Friday, 1 December 2017

Text - AIR NEWS BULLETIN AURANGABAD 01.12.2017 6.50




Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 December 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ डिसेंबर २०१७ सकाळी .५० मि.

****

·     पश्चिम खोऱ्यातल्या नद्यांचं पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासह गोदावरी एकात्मिक जल आराखड्याला मुख्यमंत्र्यांची मान्यता

·     राज्यात आजपासून संपूर्ण महिनाभर मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात येणार

·     जागतिक भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूला सुवर्ण पदक

·     विभागीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांना जालना इथं प्रारंभ

आणि

·     औरंगाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालयातून खंडणी घेणाऱ्या दोघांना अटक

****

पश्चिम खोऱ्यातल्या नद्यांचं पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासह गोदावरी एकात्मिक जल आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल सह्याद्री अतिथीगृहावर राज्य जल परिषदेची बैठक झाली, त्यावेळी हा देशातला पहिला जल आराखडा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या आराखड्यानुसार राज्यातल्या पाचही खोऱ्यातले जल आराखडे तयार करून एकत्रित करण्याचं नियोजन आहे, त्यापैकी कृष्णा, तापी तसंच कोकण खोरे एकात्मिक जल आराखड्याला मार्च २०१८ पर्यंत मान्यता देण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जलयुक्त शिवार अभियानासंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी, जल महामंडळानं केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करताना, जलसंधारणाची कामे थांबवू नयेत, असे निर्देश दिले.

****

ओजस आंतरराष्ट्रीय शाळेचे निकष राज्यशासनानं काल निश्चित केले. राज्यात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या १०० शाळा निर्माण करण्याचा निर्णय शासनानं नुकताच घेतला आहे, यानुसार राज्याच्या सर्व विभागात पहिल्या टप्प्यात १० ओजस आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करण्यात येणार आहेत. पायाभूत सुविधा तसंच इतर शाळांना मार्गदर्शन करण्याच्या क्षमतेनुसार या शाळांची निवड केली जाईल. या शाळा परिसरातल्या इतर नऊ शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन करतील. या शाळांना तेजस शाळा असं संबोधलं जाणार आहे. औरंगाबाद विभागासाठी दोन ओजस शाळा तर अठरा तेजस शाळा विकसित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

****

वस्तू आणि सेवा कर - जीएसटी कर रचनेअंतर्गत गुळाचा सध्याचा अकृषक उत्पादन - नॉन अॅग्रीकल्चर प्रोड्यूस हा दर्जा वगळून कृषी उत्पादन असा करण्यात यावा, अशी मागणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. गुळावर जीएसटी लावल्यानं शेतकऱ्यांना कमी दर मिळणार असून, ग्राहकांनाही जादा दरानं गूळ घ्यावा लागू शकतो, असं खोत यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

****

नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यातल्या आणखी ७५३ शेतकऱ्यांनी तयारी दर्शवली असून, त्यांच्या शेतजमिनींचं खरेदीखतही तयार करण्यात आलं आहे. जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातून हा समृद्धी महामार्ग जाणार असून, आत्तापर्यंत २४० हेक्टर भूसंपादन करण्यात आलं आहे.

****

राज्यात आजपासून संपूर्ण महिनाभर मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. आज मुंबईत मालाड इथल्या सामान्य रुग्णालयात या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ होणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी दिली. या कालावधीत संपूर्ण राज्यभरात शासकीय तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दवाखान्यांमध्ये ३० वर्षावरील स्त्रिया आणि पुरुषांची मौखिक आरोग्य तपासणी तसंच उपचार हे पूर्णत: मोफत असतील, असंही त्यांनी सांगितलं.

****

एचआयव्ही एड्स प्रतिबंधासाठी लोकचळवळीतून एकत्रित काम करणं गरजेचं असल्याचं मत आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केलं आहे. एक डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळण्यात येतो, त्यानिमित्त मुंबई इथं आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात ते काल बोलत होते.

दरम्यान, जागतिक एड्स दिनानिमित्त काल औरंगाबाद शहरात जनजागरण फेरी काढण्यात आली. क्रांती चौकातून निघालेल्या या फेरीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीच्या अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर यांनी हिरवा झेंडा दाखवला.

परभणी इथंही महानगरपालिका आयुक्त राहुल रेखावार यांनी जनजागरण फेरीचा शुभारंभ केला. लातूर तसंच नांदेड इथंही यानिमित्तानं जनजागरण फेरी काढण्यात आली.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एक दिवसाच्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. बीडमधल्या एका दैनिकाच्या कार्यक्रमास ते उपस्थित रहाणार असून दुपारी दीड वाजता वडवणी इथं त्यांच्या हस्ते उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पाचं जलपूजन होणार असून, त्यानंतर सरपंच मेळाव्याला ते उपस्थित रहाणार आहेत.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

 अमेरिकेच्या एनाहेम इथं झालेल्या जागतिक भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं सुवर्ण पदक पटकावलं. तिनं ४८ किलो वजनी गटात स्नॅच प्रकारात ८५ किलो तर जर्कमध्ये १०९ किलो वजन उचललं. १९९५ मध्ये कर्नम मल्लेश्वरीनंतर २२ वर्षांनी देशाला भारोत्तोलन क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक मिळालं आहे. या यशाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी मीराबाईचं अभिनंदन केलं आहे.

