडचणीत आहेत. या बँका शेतकर्यांना गरजेप्रमाणे पीककर्ज
पुरवठा करण्यास असमर्थ आहेत.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
शिक्षकांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काल
राज्यभरात ३४ जिल्ह्यांमध्ये शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी
कार्यालयावर मोर्चे काढण्यात आले. शिक्षकांच्या बदल्या फक्त जून महिन्यातच कराव्यात,
वरिष्ठ श्रेणीची जाचक अट रद्द करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, जुनी निवृत्ती वेतन
योजना लागू करावी आदी मागण्यांचं निवेदन यावेळी प्रशासनाला देण्यात आलं असल्याचं, लातूर
इथल्या मोर्चानंतर शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सांगितलं. शिक्षक संघटनेच्या समन्वय
समितीनं काल औरंगाबाद इथंही आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
या मोर्चाचं रुपांतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत झालं. उस्मानाबाद इथंही शिक्षक
समन्वय समितीनं मोर्चा काढला. या मोर्चात विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी,
शिक्षक सहभागी झाले होते. मराठवाड्यात नांदेड, जालन्यासह सर्वच ठिकाणी शिक्षक संघटनांनी
मोर्चे काढले.
****
सरकार
एका बाजूला जाहिरातबाजी करत आहे
तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चेष्टा करत असल्याची टीका ज्येष्ठ साहित्यिक
पुष्पा भावे यांनी केली आहे. यंदाचा अनंत भालेराव पुरस्कार पुष्पा भावे यांना काल औरंगाबाद
इथं समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. पन्नास हजार रूपये,
स्मृती चिन्ह असं स्वरूप असलेला हा पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक मधुकर मुळे यांच्या हस्ते
भावे यांना प्रदान करण्यात आला. नागरिकांनी बुलेट ट्रेनची वाट बघायची की रोजच्या दैनंदिन
गरजांकडे बघायचं असा सवालही भावे यांनी यावेळी उपस्थित केला.
****
क्रिकेट
- भारत आणि न्यूझीलंड दरम्यान राजकोट इथं झालेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात काल न्युझीलंडनं भारताचा ४०
धावांनी पराभव केला. प्रथम
फलंदाजी करताना, निर्धारीत २० षटकात न्यूझीलंडनं दोन गडी बाद १९६ धावा करत भारतासमोर
विजयासाठी १९७ धावांचं आव्हान ठेवलं. मात्र भारतीय संघ २० षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात १५६ धावाच करु शकला. कालच्या सामन्यानंतर ही तीन सामन्यांची मालिका
१-१ अशी बरोबरीत आली आहे.
****
हमीभावापेक्षा कमी दरानं शेतमाल खरेदीचा प्रकार आढळून
आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची सूचना राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री
पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे. खरीप हंगाम २०१७ -१८ च्या शेतमालाच्या हमी
भाव संदर्भात जालना इथं आयोजित आढावा बैठकीत काल ते बोलत होते. जालना जिल्ह्यातल्या
बदनापूर, जालना, मंठा, भोकरदन आणि जाफ्राबाद या ठिकाणी भारतीय कापूस महामंडळातर्फे
शासकीय कापूस खरेदी केंद्रं लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचं, लोणीकर यांनी सांगितलं.
****
शीख धर्माचे संस्थापक गुरू नानकदेव यांची ५४८ वी जयंती
काल सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. काल सकाळपासूनच देशभरातल्या गुरुद्वारांमध्ये
कीर्तनं आणि गुरू ग्रंथ साहीब पठण करण्यात आलं. औरंगाबाद शहरातही गुरूनानक जयंतीनिमित्त
आयोजित कार्यक्रमांमध्ये शीख बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले. नांदेड इथं त्रिपुरारी
पौर्णिमेनिमित्त काल सायंकाळी गोदावरी नदीच्या तिरावर हजारो दिवे लावून दिपोत्सव साजरा
करण्यात आला. संत एकनाथ महाराजांनी लिहीलेल्या एकनाथी भागवत या ग्रंथाला ४४४ वर्ष पूर्ण
झाल्याबद्दल काल पैठण इथं धर्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विविध धार्मिक विधी
करण्यात आले. कार्तिकी पोर्णिमेनिमित्त बीड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र कपिलधार इथं
तीन दिवस झालेल्या यात्रेत काल हजारो भाविकांनी संत शिरोमणी मन्मथस्वामी महाराजांचं
दर्शन घेतलं.
****
ऊस दराच्या घोषणेसाठी काल बीड जिल्ह्यातल्या माजलगाव इथं
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संघर्ष समितीनं माजलगाव बंद पाळला. या बंदला चांगला प्रतिसाद
मिळाला.
****
गाणगापूर इथं दर्शन घेऊन लातूर जिल्ह्यातल्या उदगीरला
मोटारीनं जात असतांना हुमनाबाद जवळ चालकाचं नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात मोटारीतल्या
चार जणांचा मृत्यु झाला. काल सकाळी झालेल्या या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर इतर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.
****
No comments:
Post a Comment