Sunday, 3 December 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 03.12.2017 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

०३ डिसेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

****

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन आज पाळला जात आहे. दिव्यांग व्यक्तींना सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनात, समाजातल्या सर्व स्तरात, त्यांचे हक्क मिळवून देणं आणि त्यांच्या कल्याणार्थ उपक्रम राबवणं, यादृष्टीनं १९९२ पासून हा दिवस पाळला जातो. ‘सर्वांसाठी शाश्वत आणि समर्थ समाजाकडे परिवर्तन’ ही या दिनासाठी यंदाची संकल्पना आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार दिले जाणार आहेत. दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्ती, संस्था, संघटना आणि राज्यांना हा पुरस्कार दिला जातो. 

****

देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. डॉ. राजेंद्र प्रसाद यांचं नेतृत्व आणि मार्गदर्शन देशाच्या जडणघडणीत मोलाचं ठरलं असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटरवरच्या संदेशात म्हटलं आहे. डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अद्वितीय देशसेवेतून सर्व पिढ्यांना सतत प्रेरणा मिळत राहिली असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं आहे.

****

भोपाळ वायू दुर्घटनेला आज ३३ वर्ष पूर्ण झाली. त्या स्मृतीप्रित्यर्थ मध्य प्रदेशात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या दुर्घटनेत मरण पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भोपाळ मधल्या बरकतउल्ला भवन इथं आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. १९८४ साली युनियन कार्बाईड कारखान्यातून विषारी वायू गळती झाल्यानं मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती. 

****

ओखी चक्रीवादळामुळे केरळ आणि तामिळनाडू इथले समुद्रात भरकटलेले नऊशे बावन्न मासेमार सिंधुदुर्ग किनाऱ्यावर सुखरुप पोहोचले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. यातील एकूण ६८ बोटींपैकी ६६ बोटी केरळमधल्या तर दोन तामिळनाडूमधल्या असल्याचं ते म्हणाले. त्यांना परतण्यासाठी अनुकूल हवामान निर्माण होईपर्यंत त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. या सहकार्याबद्दल संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

****

दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या राज्यभरातल्या पाच हजार दोन शाळांचे विद्यार्थी तसंच शिक्षकांचं त्याच परिसरातल्या इतर शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काल मंत्रालयात पत्रकार परिषदेत ही बाब स्पष्ट केली. गुणवत्ते अभावी विद्यार्थ्यांची कमी होणारी संख्या लक्षात घेता, हा निर्णय घेतल्याचं, तावडे यांनी सांगितलं.

*****

No comments:

Post a Comment