Monday, 4 December 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 04.12.2017 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 December 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४  डिसेंबर २०१७ सकाळी .५० मि.

****

** दिव्यांगांच्या अधिकारांचं रक्षण करणं आवश्यक - राष्ट्रपतींचं प्रतिपादन

** राज्य सहकारी बँकेचा छोट्या उद्योजकांना कर्ज देण्याचा निर्णय

** हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांना गुजरातमध्ये राजकोट इथं अटक आणि सुटका; कारवाईनंतर जिल्हाभरात पडसाद

आणि

** जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये सहा द्विशतकं झळकवणारा विराट कोहली हा पहिला कर्णधार; दिल्ली कसोटीत भारत ४०५ धावांनी आघाडीवर

**

****

****

दिव्यांगांच्या अधिकारांचं रक्षण करणं आवश्यक असून त्यांना विविध सोयी सवलती पुरवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त काल नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार वितरीत करण्यात आले. यात महाराष्ट्रातले प्रणय बुरडे, गौरी गाडगीळ यांच्यासह ‘ई टी सी’, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडिया आणि जळगावच्या ‘द जळगाव पीपल्स को- ऑप बँक लिमिटेड’ या संस्थाना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

****

राज्यात दिव्यांगासाठी चालवल्या जाणाऱ्या सर्व संस्थांना व्यवसाय प्रशिक्षण केंद्र म्हणून मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा राज्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे. ते काल लातूर इथं आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. दिव्यांगांच्या कल्याणासाठी तीन टक्के निधीची तरतूद असून, प्रशासनातले अधिकारी दिव्यांगाचे अधिकार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करतील अशी ग्वाही लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी यावेळी दिली.

****

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त उस्मानाबाद इथं दिव्यांगांसाठी क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्ह्यातल्या दिव्यांगांच्या ३० शाळेतले ६६० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या हस्ते काल या स्पर्धेचं उद्घाटन झालं तर आज समारोप होणार आहे.



जालना इथंही जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीनं दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांच्या हस्ते स्पर्धेचं उदघाटन झालं. दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्पर्धेतील विविध क्रीडा प्रकारात उत्साहात सहभाग घेतला.

****

अल्झायमर आणि त्याच्याशी संबंधित आजारांमुळे स्मृतिभ्रंश होतो, त्यामुळे अशा रुग्णांच्या नातेवाईकांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असून त्यासाठी आरोग्य विभाग पुढाकार घेईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी दिली आहे. काल अल्झायमर दिनानिमित्त मुंबई इथं अवेरथॉन आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना समुपदेशन तसंच प्रशिक्षण देण्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था पुढे आल्यास त्यांना राज्यातल्या प्रमुख चार मनोरुग्णालयांमध्ये आरोग्य विभागामार्फत जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. एक चळवळ म्हणून या आजारासंदर्भात जाणीवजागृतीसाठी प्रयत्न केले जातील, असंही आरोग्यमंत्र्यांनी नमूद केलं.

****

राज्य सहकारी बँकेने यापुढील काळात कर्ज देण्याच्या धोरणात सकारात्मक बदल करून छोट्या उद्योजकांना कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेचे अध्यक्ष एम.एल. सुखदेव यांनी काल सोलापूर इथं ही माहिती दिली. राज्य सहकारी बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारून बँक आता नफ्यात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आपला विस्तार आणखी घट्ट करण्याचा निर्णय बँकेनं घेतल्याचं सुखदेव यांनी सांगितलं. छोट्या उद्योजकांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष निधीची तरतूद करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सुखदेव यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेऊन बँकांचे प्रश्न आणि इतर बाबींवर चर्चा केली.

****

येत्या १५ डिसेंबरपर्यंत राज्यातल्या सर्व रस्त्यांवरचे खड्डे भरले जातील, असा पुनरुच्चार सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते काल यवतमाळ इथं दुरुस्ती कामाचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. मंत्रालयातल्या प्रत्येक अधिकाऱ्याला राज्यातल्या तीन जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली असून, प्रत्येक अधिकाऱ्यानं नेमून दिलेल्या जिल्ह्यातल्या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून, रस्ते खड्डेमुक्त झाल्याची खातरजमा करून घ्यायची असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी आज पक्षाच्या अध्यक्षपदासाठीच्या  निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. पक्षाध्यक्ष खासदार सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यावेळी उपस्थित राहतील, असं सूत्रांनी सांगितलं. आतापर्यंत इतर कोणाचाही या पदासाठी अर्ज सादर झालेला नाही.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांना गुजरातमध्ये राजकोट इथं अटक करून त्यांची सुटका करण्यात आली. काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादानंतर पोलिसांनी ही कारवाई केली होती. यावेळी खासदार सातव यांना झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर बसस्थानकावर एस टी बसवर दगडफेक करण्यात आली. यात बसच्या काचा फूटुन मोठे नुकसान झालं, मात्र बसमधल्या प्रवाशांना सुदैवानं कोणतीही दुखापत झाली नाही. बाळापूर इथंही महामार्गावर टायर पेटवून रास्तारोको आंदोलन करण्यात आलं.

