Saturday, 2 December 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.12.2017 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

०२  डिसेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

****

मोहम्मद पैंगबर यांची जयंती म्हणजे ईद-मिलाद-उन-नबी आज देशातल्या काही भागांत मोठया उत्साहात साजरी होत आहे. मोहम्मद पैगंबराची शिकवण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मिलाद मैफल आणि सिरत परिषदांचं ठिकठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्तानं ठिकठिकाणी धार्मिक मिरवणुकाही काढण्यात येतात. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ईद मिलाद उन नबीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशातल्या काही भागात काल हा सण साजरा करण्यात आला होता. 

****

      शांततेशिवाय विकास होऊ शकत नाही, असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं सीमा सुरक्षा दलाच्या एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. संपूर्ण देशानं दहशतवादाविरुद्ध एकत्र यायला पाहिजे, असं ते म्हणाले. दहशतवादाला खतपाणी घालण्याचं शेजारच्या राष्ट्राचं धोरण असून, तो देश दहशतवाद आणि धर्माची सांगड घालतो, असं सांगून उपराष्ट्रपतींनी पाकिस्तानच्या धोरणावर टीका केली.

****

      अमृतसरहून नांदेडला येणारी सचखंड एक्स्प्रेस १२ तास उशिरा धावत असल्यामुळे आज नांदेडहून अमृतसरला जाणारी नांदेड - अमृतसर सचखंड एक्स्प्रेस दुपारी पावणे तीन वाजता निघणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.

दरम्यान, हैदराबाद रेल्वे विभागात घेण्यात आलेल्या ब्लॉक मुळे नांदेड मेडचल नांदेड ही प्रवासी रेल्वे निझामाबाद ते मेडचल दरम्यान रद्द करण्यात आली आहे. येत्या आठ डिसेंबरपर्यंत ही गाडी नांदेड निझामाबाद नांदेड अशी धावणार आहे.

****

      मुंबई विभागीय काँग्रेस कार्यालयावर काल सकाळी झालेल्या हल्ल्याचा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र निषेध केला आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली असून, या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे, असंही ते म्हणाले.

****

     कन्नड तालुक्यातले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष, नगरसेवक सुनिल पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना उपनेते चंद्रकांत खैरे यांनी सर्वांचं स्वागत केलं.

*****

No comments:

Post a Comment