****

विभागीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांना कालपासून जालना इथं प्रारंभ झाला. राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर आयोजित या स्पर्धेचं उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आलं. ४० क्रीडा प्रकारात होणाऱ्या या स्पर्धेत मराठड्यातल्या आठही जिल्ह्यातले जवळपास दोन हजार खेळाडू सहभागी झाले आहेत.

****

मुस्लीम बांधवांचा सण ईद-ए-मिलाद आज सर्वत्र साजरा होत आहे. या निमित्तानं राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.

औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीचा बाह्यरूग्ण विभाग आज ईद ए मिलाद निमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे बंद राहणार आहे. घाटीच्या वैद्यकीय अधीक्षकांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

****

औरंगाबाद इथं प्रादेशिक परिवहन कार्यालयात वरिष्ठ लिपिक महिलेकडून एक लाख रूपयांची खंडणी घेतांना दोन जणांना काल अटक करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून ब्लॅकमेल करणाऱ्या या दोघांबाबत संबंधित महिला कर्मचाऱ्यानं गुन्हे शाखेकडे तक्रार केल्यानंतर काल पोलिसांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयातच सापळा लावून या दोघांना रंगेहाथ अटक केली.

****

औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं काल शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसंच, कार्यकर्त्यांनी औरंगाबाद जालना मार्ग अडवून धरत केंद्र आणि राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. बोंड अळीने नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत, सरसकट कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, दुधाला ३० रुपये प्रतिलिटर खरेदी भाव, वीज शुल्क माफी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनामुळे या मार्गावरची वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती.

****

जालना जिल्ह्यात घनसावंगी इथल्या उपविभागीय कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमदार राजेश टोपे यांच्या नेतृत्त्वात काल हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. सरकार पोकळ आश्वासनं देऊन जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका टोपे यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसह बोंडअळीने बाधित शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, आदी मागण्यांचं निवेदन या वेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आलं.

****

मूळ आदिवासी समन्वय समितीनं काल आपल्या विविध मागण्यांसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जात वैधता प्रमाणपत्र देण्यासह विविध १४ मागण्या यावेळी करण्यात आल्या.

****

कन्नड तालुक्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन दोन हजार पाचशे पन्नास रुपये भाव मिळावा, अशी मागणी औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. या मागणीसाठी कन्नड इथं उपोषण करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची खैरे यांनी काल भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, खासदार खैरे यांनी काल जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेऊन, समृद्धी महामार्ग भूसंपादनासंदर्भात सकारात्मक तोडगा काढण्याची सूचना केली.

****

जालना शहरात धार्मिक स्थळांचं अतिक्रमण हटवण्याची मोहीम काल चौथ्या दिवशीही सुरू होती. या कारवाईत आतापर्यंत ६० हून अधिक धार्मिक स्थळं हटवण्यात आली आहेत. मुख्य रस्त्यांवर बांधण्यात आलेली अनधिकृत दुकानंही मोठ्या प्रमाणात हटवली जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

परभणी इथं काल स्वच्छ भारत मिशनअंतर्गत कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत, उघड्यावर शौचापासून मुक्ती अभियानाचा आढावा घेण्यात आला. तसंच स्वच्छता ॲपबाबत माहिती देण्यात आली.

****

ग्रामीण भागाच्या विकासासाठी पंचायत समित्या बळकट असणं आवश्यक असल्याचं  राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे. काल जालना इथं आयोजित बैठकीत ते बोलत होते. पंचायत समित्याचं सक्षमीकरण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन घेण्याकरता मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करणर असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

२०१८ -१९ या आर्थिक वर्षासाठी हिंगोली जिल्ह्याच्या १७३ कोटी ३१ लाख रूपयांच्या वार्षिक नियोजनाच्या प्रारूप आराखड्याला काल मंजूरी देण्यात आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. जिल्हा पर्यटन समितीच्या बैठकीत औंढा नागनाथ आणि नरसी नामदेव या तीर्थस्थळाच्या विकास आराखड्यालाही मान्यता देण्यात आली आहे.



****

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी लातूर विभागातल्या जिल्ह्यांत राबवल्या जात असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. गतिमान पद्धतीनं काम करून शेवटच्या घटकापर्यंत योजनांचे लाभ पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

****


No comments:

Post a Comment