दरम्यान, या निषेध आंदोलनाच्या विरोधात कळमनुरी इथं भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते खासदार राहूल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. काही अज्ञात व्यक्तींनी कळमनुरी इथं खासदार सातव यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये सहा द्विशतकं झळकवणारा विराट कोहली हा पहिला कर्णधार ठरला आहे. नवी दिल्लीत फिरोझशहा कोटला मैदानावर श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात काल दुसऱ्या दिवशी कोहलीनं वेस्ट इंडिजचा फलंदाज ब्रायन लारा याचा पाच द्विशतकांचा विक्रम मागे टाकत हा विक्रम केला. या बरोबरच त्यानं सचिन तेंडूलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या सर्वाधिक द्विशतकांच्या विक्रमाची बरोबरी केली.

या सामन्यात काल भारतानं पहिला डाव ५३६ धावांवर घोषित केला. कर्णधार विराट कोहलीच्या २४३, मुरली विजय १५५, रोहीत शर्मानं ६५ तर शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारानं प्रत्येकी २३ धावा केल्या.

दरम्यान, श्रीलंकेच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षण करताना, वारंवार प्रदुषणाची तक्रार केल्यानं, खेळ तीन वेळा थांबवावा लागला होता. 

कालच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा, श्रीलंकेच्या तीन बाद १३१ धावा झाल्या होत्या. मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी एक बळी घेतला. सामन्यात भारत ४०५ धावांनी आघाडीवर आहे.

****



अहमदनगर इथले कृष्ठरुग्णसेवक, प्रसिद्ध डॉ.जयंत करंदीकर यांचं काल निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. औरंगाबाद नगर मार्गावर असलेल्या करंदीकर यांच्या ओंकार उपचार केंद्रात राज्यभरातून रुग्ण उपचारासाठी येत.

****

शेतकरी हा देशाचा आत्मा असून प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांना जागृत करणं गरजेचं आहे, असं मत भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आय.एन.बसवेगौडा यांनी व्यक्त केलं आहे. परभणी इथं किसान संघाच्या तीन दिवसीय सभेच्या समारोप प्रसंगी ते काल बोलत होते.या सभेत शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली तसंच देशातल्या प्रत्येक गावात ग्रामसमिती स्थापन करुन दबावगट निर्माण करण्याचा ठराव संमत करण्यात आला.देशभरातून ३४ प्रांतातले प्रतिनिधी या सभेत सहभागी झाले होते.

****

बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाची पूर्णाहूती आणि महापुजेनं काल सांगता झाली. सायंकाळी सात वाजता देवीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर भाविकांनी काल दर्शनासाठी गर्दी केली होती. गेल्या २६ नोव्हेंबरपासून हा महोत्सव सुरु होता. 

****

राज्यभरातल्या दत्तमंदिरांमध्ये काल सायंकाळी दत्त जयंती सोहळा भक्तीभावानं साजरा झाला. नांदेड जिल्ह्यात माहूर गड इथं भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. अहमदनगर जिल्ह्यातल्या देवगड इथंही दत्तजन्म सोहळा पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. या निमित्तानं गेला आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेच्या पदवीधर गटासाठी आज मतदान होत आहे. एकूण दहा जागांसाठी सुमारे २९ हजार मतदार आज सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान करतील. या निवडणुकीसाठीचं पहिल्या टप्प्याचं मतदान गेल्या २४ नोव्हेंबरला झालं होतं.

****

बीड-परळी रस्त्यावर लष्कराचं वाहन उलटून झालेल्या अपघातात सैन्यदलाचे अकरा जवान जखमी झाले, यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. अहमदनगर इथल्या लष्करी प्रशिक्षण केंद्रातले हे जवान, परळी इथं एका जवानाच्या अंत्यसंस्कारासाठी जात असताना, हा अपघात झाला.
                                    *****

No comments:

Post a Comment